उद्धव ठाकरे यांनी सांगलीतून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आणि मविआत सुंदोपसुंदी सुरू झाली. काँग्रेसने ही जागा सोडण्यास नकार दिला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात आणि विश्वजित कदम यांनी हा विषय बराच ताणला. संजय राऊत यांनी तर महाराष्ट्रात इतर मतदारसंघात काँग्रेसची काय अवस्था होईल, यावर भाष्य केले. शेवटी उद्धव यांनी विश्वजित यांची नाराजी दूर केली आणि हा वाद मिटला.
गेल्या काही काळात युती-आघाडी या सर्वांची समीकरणं बदलली आहेत! खरंतर शिवसेना-भाजप यांची नैसर्गिक युती दीर्घकाळ होती. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनी बाळासाहेबांच्या मर्जीत राहून महाराष्ट्रात भाजपच्या वाढीचे प्रयत्न केले. आजच्यासारख्या त्यावेळीही काहीवेळा जागावाटपावरून वाद व्हायचे. विशेषतः शिवसेनेच्या ज्या हक्काच्या जागा असायच्या त्या ठिकाणी भाजपावाले त्यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरायचे. हा विषय बाळासाहेब ठाकरे यांच्यापर्यंत गेल्यानंतर ते कसलाही विचार न करता क्षणात ती जागा मित्रपक्ष असलेल्या भाजपसाठी सोडायचे.
अशावेळी काही शिवसैनिक त्यांना सांगायचे की, ‘साहेब आपला इथला उमेदवार नक्की निवडून येईल. इथं आपल्यासाठी पोषक वातावरण आहे.’ त्यावर बाळासाहेब म्हणायचे, ‘आपण तिथून भाजपचा जो उमेदवार देणार आहोत तो पाकिस्तानी आहे का? तोही आपल्याच मित्रपक्षाचा आहे ना? मग त्याला निवडून आणा! त्याचा विजय म्हणजे आपलाच विजय आहे.’
मनाचा असा उत्तुंगपणा दाखवणारे बाळासाहेब म्हणूनच हिंदुहृदयसम्राट ठरले. त्यांच्या मनात एखादी गोष्ट आली की, ते नफ्या-तोट्याचा विचार करत नसत. शिवसेना ही एकमेव संघटना आहे, ज्यांनी जाती-पातीचं राजकारण कधीच केलं नाही. त्यामुळेच अनेक सामान्य उमेदवार शिवसेनेच्या माध्यमातून नेते झाले. काहींनी तर राज्याचं नेतृत्वही केलं. नारायण राणे, छगन भुजबळ अशा कितीतरी नेत्यांची नावं उदाहरण म्हणून सांगता येतील.
राजाभाऊ रायकर हे ज्येष्ठ शिवसैनिक पुण्यात ‘सामना’च्या वाढीसाठी प्रयत्न करायचे. ‘जिथे सामना जाईल तिथे माझा विचार पोहोचेल,’ असे बाळासाहेबांना वाटायचे. त्यामुळे निवडणूक, नेमणूक कोणतीही असली तरी त्याची यादी थेट ‘सामना’तून जाहीर व्हायची. अगदी अनपेक्षितपणे राजाभाऊ रायकर यांना बाळासाहेबांनी पुणे जिल्हाध्यक्ष केले. ज्यांनी शिवसेनेसाठी रक्ताचं पाणी केलं अशा अनेकांना त्यांनी आमदार केलं, मंत्री केलं. मुख्यमंत्रीही केलं.
हा लेख ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
असं म्हणतात की, पाकिस्तानकडून ऑफर होती की, ‘आम्ही काश्मीरवर कधीच अधिकार सांगणार नाही. त्या बदल्यात आम्हाला बाळ ठाकरे द्या!’
बाळासाहेबांच्या कर्तबगारीचा यापेक्षा मोठा पुरावा तो कोणता? जे मनात येईल ते मोकळेपणाने बोलायचे. कुणाला काय वाटेल याची पर्वा त्यांनी कधीच केली नाही. निवडणुकीच्या वातावरणात त्यांच्या जवळचे काही लोक त्यांना शांत करायचा प्रयत्न करायचे पण त्यावर ते म्हणत, ‘तुमची काळजी तुम्ही करा. तुम्हाला निवडून यायचे आहे. मी कधीही निवडणूक लढवणार नाही, त्यामुळे मला याचा काहीही फरक पडणार नाही.’ आजच्या अनेक स्वयंघोषित चाणक्यांच्या युगात बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या मनस्वी किंगमेकरची प्रकर्षाने आठवण येते.
– घनश्याम पाटील
7057292092
दैनिक पुण्य नगरी, 12 मे 2024