वापसी

संध्याकाळचे सात वाजले होते. पाचगणीसारख्या थंड हवेच्या ठिकाणी आता अंधार पसरू लागला होता. थंडीचा कडाकाही वाढला होता. यावर्षी नोव्हेंबरमध्येच चांगली थंडी जाणवू लागली होती.

 

उद्या संध्याकाळी सहा वाजता याच स्पॉटवर भेटायचे ठरवून मार्टिना आणि पंकजने एकमेकांचा निरोप घेतला.मार्टिना आणि पंकज एकमेकांचे क्लासमेट होते. पाचगणीच्या रेसिडंट स्कूलमध्ये शिकत होते. पहिलीपासून त्यांची मैत्री होती. मार्टिना पणजी येथून आलेली होती. तिच्या वडिलांचा तेथे वाईनचा मोठा व्यवसाय होता. मुलीला गोव्यापासून दूर पाठवून तिच्यावर चांगले संस्कार व्हावेत म्हणून पाचगणीच्या शाळेत घातले. गोव्याच्या अँग्लोइंडियन वातावरणात तिच्यावर वाईट संस्कार होऊ नयेत म्हणून एकुलत्या एका मुलीला छातीवर दगड ठेवून त्यांनी आपल्यापासून, गोव्याच्या वातावरणापासून दूर ठेवलेे. प्रथम प्रथम मार्टिनाने बराच विरोध केला, खूप रडली पण मग येथील वातावरणात बर्‍यापैकी रूळली.

पंकज भाटिया, पंजाबमधला कटीला पुत्तर, वडिलांचा लुधियाना येथे गरम कपड्यांचा मोठा होलसेल व्यापार. घरची अपार संपत्ती. सुबत्ता पण तरीही पंकज अतिशय विनयशील. वडिलांची आज्ञा शिरसावंद्य मानून तो पाचगणीला आलेला. त्याच्या वडिलांचे शिक्षणही पाचगणीलाच झालेले म्हणून त्यांना या शाळेविषयी, तेथील शिक्षकांविषयी विशेष स्नेह. त्यामुळे पंकज पुत्तरची रवानगी त्यांनी पाचगणीच्या त्या शाळेत केली.

शाळेत असताना घरची आठवण येऊन रडणार्‍या मार्टिनाला समजावणारा पंकज नकळत तारूण्यात पदार्पण केल्यावर तिच्या प्रेमात पडला. त्याला मार्टिना आवडू लागली. किंचित अपरं नाक, नाजूक बांधा, गोरीपान, उंच, स्टायलिश मार्टिनाशिवाय त्याला आता करमेनासे झाले. आग दोनो तरफ बराबर लगी थी! मार्टिनाची स्थिती पण पंकजसारखीच होती. ती त्याच्या प्रेमात अखंड बुडाली होती. म्हणून शाळा सुटल्यावर काही खरेदी करण्याच्या निमित्ताने दोघेही बाहेर पडायचे आणि पाचगणीच्या पुढे एका विशिष्ट जागेवर भेटायचे. एका दगडावर बसून समोरचा डोंगर, खाली विस्तारलेली दरी, अस्ताला जाणार्‍या सूर्याच्या साक्षीने लग्नाच्या आणाभाका घ्यायचे. लहान वयात फुललेलं त्यांचं हे प्रेम तसं निष्पाप, निर्व्याज होतं पण लग्नासाठी अद्याप त्यांना खूपच प्रतीक्षा करावी लागणार होती.

एकेदिवशी ठरलेल्या स्पॉटवर दगडावर दोघेही बसले होते. आज माटिर्र्नाचा मूड खूप छान होता. तिचा आज वाढदिवस होता. आज तिने ‘स्वीट सिक्स्टीन’मध्ये पदार्पण केले होते. छानसा गुलाबी फ्रॉक घालून ती आज एखाद्या परीसारखी भासत होती. तिने आज पंकजसाठी पेस्ट्री आणली होती आणि पंकजने तिच्यासाठी छानसे नेकलेस. ते तिच्या गळ्यात घातल्यावर मार्टिनाने पंकजला केक खाऊ घातला. आज पंकज अनिमिष नेत्राने मार्टिनाचे सौंदर्य न्याहाळत होता. तिचे ते भावूक स्वप्नाळू डोळे, नाजूक गुलाबी ओठ, मोत्यासारख्या दंतपक्ती, भुरे कुरूळे वार्‍यावरती उडणारे केस! सारं काही वेड लावण्यासारखं होतं. तीचं ते आरसपानी सौंदर्य तो मंत्रमुग्धपणे न्याहाळत होता. त्याला आता कशाचंच भान उरलं नव्हतं. संध्याकाळचे सात वाजून गेले होते. आता हॉस्टेलला परतणं भाग होतं म्हणून पंकजला भानावर आणण्यासाठी मार्टिनाने त्याला हलकासा धक्का दिला.

‘‘अरे! काय पाहतोस असा, इडीयट…’’ आणि तिचा तोल गेला. तिचा शेवटचा शब्द ई… डी… य… ट… हा आवाज दुरावत गेला. पंकज भानावर आला तेव्हा मार्टिना त्याच्यासमोर नव्हती पण तिची आर्त किंकाळी ऐकून बरेच लोक तेथे जमा झाले होते आणि दरीत वाकून वाकून पाहत होते. पंकज त्यांना काय झाले? काय झाले? म्हणून विचारत त्यांच्याप्रमाणेच दरीत डोकावून पाहू लागला आणि मग मार्टिना कुठे गेली? ह्याचा विचार आल्यावर तो मनातून जबरदस्त हादरला. त्याची नजर त्या गर्दीत मार्टिनाला शोधू लागली. तो वेड्यासारखा ‘मार्टिनाऽ मार्टिनाऽऽ’ म्हणून पुकारू लागला तेव्हा त्याला जाणीव झाली दरीत कोसळलेली ती व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून मार्टिनाच होती.

दुसर्‍या दिवशी अग्निशमनच्या लोकांनी छिन्नविछिन्न झालेला मार्टिनाचा मृतदेह शोधून काढला. तिच्या शाळेत अंत्यदर्शनासाठी तिचा मृतदेह ठेवण्यात आला. तिचे शिक्षक, तिचे मित्र-मैत्रिणी हमसून हमसून रडत होते. पंकज मात्र भकास नजरेने शून्यात पाहत होता. क्षणात त्यांची कोवळी स्वप्ने भंग पावली होती. खळखळून हसणारी, वाढदिवस त्याच्याबरोबर मोठ्या आनंदाने साजरी करणारी त्याची जीवलग मैत्रीण त्याला सोडून दूरच्या प्रवासाला निघून गेली होती. मार्टिनाच्या वडिलांनी शवपेटीमधून तिचे प्रेत पणजीला नेले व मार्टिनाचे या जगातील अस्तित्व संपले. पंकज सैरभैर झाला.

अपघात असल्यामुळे पोलिसांकरवी पंकजचीही चौकशी झाली पण त्याची निरागसता, शाळेतील त्याचे वर्तन व शाळेच्या शिक्षकांनी व त्याच्या वर्गमित्रांनी त्याच्या वर्तनाचा दिलेला निर्वाळा यामुळे पंकजला सोडून देण्यात आले. याचा त्याच्या कोवळ्या मनावर फारच परिणाम झाला. त्याने जेवणखाण सोडले. त्याचे अभ्यासातही लक्ष लागेना. वर्गातील बेंचवरील मार्टिनाची खाली जागा त्याला बेचैन करू लागली आणि त्याने निर्णय घेतला, स्वतःला संपविण्याचा!

पण त्याचवेळी नाताळच्या सुट्या लागल्या होत्या. एकदाच आई, वडील, बहिणीला भेटून यावं म्हणून तो लुधियानाला जाऊन आला. येताना आजीच्या झोपेच्या गोळ्यांची पूर्ण बाटली तो घेऊन आला होता. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुट्टी संपवून आल्यावर त्याने एक दिवस संपूर्ण झोपेच्या गोळ्याची बाटली घशाखाली उतरवली आणि तो त्यांच्या मिटींग पॉईंटवर असलेल्या नेहमीच्या दगडावर जाऊन बसला. हळुहळु झोपेच्या गोळ्यांचा अंमल वाढू लागला. त्याला पेंग येऊ लागली व तो मागील बाजूस कलंडला. जानेवारी महिना, कडाक्याची थंडी, त्यामुळे महाबळेश्वर, पाचगणीचा ऑफ सिझन होता म्हणून माणसांची वर्दळही कमी होती. पंकजकडे कुणाचे लक्ष न जाणे स्वाभाविक होते. दुसर्‍या दिवशी सकाळी थंडीत आकडलेला पंकजचा मृतदेह तेथील एका स्थानिकाला आढळला. त्याने घातलेल्या स्वेटरवर शाळेचा लोगो असल्याने हा येथील शाळेचा विद्यार्थी असावा असा त्याने अंदाज बांधला व ही गोष्ट त्याने शाळेच्या प्रिन्सीपलला कळवली. एका महिन्याच्या अवधीत एकाच शाळेतील एकाच वर्गात शिकणारे दोन जीव अनंताच्या प्रवासाला निघून गेले होते. शाळा हळहळली, शिक्षक हळहळले, मित्रमैत्रिणी हळहळल्या पण त्यांची पर्वा न करता मार्टिनाच्या भेटीला पंकज न परतण्यासाठी निघून गेला होता. हळुहळु ही घटना विस्मृतीच्या पडद्याआड गेली.

पाहता पाहता जून महिना उजाडला. पुण्याला शिकण्यासाठी येणार्‍या लोेंढ्यामध्ये बरीच मुले उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश आणि गुजरातमधून आलेली होती. भारती विद्यापीठामध्ये इंजिनियरींगला प्रथम वर्षात शिकणारी ही मुलं देशाच्या वेगवेगळ्या प्रदेशातून जरी आली असली तरी त्यांची क्षणात दोस्ती झाली. कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन झाल्यावर राहण्यासाठी फ्लॅट शोधण्यासाठी त्यांची भटकंती सुरू झाली. त्यांचे शोधकार्य लवकरच संपुष्टात आले आणि कॉलेजच्या समोरच त्यांना दोन बेडरूमचे दोन फ्लॅट वाजवी भाड्यात मिळाले.

मनिष, अक्षय, वेदांत, अमेय व वीरसिंग एका फ्लॅटमध्ये राहू लागले तर बाळगोंडा, हरिहरन, जितेन्द्र आणि लातूरकडचा सखाराम एका फ्लॅटमध्ये राहू लागले. नवीन शहर, नवीन कॉलेज, नवीन संवंगडी आणि घरापासून दूर स्वतंत्र वातावरण, मुलं फारच खूश होती. पाच दिवस कॉलेजला नियमित जायचे व शनिवार-रविवार मस्त एन्जॉय करायचा असा त्यांचा आठवड्याच्या शेवटी कार्यक्रम ठरलेला असायचा. कधी खडकवासला, कधी सिंहगड तर कधी लोणावळा अशी त्यांची भटकंती चालायची. त्यात त्यांच्याकडील पाच जणांकडे टू व्हिलर होत्या. त्यांनी त्या आपल्या गावाहून मागवून घेतल्या होत्या. म्हणून त्यांची खूपच सोय झाली होती.

नोव्हेंबरमध्ये फर्स्ट सेमिस्टरच्या परीक्षा संपल्या होत्या. डिसेंबरमध्ये प्रत्येकजण आपापल्या घरी जाऊन आले होते. आता जानेवारी महिना सुरू झाला होता. कॉलेजची सेकंड टर्म सुरू झाली होती. परीक्षांना एप्रिल-मे उजाडणार होता. अभ्यासालाही बराच अवधी मिळणार होता म्हणून सर्वजणच मस्तीच्या मूडमध्ये होते. अद्यापपावेतो पुणे, पुण्याजवळील सर्व ठिकाणे पाहून झाली होती पण थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेले महाबळेश्वर त्यांनी पाहिले नव्हते.

‘‘चलो! आज महाबळेश्वर चलते है!’’ दुपारचे जेवण उरकल्यावर साधारणतः दोनच्या सुमारास अक्षयने मित्रांपुढे प्रस्ताव मांडला.

‘‘अभी? अरे नही! बहुत देर हो जाएगी और इत्मीनान से महाबळेश्वर देख भी नही पायेंगे!’’ वीरसिंह बोलला.

‘‘हमे कहा वहाँ रहना है! अभी निकले तो करीबन पांच बजे पहुँच जायेंगे! पंचगणी, महाबलेश्वर घुमेंगे, रात को खाना खा के वापिस! चलो चलो, आज मूड बन गया है. अब मूड खराब मत करो!’’ अजय म्हणाला.

त्याच्या म्हणण्याशी सर्वजण सहमत झाले आणि आहे त्याच कपड्यात ते बाईकवर स्वार झाले. त्यांच्या पाच बाईक सुसाट वेगाने महाबळेश्वरकडे रवाना झाल्या. पुणे-बेंगलोर महामार्ग चांगला असल्याने ते पाच वाजायच्या आत पाचगणीला पोहोचले. प्रत्येक पॉईंटवर पाच-दहा मिनिटे हजेरी लावत ते वेण्णा लेकवर पोहोचले. तेथे मनसोक्त बोटिंग, घुडसवारी करून त्यांनी स्वीट कॉर्नवर यथेच्छ ताव मारला. तसा जानेवारी महिना हा सिझनचा महिना नसल्याने महाबळेश्वरमध्ये गर्दीही बरीच कमी होती. एक फेरफटका टेबल पॉईंटवर मारल्यावर ते नऊजण मॅप्रो गार्डनमध्ये गेले. रविवारी सकाळच्या फिस्टमध्ये नॉनव्हेज असल्यामुळे त्यांची पोटं तशी भरलेलीच होती. मॅप्रो गार्डनमधील ग्रील सॅण्डविचनी ती तुडुंब भरली. एव्हाना रात्रीचे अकरा वाजले होते. तरीही त्यांचा पाय महाबळेश्वरमधून निघत नव्हता. दुसर्‍या दिवशी कॉलेजला जाणे भाग होते म्हणून नाईलाजाने ते परतीच्या प्रवासाला लागले.

free spirits and love of nature, love, sightseeing

पाचगणी ओलांडून पसरणी घाट सुरू झाला. एक-दोन किलोमिटरचे अंतर क्रॉस केल्यावर जितेंद्रच्या इशार्‍यानुसार अक्षयने मोटरसायकल थांबवली. जीतूला लघुशंकेला जायचे होते. जितेंद्र शहा हा त्यांच्यातील सर्वात हुशार, अभ्यासू, पापभिरू, शरीराने बारीकसा व मनाने देखील कोमल, घाबरट असणारा मुलगा. प्रत्येकवेळेला कुठेही जायचे असेल तरी ह्याच्या मनात शंका-कुशंका निघायच्या. ‘मग असं झालं तर?’ ‘नको रे बाबा रिस्क घ्यायला’ हे त्याचे पालुपद सुरू असायचे पण अक्षय आणि वीरू नेहमीच त्याची समजूत घालून त्याला बरोबर न्यायचे. उद्देश एवढाच की त्याची अनाठायी भीती घालवायची. याही वेळी रात्री तो महाबळेश्वरला यायला तयार नव्हता पण सर्वांनी जास्तच फोर्स केल्यावर तो भीतभीतच महाबळेश्वरला आला होता.

अक्षयची मोटरसायकल थांबलेली पाहून सर्वांनीच आपापल्या गाड्या थांबविल्या व सर्वांनी ठरावीक अंतरावर उभे राहून लघुशंका उरकली आणि लागलीच ते पुण्याकडे रवाना झाले. रात्रीचे बारा वाजून गेले होते. जानेवारी महिन्यातील बोचरी थंडी हातापायांना झिणझिण्या आणत होती. मिट्ट अंधार आणि सोबतीला रातकिड्यांचा कर्कश आवाज. वातावरण अधिकच भयावह जाणवत होतं. कितीही नाही म्हटलं तरी प्रत्येकाच्या मनात भीतीनं घर केलं होतं पण आता मागे परतण्यात अर्थ नव्हता. पुढे जाणं भागच होतं.

जितूने लघुशंका केल्यावर तो अक्षयच्या बाईकवर मागे बसला आणि नेहमीप्रमाणे त्याने आपला उजवा हात अक्षयच्या खांद्यावर ठेवला. अक्षय चरकला. नाजूक आणि बारीक चणीच्या जितूचा हात आज त्याला पोलादी वाटत होता. एवढ्यात जितूने दुसरा हात त्याच्या डाव्या खांद्यावर ठेवला. त्याच्या दोन्ही हाताच्या वजनाने अक्षय अक्षरशः पुढे सरकला. आता त्या हातांचा भार त्याला सहन होईना.

‘‘जितू! अरे, यार यह क्या कर रहा है तू! पुरा भार मेरे बदन पे डाल रहा है! मुझे बाईक चलाने मे तकलिफ हो रही है! जरा ठीक से बैठ!’’ अक्षय म्हणाला.

यावर जितूने त्याला काहीच उत्तर दिले नाही पण आपले दोन्ही हात अक्षयच्या खांद्यावरून काढून घेतले.

आता रात्रीची भयानकता वाढली होती. जितूशी गप्पा मारून मनातील भीती कमी होईल, या उद्देशाने अक्षय जितूला म्हणाला, ‘‘जीतू! कुछ भी हो यार! आज महाबलेश्वर मे मजा आ गया! है न?’’ तरीही जितू गप्पच!

‘‘अरे! तू चूप क्यों है? कुछ तो बोल ना! ताकी इस घने जंगल मे घबराहट कम हो!’’

तरीही जितूचे एक नाही की दोन नाही. एरवी पोपटासारखा चुरूचुरू बोलणारा, प्रत्येकाला आध्यात्माचे धडे देणारा जितू यावेळी असा का विचित्र वागतोय याचेच अक्षयला आश्चर्य वाटत होते पण जितू तसा मुडीही होता. अभ्यासात तर तो इतका रमायचा की दोन-दोन दिवस त्याला जेवणाची पण शुद्ध नसायची. म्हणून अक्षयने त्याकडे दुर्लक्ष केले. तो मोठमोठ्याने सिनेमाची गाणी गाऊ लागला. त्याचे पाहून इतर सर्वजणही गाणे गाऊ लागले. मस्ती भरे तराण्यात रंगलेले ते साधारणतः दोन वाजता पुण्यात येऊन पोहोचले.

आता झोपणे आवश्यक होते तरीही त्यातील काही जणांचा मस्तीचा मूड होता. वीरू, अमेय, हरीहरन यांनी ड्रॉईंग रूममध्ये बसकण मारली. ते पत्ते खेळू लागले कारण आता त्यांची झोप चाळवली होती. जितू मात्र मोटरसायकलवरून उतरून सरळ बेडरूममध्ये जाऊन आपल्या कॉटवर बसला होता. त्याचे डोळे तांबारलेले दिसत होते. चेहरा कठोर वाटत होता व तो ‘मुझे वापस जाना है’, असे तोंडातल्या तोंडात पुटपुटत होता.

‘‘अरे! जितू, तू यह क्या बडबडा रहा है? कबसे देख रहा हूँ, तू न कुछ बोलता है, न मेरी किस बात का तू जवाब देता है?’’ असे बोलून अक्षयने त्याचा खाली घातलेला चेहरा हाताने वर उचलला तोच त्याचा हात त्वरेने झटकत जितूने त्याच्याकडे एकवार खूनशी नजरेने पाहिले. एकदम उडी मारून तो समोरच्या खिडकीत ग्रीलला पकडून उकीडवा बसला. तो रस्त्याकडे पाहू लागला. पुनः पुनः तो ‘मुझे वापस जाना है’ असे पुटपुटत होता. त्याचा व अक्षयचा संवाद ऐकून पत्ते खेळणारे वीरू, अमेय व हरीहरन बेडरूममध्ये आले. जितूला असे खिडकीत ग्रीलला पकडून माकडासारखे बसलेले पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. तेथे पडलेल्या खुर्चीवर बसत वीरूने जितूला छेडीत म्हटले, ‘‘अबे ओ बंदर की औलाद, खिडकी से नीचे क्या झाँक रहा है? अब इतनी रात को किसको ढुंढ रहा है? नीचे क्या तेरी गर्लफ्रेंड तेरा इंतजार कर रही है?’’ आणि सर्वजण खो खो हसू लागले.

जितूने सावकाशीने मान वळवून एक जळजळीत कटाक्ष वीरूकडे टाकला आणि त्याने त्याला इतक्या जोराने लाथ मारली की मजबूत अंगयष्ठीचा वीरू खुर्चीसकट बेडरूममधून ड्रॉईंगरूममध्ये जाऊन कडमडला. हे दृश्य विस्फारल्या नजरेने अमेय, अक्षय, हरीहरननी पाहिले व त्यांची पाचावर धारण बसली. भीतीने ते सर्वजण गर्भगळीत झाले. त्यांच्या हातापायांना कापरे भरले. तोंडाला कोरड पडली. वीरूची हालत तर विचारायची सोय नव्हती. एवढा मोठा मजबूत हाडापेराचा पंजाबी गडी पण भीतीने त्याची बोबडीच वळली होती. चेहरा पांढराफटक पडला होता. त्याची बाहेरच्या खोलीतून आतल्या खोलीत येण्याची हिंमत होत नव्हती. आता मात्र जणू अणिबाणी येऊन ठेपली होती. महाबळेश्वरहून निघाल्यावर पसरणी घाटामध्ये लघुशंकेसाठी थांबल्यानंतरचा जितूच्या वर्तणुकीतला फरक अक्षयच्या चांगलाच लक्षात आला होता. त्याने अक्षयच्या खांद्यावर ठेवलेले हात त्याला मणामणाच्या ओझ्यासारखे वाटत होते. त्याचवेळी हे काही वेगळच प्रकरण आहे हे अक्षयच्या लक्षात आले. म्हणून तो चांगलाच गंभीर झाला होता. बाकी सर्वजण बाहेरच्या रूममध्ये अंग चोरून बसले होते. आतल्या खोलीतून बाहेरच्या खोलीत येऊन अक्षय त्या तिघांकडे पाहून म्हणाला, ‘‘यार वीरू, हमे अभी के अभी जितू को लेके महाबलेश्वर जाना है!’’

त्याचे हे वक्तव्य ऐकून ते तिघेजण उडालेच.

‘‘अभी? इस वक्त? ओर जितू को लेके? ना बाबा ना! अपनी तो हिंमत नही है!’’ वीरू म्हणाला.

अमेय आणि हरीहरनेही त्याला संमती देत माना डोलावल्या पण अक्षयने प्रसंगाचे गांभीर्य त्यांना समजावून सांगितले. त्यामुळे तर ते अजिबातच यायला तयार होईनात. अक्षयने मग मनिष, वेदांत आणि सखारामलाही शेजारच्या फ्लॅटमधून उठवून आणले आणि आता हा प्रश्न महाबळेश्वरला गेल्याशिवाय सुटणार नाही हे पटविले. एव्हाना रात्रीचे तीन वाजून गेले होते. खरंतर जितूच्या अशा परिस्थितीची त्यांना कीव पण वाटत होती पण मनावर भीतीचे सावट पसरलेले होते. एकदाचे सर्वजण हातमोजे, स्वेटर, टोप्या घालून महाबळेश्वरला जाण्यासाठी सज्ज झाले. आता जितूला कोणाच्या मोटरसायकलवर घ्यायचे? सारेच घाबरत होते. शेवटी अक्षयने सर्वांची समजूत काढली. तो म्हणाला, ‘‘जितू बोलता है ना मुझे वापिस जाना है! मतलब इसे वापस महाबलेश्वर जाना है, तो खुशी से वहाँ जाने को तैय्यार हो जायेगा! हमे परेशान नही करेगा! तो घबराने की बात नही है’’ अन् झालेही तसेच.

अक्षय जितूला म्हणाला, ‘‘चलो दोस्त! वापस चलना है ना? चलो चलते है’’ अक्षयने हे म्हणण्याचा अवकाश की जितूच्या डोळ्यात चमक आली आणि तो शहाण्या मुलाप्रमाणे जायला तयार झाला. पुनश्चः प्रश्न आला. जाताना मध्येच जितूने चालत्या मोटरसायकलवरून उडी मारली तर? किंवा काही उपद्व्याप केला तर? म्हणून मग वीरूने गाडी चालवावी, जितूला मध्ये बसवून अक्षयने जितूच्या मागे बसावे म्हणजे जितूच्या हालचालींवर लक्ष ठेवता येईल असे ठरले आणि मग सर्वजण महाबळेश्वरकडे निघाले. रस्त्यात कोणीही कोणाशी बोलत नव्हते.

सकाळी सोडेपाच वाजता ते पसरणी घाट चढू लागले. घाट संपायच्या एक-दीड किलोमिटर अलीकडे वीरूची मोटरसायकल पोहोचल्यावर जितूने वीरूच्या खांद्यावर आपले दोन्ही हात ठेवले. त्याबरोबर वीरू जवळजवळ ओरडलाच. ‘‘अबे! जितू यह तू क्या कर रहा है? हात निकाल. चल पहले हात हटा मेरे कंधोपर से।’’

तोच अक्षय भानावर आला व त्याने वीरूला तेथेच मोटरसायकल थांबवायला सांगितली. जितूने ठेवलेल्या हाताखाली वीरूचे खांदे दबल्यामुळे आधीच वीरूच्या मोटरसायकलची स्पीड कमी झाली होती. अक्षयने सांगितल्याबरोबर तर पडत्या फळाची आज्ञा घेऊन वीरूने करकचून ब्रेक दाबला व ते त्या जागी थांबले. त्यांचे पाहून इतर मोटरसायकलीही थांबल्या. अक्षय मोटरसायकलवरून उतरला. जितूही उतरला व तो शांतपणे त्या दगडावर जाऊन दरीकडे तोंड करून खाली पाहत बसला. त्याचे ते शांतपणे उतरणे, त्या दगडावर जाऊन बसणे, ओणवे होऊन दरीत डोकावणे, सर्वजण अचंबित होऊन पाहत होते.

आता थोडे थोडे उजाडू लागले होते. त्यामुळे काल रात्री आपण सर्वजण येथेच लघुशंकेसाठी थांबलो होतो हेही सर्वांना पाहताक्षणीच जाणवले होते. जितूने पण त्या दगडावर जाऊनच लघुशंका केली होती, हे देखील सगळ्यांच्या लक्षात आले होते. तेथूनच ‘तो’ जो कोणी होता ‘तो’ जितूबरोबर पुण्याला आला होता पण त्याला परत त्याच ठिकाणी जायचे होते. म्हणूनच तो ‘मुझे वापिस जाना है’ म्हणून सारखे म्हणत होता आणि आता त्याच ठिकाणी येऊन एकदम शांत झाला होता.

त्याच्याकडे पाहत सर्वजण तसेच उभे होते. आता उजाडू लागले होते. तेथील रहिवाशांची तुरळक ये-जा सुरू झाली होती. तोच तिथे जॉगिंग करीत पंकजच्या शाळेचे प्राचार्य आले त्या दगडावर जितूला बसलेले पाहून ते थबकले. त्यांना गेल्यावर्षीचा तो जानेवारी महिना आठवला. याच दिवशी पंकजने मार्टिनाच्या विरहामध्ये याच दगडावर आपली इहलीला संपवली होती आणि दरीत पडून मृत झालेल्या मार्टिनाच्या भेटीला ते कोवळे पोर निघून गेले होते. काही कारणाने जितूने पंकजला डिवचले होते म्हणून तो जितूवर स्वार झाला होता. अन्यथा जितूला त्रास देण्याचा त्याचा हेतू नव्हता पण पुण्याला जितूसोबत गेल्यावर पंकजला मार्टिनाची याद व साद सतावू लागली होती. म्हणूनच परत जाण्याचा हट्ट त्याने धरला होता. त्याच्यात झालेल्या बदलामुळे ‘हे काहीतरी वेगळंच प्रकरण दिसतंय’ हे अक्षयच्या लक्षात आले होते. त्यामुळे त्याने रात्री महाबळेश्वरला येण्याचे निश्चित करून हे धाडसी पाऊल उचलले होते. थबकलेल्या प्राचार्य साहेबांकडे पाहून यांना नक्कीच या जागेचे गुपित माहीत असावे, असे अक्षयला वाटले. त्याने त्यांना अभिवादन करून स्वतःची ओळख करून दिली व रात्री घडलेला हा किस्सा सविस्तरपणे निवेदन केला.

‘‘अच्छा!  तो ये बात है’’ म्हणून प्राचार्य साहेबांनी गेल्या नोव्हेंबर व नंतर जानेवारी महिन्यात घडलेले ते हृदयद्रावक किस्से जितूच्या सर्व मित्रांना ऐकवले. ते ऐकून सर्वजण सर्दच झाले आणि पंकज आणि मार्टिनाच्या आठवणींनी प्राचार्यांच्या डोळ्यात पाणी तरळले.

‘माय लिटिल पुअर चाईल्ड, ओ गॉड, प्लीज ब्लेस हिम अ‍ॅन्ड गिव हिम अ पीस फोरएवर’ असे म्हणून प्राचार्य शाळेकडे रवाना झाले.

आता दिवस चांगलाच वर आला होता. समोरील डोंगर व दरी देखील उजळू लागली होती. सकाळचे आठ वाजले होते. अक्षय हळुहळु चालत जितूकडे गेला. अजूनही जितू त्या खोल दरीकडे पाहत होता. पाठीमागून अक्षयने आपला आश्वस्त हात जितूच्या खांद्यावर ठेवला आणि म्हणाला, ‘‘जितू, चलना है ना?’’

भानावर येत जितू एकदम म्हणाला, ‘‘अब जल्दी पूना चलो’’

आणि तो कपडे झटकत उठून उभा राहिला आणि अक्षयच्या मोटारसायकलवर पाठीमागे बसला.

आता त्या नऊ जणांच्या पाच मोटरसायकली पुण्याच्या दिशेने सुसाट वेगाने सुटल्या होत्या व जितूची रस्ताभर अखंड बडबड सुरू होती. आता त्याला गाठियाँ आणि फाफडे खाण्याची जबरदस्त इच्छा होत होती. अनावधानाने झालेल्या चुकीमुळे पंकजने जितूच्या शरीरात प्रवेश केला होता पण मार्टिनाने आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत त्याला आपल्या योनीत परतण्यास भाग पाडले होते. म्हणूनच एवढ्या कमी अवधीत जितूची सुखरूपपणे सुटका झाली होती. याचा आनंद या मित्रपरिवारामध्ये ओसंडून वाहत होता. जितूच्या आवडीच्या गाठी-फाफड्यावर सर्वजण यथेच्छ ताव मारत होते.

– चंद्रलेखा बेलसरे

(‘चपराक’ प्रकाशित ‘पाठलाग’ या कथासंग्रहातून)

कथासंग्रह घरपोच मागवण्यासाठी

पाठलाग

ई – पुस्तकासाठी

https://amzn.eu/d/cpqOXaB

 

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा