स्त्री-पुरूष मैत्री – आकर्षण, गरज की फॅशन?

‘सौहृदान सर्वभूतानां विश्वासो नाम जायते।’

मैत्रीमुळे सर्व प्राण्यांमध्ये एकमेकांविषयी विश्वास निर्माण होतो, असे मैत्रीविषयी म्हटले गेले असले तरी मैत्री या शब्दाची, त्यातील गर्भित भावनेची व्यापकता खूप मोठी आहे. मनुष्य समाजप्रिय प्राणी आहे. जन्मताच त्याला अनेक नाती मिळतात पण मैत्री हे असे नाते असते की ते त्याने स्वतः निर्माण केलेले असते. मनातले सांगायला, मन मोकळे करायला, खेळायला, हसायला, रडायला हक्काचे एक ठिकाण हवे असते आणि ते असते मैत्रीचे. कुठल्याही रागालोभाची, फायद्या-तोट्याची पर्वा न करता संकटात मदतीला धावून येतो तो खरा मित्र असतो. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी मैत्री निभावणारा मित्र असायलाच हवा. मग अशी मैत्री लाभलेला स्वतःला वैभवशाली, भाग्यशाली समजतो तेव्हा त्यात नवल ते काय!

ज्या व्यक्तिच्या जीवनात मित्र नाही त्याचा जीवनवृक्ष वाळवंटासाखा असतो. मनामनाचे, विचारांचे धागे जुळले की मैत्री आपोआप निर्माण होते. मैत्री गरीब-श्रीमंत, स्त्री-पुरूष असा भेद पाहत नाही. मैत्री फक्त पुरूष-पुरूषांमध्येच किंवा स्त्रिया-स्त्रियांमध्येच असावी असं काही नाही. पुरूष-स्त्रियांमध्येही चांगले मैत्रीचे संबंध निर्माण होतात. महाभारतातील कृष्ण-सुदामाची मैत्री, कर्ण दुर्योधनाची मैत्री आजही त्यांच्यातील खर्‍या मैत्रीचा आदर्श समोर ठेवतात तर कृष्ण-द्रौपदीची मैत्री किती निखळ, निर्व्याज आणि तेवढीच सुंदर होती. कृष्ण-द्रौपदी दोघे सुंदर, प्रतिभाशाली, महत्त्वाकांक्षी आणि सक्षम व्यक्तिमत्त्व होते परंतु मैत्रीचा एक धागा त्यांचे वेगळे विश्व निर्माण करणारा होता. द्रौपदी कृष्णाला सखा म्हणे तर कृष्ण द्रौपदीला सखी म्हणे.

 

कृष्णाच्या बोटाला जखम होताच महाराणी द्रौपदी आपल्या भरजरी शालुच्या पदराचा काठ फाडून त्या जखमेवर बांधते तर द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या संकटसमयी कृष्ण धावत येऊन तिच्या साडीची अखंडितता राखत  तिचे लज्जारक्षण करतो. हे सारेच अद्भुत. मैत्रीतील निर्व्याजता, निर्मळता, स्नेह, आपुलकी, प्रेम या सर्व भावना मानवी जीवनातील सुंदर इंद्रधनुष्यासारख्या असतात. मैत्री व्यक्तिला भरभरून देऊन संपन्न करते. ज्या व्यक्तिला अशी मैत्री मिळते ती व्यक्ती खरोखरच भाग्यवान आणि संपन्न म्हणावी लागेल परंतु अशी खरी मैत्री प्राप्त होणे दुर्मीळ असते.

व्यक्ती बालपणापासून नात्यापलीकडे जाऊन आपुलकीचा, प्रेमाचा आधार शोधत असते. ते जेथून मिळते त्याच्याशी त्याची मैत्री होते. बालपणात आपल्याच वयाच्या सवंगड्यांशी मुलांची लवकर मैत्री होते. बालपणातील निखळ मैत्रीचे बंध जीवनाच्या शेवटपर्यंत टिकून राहतात. बालपणी शाळकरी वयात निर्माण झालेली मैत्री लोभस असते. आंबट-गोड चिंचेसारखी तिची आठवण उतारवयातही आनंद देणारी असते. पुढे मुलं मुली 14-15 वर्षाचे झाले की आपल्या समवयस्क मित्रांच्या सहवासात जास्त रमतात. त्यांना त्यांची सोबत खूप आवडते. मुले आपल्या मित्रांशी तर मुली आपल्या मैत्रीणींशी तास न् तास गप्पा करण्यात रमतात. शाळेमध्ये मुलं-मुली अभ्यास, इतर अ‍ॅक्टिव्हिटीज एकत्र करतात. शाळेतील मैत्री बालवयात  एकमेकांना संपन्न करते. कुमारवयात मुलामुलींना मित्र असणे अत्यंत आवश्यक असते. मित्र नसतील तर ती एकलकोंडी होतात किंवा त्यांची मानसिक, भावनिक वाढ व्यवस्थित होत नाही.

तरूण वयात मुलामुलींना एकमेकांचे आकर्षण वाटते. त्यातून एकमेकांशी मैत्री करणे त्यांना आवडते. तरूण वयातील मुलामुलींना एकमेकांशी निखळ मैत्रीभावना असणे आवश्यक असते परंतु स्त्री-पुरूषात असणारे नैसर्गिक आकर्षण, एकमेकांबद्दल ओढ यामुळे तरूण वयात या आकर्षणापोटी मुलामुलींत मैत्री होते. मैत्रीमध्ये मग काही मुलां-मुलींचे पाऊल पुढे पडते. त्यांच्यात जवळीक निर्माण होते. प्रेम होते. प्रेमाच्या आणाभाका घेतल्या जातात. मैत्री आणि प्रेम यांच्यामध्ये एक पुसटशी रेषा असते ती या वयात ओळखता येत नाही. काही मैत्रीच्या नावाखाली मैत्रीच्या पलीकडे जाऊन आणि पती-पत्नीच्या अलीकडचे नाते निर्माण करतात. ते म्हणजे गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडचे. आज अगदी चौदा-पंधरा वर्षाचा मुलगा अभिमानाने सांगतो, ‘मला गर्लफ्रेंड आहे’ आणि मुलीही आपल्याला ‘बॉयफ्रेंड आहे’ असं सहजपणे सांगतात. सोशल मीडियाच्या सुळसुळाटामुळे मोबाईल, लॅपटॉप, थियटर्स यामधून ते जो संदेश घेतात त्यामुळे मुलामुलींमध्ये मोकळेपणा आला आहे आणि यातूनच गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडची फॅशन वाढली आहे. हॉटेलिंग, मजा मस्ती, गप्पा या सर्व गोष्टीत मैत्री अडकली जाते. गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडमध्ये हक्क, अधिकाराची भाषा सुरू होते. मजा, मस्ती, चुंबन, मीठी तर कधी आकर्षणापोटी शारीरिक संबंधही मुलामुलींमध्ये निर्माण होतात. मग पुढे कधी प्रेमाची नशा उतरल्यावर विचारांची फारकत झाल्यावर ब्रेकअप होतं. यात दोघांनाही मनस्ताप होतो. ही तरूण मुले डिप्रेशनमध्ये जातात. मग अगदी उमेदीच्या वयात या मुलामुलींच्या अभ्यासावर, करियरवर परिणाम होतो. या काळात बरंच काही हातातून निसटून जातं. काळ त्यावर औषध ठरतो. मागचं सर्व विसरून परत नवे मित्रमैत्रिणी, गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड शोधले जातात किंवा मिळवले जातात. नवी रिलेशनशीप आणि पुन्हा ब्रेकअप याचे मुला-मुलींना काही वाटेनासे झाले आहे. पुढे वय वाढतं तसा लग्नाचा विचार केला जातो. मैत्रीच्या नावाखाली मैत्रीच्या पुलाखालून असं बरंच पाणी वाहून जातं. खरी मैत्रीभावना यामध्ये कुठेतरी हरवून जाते. मग आयुष्य एक अ‍ॅडजेस्टमेंट बनते.

काही युवक-युवती मैत्रीचे नियम निभावत सच्च्या मित्र-मैत्रिणीसोबत जीवनाचे चार क्षण निखळ आनंद नक्की अनुभवतात. तरूण वयातील मैत्री खरंतर खूप काही नवं निर्माण करणारी असते. जागतिक मैत्री दिवस तर युवा-युवती मोठ्या उत्साहाने साजरा करतात. मैत्रीच्या नावाखाली पार्ट्या होतात. दुसर्‍या दिवशी अनेकदा वर्तमानपत्रात मथळे झळकतात, हॉटेलमध्ये तरूण-तरूणी बेहोश, नको त्या अवस्थेत आढळली. यालाच मैत्रीदिन म्हणायचे का? मैत्रीचा अर्थ यांना माहीत नाही. एक फॅशन, फॅड म्हणूनच मैत्रीचा ते उपयोग करतात. त्यांच्यावर इतर संस्कारांबरोबर मैत्रीचे संस्कार करण्याची, मैत्री म्हणजे काय हे शिकविण्याची गरज आहे काय? हा प्रश्न हे सगळं पाहिल्यावर मनात आल्याशावाय राहत नाही. खरं तर मुला-मुलींची तरूण वयातील मैत्री एकमेकांसाठी पोषक, पूरक असते. कॉलेजमधील विविध अ‍ॅक्टिव्हिटीज तसेच इतर कामाच्या ठिकाणी सहकार्यातून ही तरूणाई काहीतरी चांगले निर्माण करू शकते. भारत हा तरूणांचा देश आहे. तरूणाई आपल्यातील शक्ती ओळखून, मैत्रीची ताकद वापरून  काही भव्यदिव्य निर्माण करू शकते.

तरूणाईसाठी मैत्री हे प्रोटीन असते, टॉनिक असते. तरूणाईत मुलं-मुली एकमेकांचे चांगले मित्र बनून चांगल्या करिअरचा पाया घालतात. बिल गेट्स आणि त्यांचे मित्र तसेच नारायण मूर्ती आणि त्यांच्या मित्रांचा समूह यांनी केवढे मोठे प्रकल्प तरूण वयात उभे केले. युवा अवस्थेतील मैत्री, प्रेमाचा वापर ‘सैराट’सारखा न होता, मैत्री या बलाचा योग्य ठिकाणी उपयोग तरूणांनी केला तर तरूणांचा हा भारत देश जगात अव्वल ठरेल हे नक्की!

अजूनही स्त्री-पुरूष यांच्या मैत्रीला आपल्या संस्कृतीत समाजमान्यता मिळालेली नाही. यालाही मैत्रीच्या नावाखाली आज जे चित्र दिसतं ते कारणीभूत आहे. स्त्री-पुरूष निखळ मैत्रीपूर्ण संबंध पूर्णत्वाला गेलेले दिसत नाहीत. याला अपवाद काही उदाहरणे आहेत. नाही असे नाही परंतु स्त्री-पुरूषांमध्ये नैसर्गिक अशी शारीरिक ओढ, आकर्षण असते. त्यामुळे अशी अनेक उदाहरणे आहेत की प्रथम मैत्री होते, मग प्रेम आणि त्याचे पर्यावसान लग्न किंवा शारीरिक आकर्षणाने जवळ येण्यात होते. यामुळे स्त्री-पुरूषांच्या मैत्रीकडे अजूनही समाज मोकळ्या मनाने बघत नाही. त्यातच मैत्रीच्या नावाखाली मुलं-मुली आणि पुरूष-स्त्री असे वागत आहेत की त्यामुळे संस्कृतीची पाळेमुळे हलली आहेत. परंतु अनेक ठिकाणी स्त्री-पुरूषांची निकोप अशी मैत्री पहायला मिळते. कामातून, सहकार्यातून त्यांच्यात मैत्रीभाव निर्माण होतो. प्रत्येक स्त्री-पुरूष यांच्या मैत्रीकडे संशयाने बघणे योग्य नाही. स्त्री- पुरूष मैत्रीने समाजाचे नुकसान होतेच असे नाही. स्त्री पुरूष मैत्रीची कितीतरी चांगली उदाहरणे आजूबाजूला आहेत. मैत्रीपूर्ण सहकार्यातून मोठमोठे प्रोजेक्ट कार्यान्वित झाले आहेत. कामाच्या ठिकाणी सहकार्य, मैत्री यातून नक्कीच चांगले काम होते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे मिशन मंगलचे घेता येईल. आज शिक्षणासाठी, करिअरसाठी स्त्री-पुरूष एकत्र येतात. त्यांच्यात बौद्धिक, भावनिक, मानसिक, सामाजिक पातळीवर मैत्री होते परंतु तरीही स्त्री-पुरूषांच्या या मैत्रीकडे निकोप दृष्टिने समाज बघत नाही. याला कारणही तसेच आहे. स्त्री-पुरूषात मैत्री जरी असली तरी नैसर्गिक आकर्षणामुळे त्याच्यात कधी कधी मैत्रीची पायरी सोडून पुढची पायरी गाठली जाते तेव्हा हे नातं मैत्रीचं राहत नाही. कार्पोरेट जीवनात तर स्त्री-पुरूष कित्येक तास एकत्र  काम करतात. उच्चभ्रू समाजात आणि कार्पोरेट समाजात स्त्री-पुरूष यांच्या मैत्रीच्या नावाखाली अगदी जवळचे रिलेशन्स निर्माण होतात. पत्नीचा मित्र आणि पतीची मैत्रीण ही नाती आधुनिक, उच्चशिक्षित समाजात फॅशन म्हणून वागवली जातात. कधीकधी व्यवहारासाठी, फायद्यासाठी ही नाती सजवली जातात. वरून हे चित्र सुंदर दिसत असलं तरी आतून मात्र प्रत्यक्षात पती-पत्नीचं नातं या नव्या नात्यांमुळे पोखरलेलं असतं. फायद्यासाठी पांघरल्या जाणार्‍या या बुरख्यामुळे  समाजसंस्कृतीला तर कधी कुटुंबालाही धोका दिला जातो. त्यात आधुनिक सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे स्त्री-पुरूषातील फ्रेंडशिप खूप वाढली आहे. सोशल मीडियावर मित्रांची संख्या वाढत असते. या मैत्रीत मैत्री कशाला म्हणायचे आणि प्रेम कशाला म्हणायचे हेच ध्यानी येत नाही. मैत्रीच्या नावाखाली अनोळखी व्यक्तिशी गरज नसतानाही जवळीक साधत चॅटिंग, व्हिडिओज या माध्यमातून फ्लर्ट केले जाते. यातून मैत्रीपेक्षा अनेकदा अनैतिक संबंधांना पालवी फुटते.  अनेक गुन्ह्यांचा जन्म होतो. काहींसाठी तर मोबाईलवरील व्हाट्सअ‍ॅप, फेसबुक, इंस्टाग्राम यावरील फ्रेंडशिपमधून केले जाणारे मेसेजेस आणि व्हिडिओज फक्त आपल्या लैंगिक वासनांची पूर्तता करण्याचे एक साधन झालं आहे की काय असं वाटावं इतका मैत्रीला काळिमा फासला जात आहे. स्त्री-पुरूषांची मैत्री हे आकर्षण आहे की ती गरज आहे की आज ती एक फॅशन म्हणून केली जाते असा संभ्रम निर्माण झाला आहे.

मानवाने स्वतःची  सुसंस्कृत अशी संस्कृती तयार केली आहे. या संस्कृतीला या सर्वांमुळे तडा जातो. स्त्री-पुरूष मैत्री आज शारीरिक आकर्षणामुळे अवैध वाटते आहे. या संबंधाविषयी वि. स. खांडेकर म्हणतात, ‘मनुष्य पशु नाही. पशुंना संस्कृतीची कल्पना नसते पण संस्कृतीने मनुष्य बदलत आलाय ते फक्त बाह्य रूपात. त्याचं अंतरंग अजूनही तसंच आंधळ्या जीवनप्रेरणेमागून धावणार्‍या पशुसारखं राहिलं आहे. याचाच प्रत्यय आज मैत्रीच्या नावाखाली माणसाचं वागणं बघितलं की येतो.’

ना जातु काम: कामांनामु पभोगेन शाम्यति

हविषा कृष्ण वर्त्मेव भूय एवाभिवर्धते ॥

कामेच्छा ही अधिकाधिक उपभोगाने शांत होत नाही. यज्ञातील अग्नी अग्निहविर्द्रव्यामुळे (आहुतीमुळे) जसा अधिकच फडकतो तसेच कामेच्छेचे आहे. आज याचाच प्रत्यय सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्रीच्या नावाखाली दिसत आहे. सोशल मीडियाच्या अधिक वापरामुळे फ्रेंडशिपच्या नावाखाली अनेकानेक अनैतिक संबंधांना पालवी फुटते. त्यातून गुन्ह्यांचा जन्म होत आहे. संशय, अवैध संबंध वाढत आहे. त्यातून लैंगिक शोषण, फसवणूक, आर्थिक शोषण या गुन्ह्यातही वाढ होत चालली आहे. बदनामीची धमकी देऊन पुन्हा पुन्हा यात अडकलेल्या स्त्रियांचा फायदा घेतला जातो. सोशल मीडियावर मैत्री करताना सावधानता बाळगणे आणि सद्सद्विवेक बुद्धिचा उपयोग करणे आवश्यक आहे.

घराबाहेर या खोट्या मित्र-मैत्रिणी शोधण्याच्या नादात आपण घरातील कितीतरी आपल्याच गोड नात्यालाही पारखे होतो हेही लक्षात येत नाही. सोशल मीडियावरून होणार्‍या मैत्रीला मैत्री म्हणता येईल का? समानता हवी म्हणून तर कधी अनिवार्यता म्हणून कामाच्या ठिकाणी स्त्री-पुरूष सहकार्यासाठी ही मैत्री होते. नाईलाजाने कुटुंबालाही त्याचा स्वीकार करावा लागतो. तरीही या मैत्रीचा जर अतिरेक झाला तर त्यातून बर्‍याचदा कौटुंबिक गैरसमज निर्माण होतात. त्याचा परिणाम घरातील मुलांवर होतो. स्त्री-पुरूष मैत्री समजून घ्यायची असेल तर लहानपणापासून मुलामुलींचे परस्पर भिन्नलिंगी आकर्षण, कुतूहल शमवायला पाहिजे. समाजानेही मैत्रीतील उणिवा दूर करून जाणिवा जागृत करायला हव्यात. स्त्री-पुरूष मैत्रीला अशी सुंदर झालर तयार व्हावी की जी समाजमान्य होईल.

महाभारतात यक्षाने युधिष्ठिराला विचारलेल्या एका प्रश्नातला महत्त्वाचा एक प्रश्न होता, ‘‘देवाने पुरूषांसाठी निर्माण केलेला उत्तम मित्र कोण?’’

त्यावर युधिष्ठिराने उत्तर दिले, ‘‘त्याची पत्नी.’’

हजारो वर्षांपूर्वी युधिष्ठिराने दिलेले उत्तर या काळातही सर्वमान्य आहे. कौटुंबिक नात्यात मैत्रीपूर्ण संबंध निर्माण होऊ शकतात परंतु मैत्रीमध्ये नाते निर्माण झाले की ते फक्त मैत्रीचे नाते राहत नाही; कारण नात्यात बंधने असतात, दडपण असते. तसे मैत्रीत कुठलेही दडपण, बंधन नसते, अपेक्षांचे ओझे नसते. मैत्री म्हणजे निखळ, पवित्र असा आनंदाचा निर्झर असतो.

छत्रपती संभाजीराजे यांनी आपली पत्नी येसूबाई यांना ‘सखी राज्ञी जयतु येसूबाई!’ ही अधिकाराची मोहर दिली होती.

विवाहबंधनाने अनोळखी पती-पत्नी शारीरिक संबंधाने एकत्र येऊन आयुष्यभर सुंदर मैत्रीचे निखळ नाते निभावतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे यशवंतराव चव्हाण आणि वेणूताई, पु. ल. देशपांडे आणि सुनीताबाई या पती-पत्नींनी एकमेकांना आपले मित्र मानत जीवनात स्वर्गीय आनंदाची निर्मिती दुसर्‍यासाठीही केली. आजच्या मुली तर पतीमध्ये परमेश्वर नाही तर जीवनसाथी शोधतात, मित्र शोधतात. विवाहसंस्कार पती-पत्नीला सन्मान, स्वातंत्र्य, समानतेचे अधिकार अग्निच्या साक्षीने देतात परंतु प्रत्यक्षात पुरूषप्रधान संस्कृतीमुळे पतीला परमेश्वर मानून त्याच्या आज्ञेत राहायचे असा संस्कार मुलींना दिला जातो. त्यामुळे पत्नीच्या नम्रतापूर्वक वागण्यामुळे आणि घरात दडपणाखाली राहिल्याने घरातील ‘आज्ञाधारक पत्नी’ पतीला पुढे पुढे गुळगुळीत वाटायला लागते आणि मग बाहेर मैत्रीचे धागे तो शोधू लागतो. स्त्री-पुरूषांनाही खरंतर सर्वच बाबतीत वागताना एकमेकांशी समानतेच्या दृष्टिने वागणे आवडत असते. हे जर झाले तर कुणाही स्त्री-पुरूषाला बाहेर मैत्री शोधावी लागणार नाही.

प्रकृती आणि पुरूष या एकाच नाण्याच्या तर दोन बाजू आहेत. सहजीवनासाठी स्त्री-पुरूष मैत्रीची आवश्यकता आहे. एकमेकांना पूरक, पोषक असंच त्यांचं व्यक्तिमत्व निसर्गाने घडवलं आहे. स्त्री-पुरूष मैत्रीत एक हळवेपणा, कोमलता असते. शिवपार्वती हे प्रकृती-पुरूषाच्या पूर्णत्वाचे द्योतक आहे. कुटुंबाच्या, समाजाच्या आणि  प्रत्येकाच्याच निखळ आनंदासाठी, विकासासाठी स्त्री-पुरूष मैत्री असणे गरजेचे आहे पण फक्त ती एक फॅशन म्हणून वागवणं योग्य नाही. मैत्री हे एक छान नातं असतं, तो  ऋणानुबंध असतो.

स्त्री-पुरूषाची निखळ मैत्री अजूनही समाजमान्य नाही कारण  पुरूष अजूनही स्त्रीकडे एक ‘भोग्य वस्तू’ म्हणून  पाहतो. पुरूषप्रधान संस्कृतीने पुरूष श्रेष्ठ आणि स्त्री कनिष्ठ अशी जी समाजरचना केली आहे त्यामुळे स्त्री-पुरूषात मैत्रीची भावना पूर्णार्थाने निर्माण होत नाही.

मानवी जीवन सुखी करण्याचे सामर्थ्य मैत्रीत आहे. स्त्री-पुरूष हे जोपर्यंत समान पातळीवर येऊन व्यवहार करणार नाहीत, जोपर्यंत त्यांच्यात खरी मैत्री निर्माण होणार नाही, तोपर्यंत हे मानवी जीवन सुखी, समाधानी होणार नाही कारण मैत्री सुखाचे निधान आहे. मैत्री अमृताचा कुंभ आहे.

– सौ. सुरेखा अशोक बोर्‍हाडे-नाशिक । 9158774244

सुरेखा बोर्‍हाडे यांची ‘रंग अंतरीचे’, ‘बाईची भाईगिरी’, ‘डॉक्टर ते आयर्न मॅन’ अशी महत्त्वपूर्ण पुस्तके ‘चपराक’ने प्रकाशित केली आहेत. त्या लोकप्रिय स्तंभलेखिका असून ‘गोदा आली अंगणी’ हा एकपात्री कार्यक्रम सादर करतात.

पूर्वप्रसिद्धी – साहित्य ‘चपराक’ दिवाळी अंक २०२२

‘चपराक’ मासिकाचे सभासद होण्यासाठी संपर्क 7057292092

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा