सहकार चळवळीचा दीपस्तंभ

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपल्या देशाने सर्व क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती साधली. यात सगळ्यात मोठा वाटा होता तो अर्थातच सहकाराचा! त्यातही देशाचा विचार करता सहकार क्षेत्रात महाराष्ट्राने नेहमीच अव्वल योगदान दिले आहे. देशातील पहिला सहकारी साखर कारखाना काढणारे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील नगर जिल्ह्यातील लोणी बुद्रुकचे. सहकार क्षेत्रात मोलाचे योगदान देणार्‍या धुरिणांची एकत्रित माहिती आजवर मराठी साहित्यात नव्हती. मात्र भालचंद्र कुलकर्णी यांनी सहकार भारती या संस्थेच्या माध्यमातून हा महत्त्वपूर्ण प्रकल्प तडीस नेला असून त्यांच्या संपादनाखाली प्रकाशित झालेल्या ‘सहकार महर्षी’ या दणदणीत ग्रंथाचे प्रकाशन नुकतेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. यात थोड्याथोडक्या नव्हे तर तब्बल 153 सहकार महर्षींची माहिती एकत्रित वाचण्यासाठी उपलब्ध करून दिल्याने याला एका अनमोल संदर्भग्रंथाचे मूल्य प्राप्त झाले आहे. मुख्य म्हणजे या ग्रंथाची सुरूवातच स्वातंत्र्यपूर्व काळात ग्रामीण महाराष्ट्राचे आर्थिक जीवन संपन्न करणार्‍या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांपासून झाली आहे.

सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनात अपरिहार्य असूनही लेखनाच्या दृष्टिने क्लिष्ट वाटणारा हा विषय या ग्रंथात अत्यंत सुलभ शैलीत मांडला आहे. हा फक्त सहकारी चळवळीचा इतिहास झाला नसून या क्षेत्रात योगदान देणार्‍यांचे हे एक प्रभावी चरित्र झाल्याने सहकारक्षेत्राची भगवद्गीता म्हणून या ग्रंथाचा उल्लेख केला तर वावगे ठरू नये. सहकार चळवळ म्हटले की आजवर काही ठराविक नेत्यांचीच नावे पुढे येत होती. मात्र या पुस्तकातील नायकांनी या क्षेत्रासाठी दिलेले योगदान पाहता कुणाचीही मान अभिमानाने उंचावेल. पश्चिम महाराष्ट्र वगळता उर्वरित महाराष्ट्राचे सहकारातले योगदान काय? हा प्रश्न विचारणार्‍यांना हा ग्रंथ म्हणजे एक सणसणीत चपराकच आहे. खाजगी सावकारीचे पाश तोडून ग्रामीण जीवनातील विकासाभिमुख परिवर्तनाची नांदी ठरणार्‍यांचे योगदान आजवर दुर्लक्षित होते. या ग्रंथाच्या माध्यमातून ही उणीव भरून निघाली आहे. सर्व ज्ञात सहकार महर्षींचा यथायोग्य गौरव करत जे ज्येष्ठ कार्यकर्ते, नेते फारसे परिचित नव्हते त्यांच्यावर प्रकाशझोत टाकून त्यांना पुढे आणण्याचा हा यशस्वी प्रयत्न आहे.

महाराष्ट्रातील व देशातील सहकारी चळवळीला सुरूवातीच्या काळात चांगले नेते लाभले. मात्र पुढे यातील अनेकांनी ‘स्व’अर्थ विसरून ‘स्वार्थ’ अंगिकारला आणि सहकाराचा स्वाहाकार झाला. कै. वैकुंठभाई मेहता, डॉ. धनंजयराव गाडगीळ, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील, वसंतदादा पाटील, यशवंतराव मोहिते, भाऊसाहेब हिरे, गुलाबराव पाटील, शंकरराव मोहिते पाटील, पद्मश्री श्यामराव कदम, तात्यासाहेब मोहिते, भाऊसाहेब भोकरे, डॉ. रत्नाप्पाण्णा कुंभार, माधवराव गोडबोले, भाऊसाहेब रंतुजी थोरात अशा अनेक दिग्गजांनी या क्षेत्रात मानदंड निर्माण केले. महाराष्ट्र कायम त्यांच्या ऋणात आहे. मात्र हे करतानाच या क्षेत्रात काही चुकीच्या प्रवृत्ती घुसल्या आणि सहकार क्षेत्र अपयशी की सहकार तत्त्व अपयशी असा प्रश्न निर्माण झाला. या प्रश्नाची धग अनुभवत असतानाच ज्यांनी आपल्या वेगळ्या वाटा धुंडाळल्या आणि पुढे त्यांचेच महामार्ग झाले अशा उत्तुंग व्यक्तिमत्त्वांचा वेध या ग्रंथातून घेण्यात आलाय.

भालचंद्र कुलकर्णी यांच्याकडून ‘सहकार महर्षी’ हा ग्रंथ स्वीकारताना ‘चपराक’ चे संपादक घनश्याम पाटील

राजकारणातल्या अनेक मंडळींनी सहकार क्षेत्रात यथायोग्य योगदान दिले. या ग्रंथात मात्र ते सहकाराच्या अंगाने भेटतात. नेहमीच्या परिचित नेत्यांशिवाय यातील बहुतेक नावं ही त्या-त्या भागाचा अपवाद वगळता फारशी सुपरिचित नाहीत. मात्र याच मंडळींनी खर्‍याअर्थी महाराष्ट्र घडवलाय. देशाच्या स्वातंत्र्यानंतर ही मंडळी नसती तर आपल्या राज्याचे काय झाले असते, याची कल्पनाही करवत नाही. लक्ष्मणराव माधव इनामदार अर्थात वकीलसाहेब अशांची माहिती वाचताना अंगावर अक्षरशः रोमांच येतात. या ग्रंथात प्रवासाची साधने नसताना घरून दशम्या बांधून घेऊन त्यांच्या घोडीवरून गावोगाव फिरणारे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील, शेतकर्‍यांच्या शेंगा व्यापार्‍यांना विकण्याऐवजी शेतकर्‍यांनीच भुईमुगीच्या शेंगाचे तेल काढण्याच्या गिरण्या काढल्या तर तेही कारखानदार होतील असे सांगणारे आणि सोलापूरच्या हुतात्म्यांच्या बलिदानानंतर आवडता चहा सोडणारे वसंतदादा पाटील, आपल्या समाजावर आईसारखे निस्वार्थी प्रेम करूया असा संदेश देणारे डॉ. अविनाश आचार्य, नेत्यांच्या बळावर समाज उंच होत असतो तर कार्यकर्त्यांच्या परिश्रमावर तो प्रगल्भ होत असतो. नेत्यांनी दिशा दाखवायची आणि कार्यकर्त्यांनी त्या वाटेने सार्‍यांना सोबत घेऊन पुढे जायचे, असे सांगणारे आप्पाजी आसेगावकर, गेल्या 35-36 वर्षांपासून ईश्वराची आराधना करीत असतानाच रात्री भोजनत्याग व कंदमुळाचा त्याग करून आनंदाने व्रतस्थ जीवन जगणारे मामासाहेब बागमार, 25 हजाराच्या भागभांडवलापासून सुरू झालेली बँक तेहतीसशे कोटी रूपयांच्या व्यवसायापर्यंत नेणारे करबसप्पा मल्लप्पा, सोलापूरच्या सहकार चळवळीत महत्त्वाचे योगदान देणारे धुंडिराजशास्त्री तथा अण्णा दाते, आचार्य अत्रे यांच्याकडून ‘लोकनेते’ असा गौरव मिळवणारे पाटणचे दौलतराव तथा बाळासाहेब देसाई, ग्राहक चळवळीत योगदान देणारे बिंदुमाधव जोशी असे अनेक उत्तुंग मनोरे भेटतात. हे पुस्तक वाचताना सहकार क्षेत्राचे सामर्थ्य आपल्या सहजी ध्यानात येते.

सहकार चळवळीचा हा इतिहास आणि वर्तमान वाचताना एक गोष्ट मात्र खटकते. या संपूर्ण ग्रंथात पुण्यातील भगिनी निवेदिता सहकारी बँकेच्या मीनाक्षीताई दाढे आणि को ऑपरेटिव्ह हाऊसिंग फिन सोसायटीच्या (हाउसफिन) डॉ. कुसुमताई कोरपे या दोनच महिला आढळतात. महिलांचा सहकार क्षेत्रातील वाटा शोधून त्यांना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे. भालचंद्र कुलकर्णी, डॉ. मुकुंदराव तापकीर, ज्येष्ठ पत्रकार जयराम देसाई, डॉ. अविनाश अभ्यंकर, अशोक भट, विनायक कुलकर्णी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी अथक परिश्रमाने हा ग्रंथ साकारला आहे. डबल क्राऊन आकारातील 892 पानांच्या या ग्रंथाची सुबक मांडणी, उत्तम छपाई, चांगल्या प्रतीचा कागद यामुळे निर्मितीमूल्य अर्थातच उंची आहे. मुखपृष्ठावरील दीपस्तंभ आणि महाराष्ट्राचा नकाशा पुरेसा बोलका आहे. लतित साहित्याबरोबरच मराठीत असे ग्रंथ प्रकाशित झाल्यास यातून अनेक कार्यकर्त्यांना ‘माणूस’ म्हणून घडण्याची शिकवण मिळेल आणि हेच सहकार भारती प्रकाशनाच्या या ग्रंथाचे मुख्य वैशिष्ट्य आहे.

– घनश्याम पाटील
7057292092
पूर्व प्रसिद्धी – दै. पुण्यनगरी, रविवार दि. ३० जानेवारी २०२२

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

4 Thoughts to “सहकार चळवळीचा दीपस्तंभ”

  1. Vinod panchbhai

    सहकार चळवळीबाबत उपयुक्त माहिती असलेल्या
    या पुस्तकाची ओळख सुंदर पध्दतीने करून दिली आहे!
    अभिनंदन!!

  2. VISHNU PRIYA APARTMENT

    अतिशय उत्तम मांडणी, मुद्देसूद लिखाण.. खूपच सुंदर ! मनापासून धन्यवाद !

  3. जयंत+कुलकर्णी

    घनश्याम सर … सहकार महर्षी या ग्रंथाची सुंदर ओळख तुमच्या लेखामुळे झाली. हा ग्रंथ वाचून अनेकांना प्रेरणा मिळेल. मात्र तुम्ही लिहिल्या प्रमाणे यातला “स्वार्थ” बाजूला झाल्यास ही चळवळ देशाला नक्कीच प्रगती पथावर नेईल.

  4. Ramkrishna Adkar

    सुंदर परीक्षण! पुस्तक परिचयाने हा ग्रंथ वाचण्याची ( विकत घेऊन) इच्छा तीव्र झाली ! डॉ अविनाश आचार्य यांच्या उल्लेखाने त्यांच्या संबंधित आठवणी जाग्या झाल्या! धन्यवाद !

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा