मी एक संभ्रमीत – प्रवीण दवणे

राजकारण असो की समाजकारण, साहित्य असो की सांस्कृतिक वातावरण पदोपदी संभ्रमाचे भोवरे आहेत, चकव्यात हरवावे आणि आपल्याच घराचा रस्ता आपल्याला सापडू नये असे बेसुमार वातावरण आहे. सामान्य माणूस म्हणून आजच्या वर्तमानाचे फक्त काही संभ्रम मांडण्याचा हा प्रयत्न. घटना प्रातिनिधिक आहेत, याला समांतर असंख्य घटना घडतच आहेत. लिहिणार किती नि सांगणार कोणाला?  आणि कोणाकोणाला? कुंपणच शेत खातंय, आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय, हे बालपणी मराठी पुस्तकात वाचलेले म्हणी व वाक्प्रचार आपण सत्यात जगत आहोत.

ज्यांच्याकडे सामान्य, भाबड्या जनतेने आशेने व आधारासाठी पाहावे, ज्या राजकीय मंडळींच्या हाती जनता श्रद्धेने आपले नशीब सोपवते त्याच हाताने जनतेचा गळा आवळून मदांध रानदांडगेपणाने खुर्चिला लोंबकळत षडयंत्र करताना खुलेआम दिसत आहे. समाजातल्या एकून एक व्यवहारात पराकोटीची भेसळ झाली आहे. युवकांना कुठले दीपस्तंभ दाखवावेत हेच समजेनासे झाले आहेत. ज्ञानाच्या जोडीने माणूस मनाने विशाल व सर्वसमावेशक होण्याऐवजी माहिती व तंत्रज्ञानाच्या अधिक तरबेज आकलनाने पशूत्वाकडे निघाला आहे. कवी अनिलांची ‘सारेच दीप कसे मंदावले आता!’ ही ओळ पुटपुटत काळोखात बसावे आणि काळोखातच विरून जावे अशी संवेदनशील माणसाची तरी मनःस्थिती झाली आहे. अशा मनःस्थितीतील काही कवडसे म्हणजे हे संभ्रमाचे तुकडे.

एक
हा संभ्रम जरा दीड-दोन वर्षांपूर्वीचा. ‘मास्क’ प्रतिबंधीत काळातील. विनामास्क व्यक्तिला दोनशे रूपयांची दंड पावती फाडण्यास रक्षक जागोजागी सज्ज होते. मीही टॅक्सी करून ‘दूरदर्शन’वर रेकॉर्डिंगला निघालो होतो. ‘मास्क’ लावलेला होताच. वीस-पंचवीस मिनिटांनी पाणी पिण्यासाठी म्हणून बॅगेतील पाण्याची बाटली मी काढली. आता जिथून पाणी प्यायचे त्या नाकाजवळील परिसरात ओठ असल्याने, मी जरा मास्क खाली सरकावला. मला काही कळण्याच्या आतच टॅक्सी चालकाला ‘टॅक्सी बाजूला घ्या’ असा खाकी आदेश आला. मला काही कळेचना. वर्दीतला इसम म्हणाला, ‘द्या दोनशे रूपये.’
‘कसले?’
‘आपण मास्क काढला होतात, आत्ता घातलात.’
‘पण पाणी प्यायचे तर मास्क काढायला नको का?’
‘ते माहीत नाही; दोनशे रूपये द्या.’
‘पण पाणी पिण्यासाठी मी…’
लगेच त्याने बोलताना दोन-चार फोटो दाखवले.
‘हा पहा – आहे मास्क’
‘आहे की पण पाणी पितोय म्हणून!’
‘पण नाकावर आहे का? चला, या बाहेर; गाडी तयार आहे. साहेबांशी बोला, तिथे हजार रूपये भरा.’
मी अन्यायाला सामोरा गेलो. गपचून दोनशे रूपये भरले.
गाडी सुरू झाली. डोळ्यात पाणी भरले होते; दुःख दोनशे रूपयांचे होते का? उद्वेग कसला होता?
मी त्या रानदांडग्या आक्रमतेशी मुकाबला करू शकत नव्हतो. सामान्य होतो. मी माझ्या समोर सिग्नलजवळून शेकडो निधड्या छातीचे मस्तवाल तरूण मुजोरीत जात येत होते आणि माझ्याकडून पावती फाडून (?) दिवसाचे दिलेले टार्गेट पूर्ण करणारी वर्दी मंडळी त्यांच्यापुढे हतबल होती. त्यांना नियम नव्हते. बंधन नव्हते परंतु नियम पाळणार्‍या सामान्य माणसाचेच शोषण करण्यात यंत्रणा गुंतलेल्या दिसत होत्या.
जत्रा, बाजार, समुद्रकिनारे विनामास्क फिरत असताना जी यंत्रणा हतबल असते ती ‘एकट्या’ सज्जनाला पकडून मात्र ‘दंडे’ली करते का? संभ्रमात मन भोवंडते. सभांना उसळलेली गर्दी, ‘मी नाही मास्क घालणार जा’, म्हणणारे नेते, त्यांच्या नियम न पाळण्याच्या रिल्सना लक्षावधी ‘लाईक्स’चा वर्षाव! मरणालासुद्धा न जुमानणारी, यमालाही डरवणारी ही मंडळी. या आजाराला बळीही पडत नाहीत; जरा शिंक आली आली वाटताना यांना दशतारांकित हॉस्पिटलात उपचार सुरू होतात. पुन्हा बाहेर आले की, जत्रेत पोळ घुसावा तसा आडदांडपणा सुरू.

दोन
प्रलयात जग वाहून जातानाही मीच सत्ताधीश होणार! सारे जग संपून गेले तरी मी एकटा अजरामर असणार, हा भ्रम मुजोर राजकारण्यांना येतो तरी कुठून हाही माझा संभ्रम आहे.
स्वतःच्या बँक खात्यातील व खात्यात मावणारच नाहीत अशा हजारो हजार कोटींची लागवड करणारे चेहर्‍यावर भयाचा एकही ओघळ येऊ न देता कसे फिरतात? नि आपण रिक्षाचालकाला द्यायला ‘एक रूपया’ जरी सुटा नसला तर दोन रूपये देऊन, ‘ठेव बाबा, माझा तुझ्याकडे पण तुझा एक रूपयाही नको,’ या भावनेने निश्चिंत होतो. आपल्या पिढीवरील हे संस्कार आणि त्याच पिढीत जन्मलेले आपल्याच एवढ्या वयाचे हे समाजकारणाचा बुरखा पांघरलेले चेहरे, यांच्यावर संस्कार तरी कुठले झाले असतील? हा माझा संभ्रम आहे. यांना झोप येते कशी? जे दुसर्‍याचे आहे ते मी ओरबाडून लुटले आहे ही भावना या मनांना छळत नाही का? की यांना ‘मन’च नसतं? मला आपला एक संभ्रम आहे.
मी समोर बघतो, फुटपाथ अडवला म्हणून सणासुदीला झेंडुच्या माळा विकणार्‍या आंब्याच्या पानांची तोरणे विकणार्‍या, सणासमारंभाच्या मोसमात जे चार पैसे मिळतील त्यावर वर्षभर गुजराण करणार्‍या वनवासी-आदिवासी श्रमजीवी विक्रेत्यांना काठीने बडवले जाते, हुसकावले जाते किंवा मिळकती इतक्याच लाचेने चिरडले जाते; पण त्याच फुटपाथवर आपल्या मुजोरीचे हजार पाय पसरून वाढलेली अनधिकृत दुकाने, दिलेल्या जागेपेक्षा अनेक फूट छप्पर बांधून बळकावलेल्या जागा, त्यांना मात्र अभय असते. गल्ल्याजवळच्या देवात्म्याला शंभर-दोनशेचा जाड हार घालणार्‍या, दहा बोटात आठ जाडजूड अंगठ्या नि गळ्याइतक्याच घनदाट सुवर्णमाळा घालणार्‍या त्या व्यापार्‍यांना ‘सलाम’ ठोकणारी मुजोर व्यवस्था, पोटाच्या खळगीसाठी रानफुलांचे हार विकणार्‍या विकल, विवश श्रमिकांसाठी कुठे जाते? मला आपला हा संभ्रम आहे खरा.

तीन
हल्ली ना मनावर एक दडपण येत असते अधूनमधून. एखादी व्याधी येते… काही काळाने निघूनही जाते पण समाजाला झालेली विस्मृतीची व्याधी… त्याचे काय करायचे? एखादी  सनसनाटी बातमी हजार वेळा दाखवून दाखवून जीव ओरबाडला जातो. सारा समाज नकारात्मक संमोहनाने गलितगात्र होतो. एकमेकांना कपटकारस्थानाने बदनाम करण्याचे, विकृतींना चित्रित करून ‘उघडे-नागडे’ करण्याचे तंत्र व्यापारीदृष्ट्या यशस्वी होते. आता अमूक व्यक्तिला न्यायाला सामोरे जाऊन चांगली कठोर शिक्षा होणार बरे का, असं भाबड्या नागरिकांना (माझ्यासारख्या) ती बातमी समाजाने विसरावी म्हणून नवे कारस्थान चित्रित होते. समाज नावाची गरीबगाय नवी बातमी चघळत चघळतख, हृदयाचे ठोके वाढवत, रक्तदाब, वाढलेला मधुमेह यावर गोळ्या घेत हतबल होते.  दडपणावर दडपण याचेही एक भयानक मार्केटिंग तंत्र बुद्धिमान यंत्रणांनी विकसित (?) केले आहे की काय आणि याने शेवटे साधायचे काय? रानाला वणवा लावणार्‍या माणसांना पुन्हा त्याच रानात जळावे लागणार ना? की कुठली अवस्था? मी संपलो तरी चालेल पण जगालाही संपवेन! अणुयुद्धापेक्षासुद्धा भयंकर हे षडयंत्रयुद्ध माध्यमांच्या रंगमंचावर सतत घडवून समाजाला रटरटत ठेवण्यात कुठला आलाय आनंद?
समाजाच्या स्मरणकोषाला सतत धक्के देत समाजकारणाला कायमची सोडचिठ्ठी दिलेले राजकारण करत रहायची ही वृत्ती तरी कोणती? समाजाला सारखे घनघोर तणावात ठेवायचा या मंडळींना तणाव येत नसेल का? अहोरात्र ही मंडळी फक्त कुरघोडी, डावपेच, कारस्थान, गुन्हे करणे, मग ते लपवणे यात दंग राहण्यात आपण देश, समाज तर दूरच पण स्वतःचेही किती अपरिमित नुकसान करत आहोत याची जाणीव कधीतरी झोप न लागण्याच्या अंश क्षणी होत असेल का? कुठल्या रसायनाने ही दगड मने निसर्गाने बनवली असतील? त्यांचे वृद्ध आईबाप, बायको-मुलं यांच्यावर या बेसुमार मुजोरीचे सावट कधीतरी पडत असेल का? माझ्या मनात संभ्रम आहे. केव्हातरी यांची (सद्सद् नव्हे पण…) विवेक बुद्धी जागी होत असेल का?
समाजाची स्मरणे – नोंदी पुसून टाकीत नव्या काळ्या अक्षरांची नोंद करणारी ही बुद्धी तरी कोणती? श्रद्धांजली नि शुभारंभ, उद्घाटने सारख्याच मख्खपणे करणारे हे ‘पाषाणपण’ समाज ज्यांच्या खांद्यावर विश्वासून मान टाकतो ते कसे करू शकतात? मन संभ्रमीत आहे.
आता ज्याप्रमाणे पदोपदी जाहिरातींचा ससेमीरा आपण चुकवूच शकत नाही त्याप्रमाणे जरा ‘बातमी’ बघण्यासाठी टीव्ही चालू करा. केवळ प्रतिक्रियावंतांची इतकी जत्रा दाटलेली दिसते की या प्रतिक्रियांची उत्तरक्रिया कशी करावी हाच एक प्रश्न भेडसावत असतो. ठीक आहे, ‘प्रवक्ता’ असणं हीच तुम्हाला पक्षानं दिलेली चाकरी आहे, मान्य! तीच तुमची रोजीरोटी आहे हेही मान्य पण या सर्वांच्या पलीकडे ‘माणूसपण’ नावाची एक गोष्ट असतेच की नाही? सतत, अगदी श्वासोच्छ्श्वासाच्या गतीने घडलेल्या, न घडलेल्या, कल्पनेतल्या, दंतकथेतल्या प्रतिक्रिया देऊन देऊन या ‘प्रवक्ता’ नावाच्या अपरिहार्य झालेल्या जमातीला वीट येत नाही का? सतत सतत नाटकी का होईना उच्चरवाने करवादल्यासारखे भांडून यांचा रक्तदाब अचानक उच्च नि कधी एकदम कमी होत नाही का? अगदी बेतलेली (स्क्रिप्टेड) का होईना एकमेकांची कुलंगडी काढून, पुन्हा दुसर्‍या दिवशी टोपीचा रंग बदलून अव्याहत बडबडत राहणे यांना कसे जमते? मला तरी प्रश्नच पडतो. थकतच नाहीत; पुन्हा दुसर्‍या दिवशी वेगळे जॅकेट घालून ‘तय्यार’! गे्रट!
त्यातल्या अनेकांना म्हणे निद्रानाश होतो, असं मी बाहेरून ऐकलं. तो होवो किंवा न होवो पण अगदी ‘बाहेरचे’ औषध घेऊन तरी कमीत कमी दोन तास तरी त्यांना भणभणविरहित शांत सुखनिद्रा येत असेल का? चोवीस तासातील प्रत्येक अंश फक्त राजकारण, डावपेच करणार्‍यांना कधीतरी जगजित सिंगची एखादी तरल गजल, पंडित शिवकुमार शर्मांची हळुवार संतूर ऐकाविशी वाटत असेल का?
आयुष्यात माणूस म्हणून आनंद घेण्याचे अनेक क्षण येतात; असतात साधेच पण आयुष्य अर्थपूर्ण करतात. एखादं आवडीचं पुस्तक आपल्याला एका वेगळ्याच समृद्ध जगात नेतं, एखादी बालकवींची, महानोरांची तरल कविता आपलं भावविश्व समृद्ध करते, या प्रतिक्रियेच्या ढिगार्‍यात स्वतः अडकलेल्या नि जगाला अडकवणार्‍या प्रवक्ता मंडळींना हे असे सुंदर खाजगी क्षण जगता येतात? का दिवसभर आरडाओरड, आदळआपट आणि या बोटावरील चिन्ह त्या बोटावर करीत दिवसदिवस घालवण्यातच यांच्या जन्माचे सार्थक होते? काय घडत असेल नेमके? मला संभ्रम आहे.
मला आणखी एक संभ्रम आहे. पन्नास-पन्नास वर्षे सत्तेवर किंवा सत्तेभोवतीच ज्यांचे आयुष्य भिरभिरत गेले त्यांना कधीच आपल्या दुष्कृत्यांचा, स्वार्थामुळे केलेल्या राष्ट्रविनाशी कृत्यांचा पश्चाताप होत नसेल? आपण आयुष्यभर जनतेला चकवतच मलईदार जगलो; पण हा देह सोडल्यावर अनुयायांनी (नाईलाजाने) उभारलेल्या पुतळ्याव्यतिरिक्त या देशात सामान्य नागरिकाने स्मरणात ठेवावे असे कुठले काम केले आहे? आपल्या घरातील पुढच्या पिढीला तरी जमीनजुमला, बंगला-वाडी, अमाप काळा पैसा या व्यतिरिक्त कुठला वारसा ठेवला आहे? समाजाने तर सोडाच पण घरातल्या आपल्या मुला-नातवंडांना दिशा देणारा कुठला संस्कार केला आहे? त्यांच्या डोळ्यासमोरच त्यांची नवी पिढी उल्का होऊन राख होताना पाहताना आपण ‘आता तरी बदलावे’ असे त्यांना मनाच्या एकांतात क्वचित तरी वाटत असेल का?
असे असंख्य का?
असं असंख्य संभ्रम?
एकाकी-एकट्याच्या वाटचालीत, या मंडळींच्या धाकाने काही संभ्रम तर मनाच्या माळ्यावरच पडून राहणार आहेत; पण त्या असंख्य ‘का?’ मागची तगमग त्यांना कधीतरी कळणार आहे का?
हा अजून एक संभ्रम!
मी एका समर्थ लोकशाहीचा प्रामाणिक घटक आहे हा ‘भ्रम’ जपत-जपत वाढत असलेले हे (फक्त काही…) संभ्रम!

–  प्रवीण दवणे

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा