“हे जग कवींमुळे सुंदर आहे; जर कवीने भरभरून शब्दभांडार दिले नसते तर हे जग सुने-सुने झाले असते. आजच्या अकृत्रिम जगात आशयघन साहित्याला मोठे महत्व आहे,” असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी, समीक्षक आणि वक्ते प्राचार्य डॉ. भगवान ठाकूर यांनी केले. सुभाषचंद्र वैष्णव यांनी लिहिलेल्या “काव्यपुष्प” या काव्यसंग्रहाचे प्रकाशन प्राचार्य ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध कवियत्री अंजली कुलकर्णी होत्या. याप्रसंगी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आदित्य उद्योग समुहाचे अध्यक्ष सचिन जैन, “साहित्य चपराक” मासिकाचे संपादक घनश्याम पाटील उपस्थित होते.
पुढे बोलतांना प्राचार्य ठाकूर म्हणाले की, आज कविता विपुलप्रमाणात लिहिली जाते. मात्र रचनेत गुणात्मक दर्जाही उच्चप्रतीचा हवा तरच कविता हृदयाला भिडते. नव्या कवींनी मान्यवर कवींचे संग्रह वाचून मोजक्या शब्दात मोठा अर्थ रसिकांना द्यावा.
“वैष्णव” यांच्या ‘संध्यापुष्प’ संग्रहातील रचना वैविध्यपूर्ण विषयांवरील आहेत. त्यात त्यांनी सर्व काव्यप्रकार अतिशय कौशल्याने हाताळले आहेत. संग्रहास गझलसम्राट सुरेश भात यांचे मिळालेले आशीर्वाद हीच मोठी पावती आहे. संग्रहाचे मुखपृष्ठ आणि आतील रेखाचित्रेही अप्रतिम आहेत” असे गौरवोदगार अंजली कुलकर्णी यांनी काढले.
यानिमित्ताने द्वितीय सत्रात निमंत्रित कवींची बहारदार काव्य मैफल झाली. अध्यक्षस्थानी धुळ्यातील कवी प्र. अ. पुराणिक होते. गझलकार दीपककरंदीकर, अंजली कुलकर्णी, बंडा जोशी, मन्मथ बेलुरे, सरिता कमलापूरकर, दिपाली दातार, नामदेव आबणे, वृंदा पंचवाघ, गणेश हेळकर, शांताराम हिवराळे, विलास पायगुडे,शिलराज नरवडे, शोभा तोटे आदी कवींनी आपल्या कविता सादर केल्या.
कवी सुभाषचंद्र वैष्णव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. घनश्याम पाटील यांनी प्रास्ताविक केले. कवी माधव गीर यांनी अतिशय बहारदार सूत्रसंचालन करून कार्यक्रमाची उंची वाढवली.