स्थानिक विरुद्ध उपरा : किस्सा-ए-इलेक्शन – घनश्याम पाटील

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार आमदार राम सातपुते यांना एक पत्र लिहिले. त्यात त्यांनी सोलापूरच्या संस्कृतीविषयी लिहून सातपुते हे बाहेरचे म्हणजे उपरे असल्याचे सांगितले. त्यावर सातपुते यांनीही त्यांना प्रतिउत्तर देत आपण सोलापूर जिल्ह्यातीलच माळशिरस विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्याचे आणि सोलापूरशी आपला नियमित संपर्क असल्याचे सांगितले. मुख्य म्हणजे एका माजी मुख्यमंत्र्याची मुलगी आणि एका ऊसतोड कामगाराचा मुलगा अशी ही लढत आहे. दोघेही युवा नेते आहेत आणि आता लोकसभेसाठी आपले भवितव्य आजमावून पाहत आहेत. यानिमित्त स्थानिक भूमिपुत्र विरूद्ध बाहेरचा असा संघर्ष सुरू असला तरी सुशीलकुमार शिंदे हे सुद्धा मूळचे सोलापूरचे नसल्याच्या काही बातम्या प्रकाशित झाल्या.

2009 साली बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्याविरूद्ध लढत देण्यासाठी भाजपला उमेदवार मिळत नव्हता. इथून लढणं म्हणजे दगडावर डोकं आपटून घेण्यासारखं, अशी त्यावेळची परिस्थिती होती. अशावेळी भाजपने कांता नलावडे यांना सुप्रिया सुळे यांच्याविरूद्ध मैदानात उतरवले. त्या मूळच्या सातार्‍याच्या. दिल्लीत त्यांची उठबस होती. त्यावेळीही सुप्रिया सुळे यांनी स्थानिक विरूद्ध बाहेरचा असा मुद्दा चर्चेला आणला. कांता नलावडे यांनी सुरूवातीला सुप्रिया सुळे यांचे सिंगापूर कनेक्शन जोडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भाजपच्या एका तरूण, होतकरू कार्यकर्त्याने त्यांना सांगितले की, ‘‘नलावडे आडनावाचे एक स्थानिक पत्रकार आहेत. ते निगडे ओसाडे या गावचे असून तिथे तुमच्या आडनावाची अनेक घरे आहेत. हे गाव आपल्या मतदारसंघात येते. त्यामुळे तुम्ही जाहीर करा की, मी मूळची निगडे ओसाडेची असून शंभर वर्षांपूर्वी आमचे पूर्वज व्यवसायाच्या निमित्ताने सातारला गेले.’’
ही मात्रा लागू पडली आणि हा विषय मोडीत निघाला. इतकेच नाही तर याच्या बातम्या झाल्यावर निगडे ओसाडे ग्रामस्थांनी कांता नलावडे यांना गावभेटीचे निमंत्रण देऊन ग्रामदेवतेच्या साक्षीने त्यांचा सत्कारही केला.
2014 साली सुप्रिया सुळे यांच्या विरूद्ध महादेव जानकर यांनी अर्ज भरला आणि त्यावेळीही सुळेंनी हाच मुद्दा चर्चेत आणला. मागच्या निवडणुकीतील अनुभव लक्षात घेता येथील आमदार शरद ढमाले यांनी जानकरांना सांगितले की, ‘‘तुम्ही वांद्रे भोरकस या गावचे असल्याचे सांगा.’’ त्यानुसार जानकरांनी माहिती देताच यावेळीही हा विषय हद्दपार झाला.
यंदाच्या निवडणुकीत मात्र सुप्रिया सुळे यांच्या गाववाल्याच नाही तर घरातील खुद्द भावजय असलेल्या सुनेत्रा पवार या निवडणूक लढवत असल्याने असा काही मुद्दा चर्चेत आला नाही. ‘भाजपवाले अनेकांची घरे कशी फोडतात, आपल्याकडे वहिनी ही आईसारखी असते. त्यामुळे आई आणि मुलीत त्यांनी संघर्ष लावला’ असे भावनिक विधान त्यांनी केले. ‘जर वहिनी आईसारखी असते तर मग कधीतरी आईलाही संधी द्या, दरवळी किती पुढे पुढे करायचे?’ अशी चर्चाही बारामती लोकसभा मतदारसंघात आहे.

हा लेख ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

खरंतर भारतीय राज्यघटनेनं कुणालाही, कुठूनही निवडणूक लढविण्याचा अधिकार दिला आहे. संविधानाने घालून दिलेल्या आदर्शानुसार कोणताही भारतीय नागरिक देशातील कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतो. त्यामुळे स्थानिक-बाहेरचा, उपरा-अपरा अशी चर्चा करताना लोकशाही व्यवस्थेत हा संविधानाचा अपमान आहे, हेच अनेकांना उमगत नाही. कुणाला मतदान करायचे याचा सारासार विचार करण्याएवढा मतदार सूज्ञ नक्कीच आहे. म्हणूनच देशाचे पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदी गुजरात सोडून वाराणशीतून निवडून येतात तसेच काँग्रेसचे सर्वोच्च नेते असलेले राहुल गांधी त्यांचा अमेठी मतदारसंघ सोडून केरळातील वायनाडमधून लढत देतात.
ही निवडणूक ग्रामपंचायतीची किंवा स्थानिक नगरपालिकेची नाही. त्यामुळे राष्ट्रीय प्रश्नांची जाण असलेल्या, देशहितासाठी वाहून घेतलेल्या, प्रामाणिक, पारदर्शक उमेदवाराला निवडून देणे गरजेचे आहे. सध्याच्या परिस्थितीत बहुुतांश ठिकाणी असे उमेदवार शोधूनही सापडत नाहीत, ही वस्तुस्थिती असली तरी त्यातल्या त्यात सक्षम उमेदवार निवडून देणे इतकेच आपल्या हातात आहे.

– घनश्याम पाटील
  7057292092

( प्रसिद्धी – दै. पुण्यनगरी १६ एप्रिल २०२४)

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा