कुविचारांची हजामत करणारा सेना न्हावी

‘आम्ही वारीक वारीक। करू हजामत बारीक॥’ किंवा ‘जाता पंढरीसी। सुख वाटे जीवा॥’ हे अभंग आपण नेहमी ऐकतो, पण ते नेमके कोणी लिहिले असावेत? याविषयी काही कल्पना आहे का?

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. वास्तविक संपूर्ण भारत ही संतांची भूमी आहे, पण त्यामध्येही महाराष्ट्रामध्ये संत परंपरा ही खूप मोठी आहे. उच्च जातीपासून तर समाजातल्या तळातील जातीपर्यंत प्रत्येक जातीमध्ये संत महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेले आहेत

ज्यांच्याकडे आपण पार्लरमध्ये जाऊन केस कापतो त्यांना आता आपण ब्युटीशियन म्हणत असू, बार्बर म्हणत असू, पण त्यांना न्हावी असे म्हणतात. ग्रामीण भाषेमध्ये त्यांना वारीक असे म्हणतात. या वारीक समाजाचं नाव महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये चंद्रसूर्य असेपर्यंत ज्या संतामुळे उज्ज्वल झालं त्यांचं नाव आहे ‘संत सेना न्हावी’.

सेना न्हावी यांचा जन्म एका न्हाव्याच्या घरामध्ये झाला. त्यांचे वडील हे बांधवगडच्या संस्थानिकांचे शाही हजाम होते. त्यांचा पिढीजात व्यवसाय केस कापण्याचा. तोच त्यांचा पोटापाण्याचा धंदा. त्याच घरामध्ये जन्म झाल्यामुळे सेना महाराजांनीही हाच व्यवसाय निवडला. त्यांनी हाच वडिलोपार्जित व्यवसाय पुढे चालवायचं ठरवलं. हा व्यवसाय पुढे चालवत असताना त्यामध्ये कोणत्याही प्रकारची चूक कधी त्यांनी होऊ दिली नाही. त्यामुळे सगळीकडे त्यांच्या कार्यनिष्ठेचा, व्यवसायनिष्ठेचा, प्रेमळपणाचा बोलबाला झाला. राजा वीरसिंह यांनीही त्यांची कीर्ती ऐकून त्यांच्या वडिलांच्या जागेवर सेना महाराजांना स्वतःच्या सेवेमध्ये सामावून घेतलं.

सेना महाराजांचे वडील विठ्ठलाचे परमभक्त होते. त्यांच्या घरामध्ये पूर्वापार वारीचा नेम चालत आलेला होता. ते दरवर्षी न चुकता नित्यनेमाने वारीला जात परंतु कालंतराने वय झाल्यामुळे त्यांना वारीला जाणे शक्य होईना.

एकेदिवशी वडिलांनी सेनाला जवळ बोलावून घेतले. म्हणाले, ‘‘सेना, आपल्या घरात पिढीजात वारीची परंपरा आहे. माझ्या अंगात त्राण असेपर्यंत मीही वारी कधी चुकवली नाही. आता मात्र मी थकलोय. माझ्याच्याने वारी होईल असे वाटत नाही. तेव्हा यापुढे ही वारी तुलाच करावी लागेल.’’

‘‘बाबा, आपण मुळीच चिंता करू नका. मी आपली परंपरा नेटाने चालवीन’’ सेना तत्परतेनं म्हणाला. त्यांचे उत्तर ऐकून त्यांच्या वडिलांच्या चेहर्‍यावर समाधानाचे स्मित उमटले.

‘‘मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. आता माझी चिंताच मिटली’’ वडील आनंदाने उद्गारले.

‘‘बाबा, जिवात जीव असेपर्यंत मी विठ्ठलाचे चरण सोडणार नाही’’ असे बोलून सेना कामासाठी निघून गेला. वडील आपल्या लेकाचा निश्चय ऐकून निश्चिंत झाले.

थोड्याच दिवसात वृद्धापकाळाने सेनाच्या मातापित्यांचे निधन झाले. आता घरची आणि वारीची संपूर्ण जबाबदारी सेनाच्या खांद्यावर पडली. त्यांनी नियमित पंढरीची वारी करायला सुरुवात केली. पंढरीची वारी करीत असताना त्यांचा संपर्क इतर संतांशी आला. सत्संग घडला. त्यातून त्यांना पांडुरंगाची ओढ लागायला लागली. त्यांच्या मनामध्ये पांडुरंगाविषयी प्रेम निर्माण झालं. त्या प्रेमापोटी ते कायम पांडुरंगाचे भजन करू लागले. किंबहुना पंढरपूरला जाणं हे त्यांच्यासाठी प्रचंड सुखाचं ठरायला लागलं. म्हणूनच त्यांनी अभंग लिहिला, जाता पंढरीसी। सुख वाटे जीवा॥ आनंद केशवा। भेटताचि॥

सर्वप्रथम पांडुरंगाची पूजा, पांडुरंगाचे भजन, संतांची सेवा, संतांची पूजा! त्यानंतर बाकीची कामं! अशा प्रकारचा त्यांचा दिनक्रम सुरू झाला. एकेदिवशी सेना दरबारात जायला निघाला होता. आपली धोपटी घेऊन तो बाहेर पडणार, तेवढ्यात एक वारकर्‍यांचा चमू त्याच्या दारात आला. राजाकडं जाणंही महत्त्वाचं होतं पण त्याहून जास्त महत्त्व हे संतसेवेचं आहे हे जाणून सेना वारकर्‍यांची सेवा करण्यासाठी पुन्हा घराकडे वळला. इकडे राजा सेनाची वाटच पाहत होता. सेना मात्र घरी संत आल्यामुळे राजापर्यंत पोहोचू शकला नाही.

हीच नेमकी संधी आहे, असं सेनाच्या दरबारातील शत्रूंना वाटलं. कारण राजा हा सेनाचा उत्तम मित्र होता. ही गोष्ट काही दरबारी लोकांना पसंत नव्हती. आपण एवढे उच्च पद धारण करणारे असून राजाचा सर्वाधिक विश्वास सेनावर आहे ही बाब त्यांना सारखी खटकायची. यांच्या मैत्रीमध्ये विघ्न आणण्यासाठी त्यांना संधी हवी होती ती त्यांना अनायासे आज मिळाली. त्या दुष्टांनी राजाचे कान भरले.

ते राजाला म्हणाले, ‘‘महाराज राजाचे काम सोडून, राजाची आज्ञा मोडून सेना घरी थांबलेला आहे. हा महाराजांचा अपमान आहे. या अपमानाबद्दल महाराजांनी सेनाला शिक्षा ही केलीच पाहिजे. त्याशिवाय बेशिस्त लोकांना अद्दल घडणार नाही.’’

महाराजांनी तिकडे दुर्लक्ष केलं. इकडे सेनानं सर्व संतांची षोडषोपचारे पूजा केली. आपल्या कुवतीप्रमाणे त्यांना भोजन दिलं. दक्षिणा दिली. सेवा केली. संत सेनाला आशीर्वाद देऊन निघून गेले. हे संत तीर्थयात्रेला गेल्यानंतर चहू दिशेला सेनाच्या आदरातिथ्याची कीर्ती त्यांनी पसरवून दिली. त्यामुळे सेनाच्या घरी संतांचा, संन्यासांचा राबता वाढला. संतांच्या सेवेमध्ये सेनाचा वेळ जाऊ लागला. त्यामुळे साहजिकच त्याला राजाच्या सेवेला जाण्यासाठी मात्र वारंवार उशीर होऊ लागला.

विरोधक मात्र राजाचे कान रोज भरतच होते. राजालाही आताशा सेनाचे वारंवार उशीर करणे खटकू लागले होते. ही गोष्ट राजाला स्वतःचा अपमान असल्यासारखी वाटली. एकेदिवशी राजाला लवकर दरबारात जावयाचे होते. राजाची दाढी करण्यासाठी आणि केस कापण्यासाठी सेनाला बोलावणे धाडले होते. सेना मात्र आपल्या रोजच्या पूजेत व्यग्र होता. तो काही गेला नाही. तो घरात नाही हे त्याच्या पत्नीने सैनिकांना खोटेच सांगितले. सैनिकांनी घराच्या खिडकीतून पाहिले असता सेना त्यांना पूजेत व्यग्र दिसला.

शिपायांनी घडलेली संपूर्ण हकीकत राजाला सांगितली. राजाला हे ऐकून प्रचंड राग आला. राजाने आपल्या सैनिकांना आज्ञा केली, ‘‘जा रे त्या न्हाव्याला  पकडून आणा. तो तसा नाही आला तर हातपाय बांधून पकडून आणा. त्याला एका पोत्यात बांधा आणि त्याला नदीत फेकून द्या किंवा त्याचं शीर धडावेगळं करा.’’

सैनिक निघाले. तेवढ्यात दारामध्ये सेना हजर. ते पाहून सैनिक मुकाट्याने परत फिरले. सेना राजाच्या समोर गेला. त्याने राजाला नमस्कार केला. राजाची हजामत केली. राजाचे केस कापले. राजाची मालीश करायला सुरुवात केली. राजाचं डोकं सकाळपासून सेना महाराजांना यायला उशीर झाल्यामुळे दुखत होतं. सेनाने राजाच्या डोक्याला हात लावल्याबरोबर राजाचं डोकं एकदम दुखायचं थांबलं. राजाला आराम वाटायला लागला. त्यामुळे राजाने आश्चर्याने आरशामध्ये बघितलं तर त्याला आरशामध्ये पांडुरंग दिसला. समोर पांडुरंग दिसतोय म्हणून राजाने वळून पाहिले तर त्याला सेना दिसला. राजाला वाटले आपल्याला भ्रम झाला असेल. पुन्हा राजाने डोळे मिटले. सेनाने पुन्हा मालीश करायला सुरूवात केली. सकाळपासून राजाच्या अंगामध्ये थोडासा ताप होता. अंग तापाने फणफणत होतं; पण सेनाने मालिश केल्यानंतर राजाचं अंग दुखायचं थांबलं. ताप उतरला. राजाने पुन्हा डोळे उघडून बघितले तर त्याला आरशामध्ये पांडुरंग दिसला. म्हणून राजाने पुन्हा वळून पाठीमागे बघितलं. तिथं मात्र सेना होता. राजाचं डोकं चक्रावून गेलं.

कदाचित सेना पांडुरंगाची पूजा करतोय अशा प्रकारचा निरोप सैनिकांनी दिला म्हणून आपल्या मनामध्ये पांडुरंग असेल म्हणून आपल्याला सेनामध्ये पांडुरंग दिसत असेल, अशी राजाने स्वतःची समजूत घातली. राजा त्याच्या सेवेवर खूश झाला. सेनाच्या त्या सेवेवर खूश होऊन त्याने त्याला शंभर मोहरांची थैली बक्षीस म्हणून दिली. सेनाने आपली धोपटी घेतली आणि तो आपल्या घराकडे निघून गेला.

आता तुम्ही म्हणाल, सेना तर घरी पांडुरंगाची पूजा करत होता. इकडे राजाची सेवा करायला तो कसा पोहोचला? कधी पोहोचला? हे असं कसं काय? आपल्या भक्तासाठी देव वाटेल ते करायला तयार होतो हे त्याचं आदर्श उदाहरण आहे. माझ्या भक्ताला माझ्या पूजेमुळे उशीर होतोय, त्यामुळे त्याला त्याची शिक्षा मिळत असेल तर माझ्या भक्ताची मदत मी केली पाहिजे ही देवाची कायम भावना असते. म्हणून जेव्हा केव्हा भक्तावर संकट येतं, तेव्हा देव धावून येतो. संकटांमध्ये तो कधीही भक्ताला एकटं पडू देत नाही. सेनावर आलेलं संकट ओळखून देव स्वतः सेनाचे रूप घेऊन त्या राजाच्या महालामध्ये राजाची सेवा करण्यासाठी हजर झाला. पांडुरंग न्हावी बनला. त्या राजाची पांडुरंगाने मसाज केली. सेनाच्या घरी पोहोचल्यानंतर पांडुरंगाने मोहरांची पिशवी खुंटीवर अडकवली आणि पांडुरंग मात्र अदृश्य झाला.

तिकडे सेनाची पूजा संपली. तो धोपटी घेऊन राजवाड्याकडे निघाला. राजवाड्याच्या महालाच्या दारातून आत आल्यानंतर त्याने समोर बघितलं. राजा वीरसिंह दारातच उभा होता पण एकदम शांत. निवांत. एकदम खूश.  राग नाही, नाराजी नाही.

सेना म्हणाला, ‘‘महाराज मला माफ करा. देवाच्या पूजेमध्ये अडकल्यामुळे मला यायला थोडा उशीर झाला. मला क्षमा करा.’’

राजा म्हणाला, ‘‘वेडा आहेस का? सेना, अरे सकाळी तूच तर आला होतास. तूच माझे केस कापलेस. तूच माझी मसाज केलीस. तूच माझं अंग चेपून दिलंस. म्हणून तर मला एवढं छान वाटतंय.’’

सेना म्हणाला, ‘‘मी तर घरी पूजा करत होतो. मी आलोच नाही.’’

‘‘अरे वेडा आहेस का तू?’’ राजा म्हणाला, ‘‘एक काम कर, तू तुझी धोपटी उघड बरं. मी तुला सकाळी शंभर सोन्याच्या मोहरा दिल्यात. पहा बरे आहेत का त्यात!’’

सेनाने धोपटी उघडली. धोपटीत मोहरांची पिशवी तशीच होती. मोहरांची पिशवी उघडली. त्यात शंभर मोहरा तशाच होत्या. त्याला कळलं की माझा देव माझ्यासाठी न्हावी बनला. देवा मी स्वत:ला तुझा दास म्हणवतो पण इथे तर तूच माझा दास बनलास. आपल्या भक्तासाठी किती त्रास करून घेशील रे देवा! सेना स्वत:शीच म्हणाला. त्याचे मन भरून आले.

राजालाही आता कुठे सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला. राजा वीरसिंहाने सेनाचे पाय धरले. राजा म्हणाला, ‘‘सेना महाराज, भक्तीतले खरे राजे तुम्ही आहात. भक्तितले खरे गुरू तुम्ही आहात. तुम्ही शिष्य म्हणून माझा स्वीकार करा. मला ज्ञान द्या. मला अनुग्रह द्या.’’

सेना न्हाव्याने राजाचे दोन्ही खांदे धरले. त्याला उठवून उभं केलं. सेना म्हणाला, ‘‘महाराज तुम्ही आहात. मी तुमचा सेवकच आहे. आपण असं काय बोलताय?’’

वीरसिंह म्हणाला, ‘‘नाही, नाही! आजपासून मी तुमचा शिष्य आणि तुम्ही माझे गुरु!’’

सेना न्हाव्याने त्या राजाचा शिष्य म्हणून स्वीकार केला. त्याला ज्ञान दिलं. अशीच कीर्ती वाढता वाढता सेना महाराजांचे शिष्य संपूर्ण भारतभर वाढले. सेना महाराजांनी सामान्य माणसाला मार्गदर्शन करण्यासाठी अभंग लिहिले. त्यांचे अभंग आजही घराघरातून भक्तिभावाने गायले जातात. त्यांचा एक अभंग शिखांच्या पवित्र ग्रंथ गुरूग्रंथसाहिब या ग्रंथात देखील समाविष्ट आहे. संत नामदेवानंतर हा मान फक्त त्यांनाच मिळाला आहे. त्यांच्या कीर्तनाला प्रचंड संख्येने लोक हजर असत.

संपूर्ण देशभर त्यांची कीर्ती पोचली. आजही संपूर्ण देशामध्ये सेना महाराजांचे आश्रम आहेत. मठ आहेत. त्यांची शिष्य परंपरा आजही भारतभर आहे. जरी मराठी भाषेतून त्यांनी जास्त लेखन केलं असलं तरीही महाराष्ट्रापेक्षा त्यांना मानणारा वर्ग उत्तर, मध्य भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आहे. ते जरी बांधवगडचे असले तरी पंढरीच्या पांडुरंगाशी त्यांचा पिढ्यान् पिढ्यांचा अनुबंध मात्र त्यांनी जपला होता. तोच अनुबंध त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी सुद्धा जपलेला आहे. तोच अनुबंध आपण जपूया. जसा या संतांच्या मदतीला देव आला तसाच देव तुमच्या आमच्या मदतीला येवो अशी देवाकडे प्रार्थना करूया. सेना महाराजांना कोटी कोटी नमस्कार.

– रमेश वाघ 

‘चपराक’ प्रकाशनच्या ‘महाराष्ट्राचे विचारदुर्ग’ या संग्रहातून

ज्ञानियांचा राजा माउली, भक्तिचा महिमा भारतभर पोहचविणारे संत नामदेव, श्रमसंस्कृतीला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे संत सावता महाराज, सर्व संतांचे काका गोरोबाकाका, संत नरहरी सोनार, कुविचारांची हजामत करणारे संत सेना न्हावी महाराज, सर्वांगी चोखळा असलेले संत चोखामेळा, शांतिब्रह्म एकनाथ महाराज, जगद्गुरू तुकाराम महाराज, समर्थ रामदास स्वामी अशा दहा संतांच्या जीवनावर आधारित असलेले हे दहा लेख म्हणजे दाही दिशांचा वेध घेणारे आणि आपल्या अंतःकरणातील भक्तिचे, प्रेरणेचे, प्रेमाचे, करूणेचे, मानवतेचे दिवे प्रज्वलित करणारे अस्सल साहित्य आहे.

‘महाराष्ट्राचे विचारदुर्ग’ घरपोच मागविण्यासाठी

महाराष्ट्राचे विचारदुर्ग

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा