सोलापूर (प्रतिनिधी) : एकीकडे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि रेल्वे प्रशासन कात टाकत असतानाच दुसरीकडे सोलापूर रेल्वे प्रशासनाचे उच्चपदस्थ अधिकारी मात्र मोबाईल हाताळण्यात मग्न आहेत. हे अधिकारी मोबाईल हाताळण्यात इतके मग्न झाले होते की त्यांना आपल्या समोर खासदार बसलेत याचेही भान राहिले नाही. त्यामुळे खासदार चांगलेच संतापले. सोलापुरकरांच्या विविध समस्यांचा आढावा घेण्यासाठी खासदार शरद बनसोडे मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाचे व्यवस्थापक अजेयकुमार दुबे यांच्या कार्यालयात गेले होते. यावेळी खासदार शरद बनसोडे यांना दुबे यांनी खुर्ची तर दिली खरी मात्र जवळपास 15 मिनिटे ते मोबाईलच पाहत राहिले. त्यामुळे लाखो लोकांचे प्रतिनिधित्व करणार्या खासदारांना बोलायलाही रेल्वे अधिकार्यांकडे वेळ नव्हता. अखेरीस खासदार साहेबांनीच अधिकार्यांना सांगितले की ‘साहेब मोबाईल ठेवा आणि इकडे लक्ष द्या.’ त्यानंतर हे अधिकारी जागे झाले. मात्र खासदारांचा असा अवमान करणार्या अधिकार्यांवर रेल्वे मंत्रालय आणि प्रशासन काय कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं ठरणारं आहे.
