महाराष्ट्र साहित्य परिषद ही साहित्यातील मातृसंस्था आहे. या संस्थेतर्फे दरवर्षी उत्कृष्ट साहित्यनिर्मितीसाठी काही पुरस्कार दिले जातात. यंदाचे पुरस्कार मागच्या आठवड्यात पुण्यात समारंभपूर्वक दिले गेले. त्या अनेक पुरस्कारांपैकी ‘स्तंभ लेखन’ या साहित्यप्रकारासाठीचा एक पुरस्कार डॉ. सच्चिदानंद शेवडे यांच्या ‘सेक्युलर्स नव्हे फेक्युलर्स’ या पुस्तकाला दिला गेला. त्यावर जळफळाट करत विश्वभंर चौधरी नावाच्या एका गृहस्थाने प्रचंड त्रागा केला आहे. जणू साहित्य परिषदेने पुरोगाम्यांचे मुस्काटच फोडले अशा आविर्भावात त्यांनी थयथयाट केला आहे. या स्पर्धेचा आणि विशेषतः या साहित्यप्रकाराचा मी परीक्षक असल्याने चौधरी यांनी ज्या उलट्या बोंबा मारल्यात त्याचा समाचार घेणे क्रमप्राप्त आहे.
या संदर्भात चौधरी यांनी जी फेसबुक पोस्ट टाकून त्यांचा असभ्यपणा दाखवला आहे तो पुरोगामी चळवळ किती तकलादू झालीय याचा उत्तम नमुना आहे. त्यात ते पहिल्याच वाक्यात मसापला ‘सुमार दर्जाची साहित्य संस्था’ म्हणतात. गेली 111 वर्षे अव्याहतपणे साहित्यनिष्ठा जोपासणार्या या संस्थेला ‘सुमार’ समजण्याइतका अविवेक हे लोक दाखवू शकतात याचे आश्चर्य वाटत नाही; कारण बौद्धिक वाढ खुंटल्यानंतर माणसे फक्त वयाने वाढतात. मग त्यांचे अभ्यासाशी काही देणेघेणे राहत नाही. शेवडे यांच्या पुस्तकाला पुरस्कार दिल्याने ‘पुरोगामी विश्वात खळबळ’ माजल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले आहे. असे काही ‘पुरोगामी विश्व’ महाराष्ट्रात आहे याचा अनेकांना थांगपत्ताच नाही. म्हणजे घरातल्या सिलेंडरवर पाणी उकळत ठेवायचे आणि ‘ज्वालामुखी खदखदू लागला’ असे म्हणत नाचत रहायचे अशातला हा प्रकार झाला. ‘मसाप नावाच्या धोतर्याच्या झाडाला हापूस आंबे लागतील अशी वृथा अपेक्षा पुरोगामी ठेवत आहेत‘ असे सांगत ‘मुळात या मसापमध्ये ‘साहित्य’ शोधायला पुरोगाम्यांनी जावेच कशाला?’ असाही खुळचट सवाल त्यांनी केला आहे.
महत्त्वाचे म्हणजे चौधरींचा आणि साहित्य परिषदेचा काहीही संबंध नाही. ते मसापचे सभासदही नसल्याचे कळते. (केवळ एक हजार रूपये भरून कोणीही साहित्यप्रेमी मसापचे आजीव सभासद होऊ शकतात.) जर चौधरी कधी मसापकडे फिरकतच नाहीत तर त्यांना धोतरा आणि हापूसमधला फरक कसा कळणार? तो माहीत नसला की असे तारे तोडले जातात. त्यातही गंभीर म्हणजे ‘पुरोगाम्यांनी मसापमध्ये जावेच का?’ हा सवाल मूर्खपणाचा अतिरेक आहे. 111 वर्षाच्या परंपरेत मसापमध्ये विशिष्ठ विचारधारेचीच मक्तेदारी होती, आहे असे त्यांना म्हणायचे आहे का? ही संस्था एखाद्या गणपती मंडळासारखी किंवा दहीहंडी मंडळासारखी असल्याचा बालीश आरोप त्यांनी केलाय. म्हणजे न्यायव्यवस्था, लष्कर, प्रसारमाध्यमे, साहित्य संस्था जेव्हा तुम्हाला पूरक ठरतात तेव्हा लोकशाही आणि तुमच्या मनाविरूद्ध जरा काही झाले की ‘सुमार!’ वा रे पुरोगामी! साहित्य संस्थांनी, संमेलनांनी विविध ठराव मांडावेत असा आग्रह धरणारी हीच मंडळी असतात. ते एखाद्या विरूद्ध विचारधारेच्या लेखकाच्या कलाकृतीला पुरस्कार दिला की असा थयथयाट करतात. परिषद वर्षाला 25 लाखांचा शासकीय ‘रमणा’ घेऊन संमेलनाचा ‘ऊरूस’ भरवते असा आरोप त्यांनी केला आहे. मुळात साहित्य संमेलन निमंत्रित संस्था आणि अखिल भारतीय साहित्य महामंडळ भरवते. हे 25 लाख रूपये साहित्य परिषदेला मिळत नाहीत हे त्यांना थोडासा अभ्यास केला तरी कळले असते. कोणती संस्था काय काम करते हे माहीत नसतानाही ‘खोटे बोल पण रेटून बोल’ असे जे वागतात त्यांना विश्वंभर चौधरी म्हणतात. गंमत म्हणजे ही रमणा संस्कृती पुरोगाम्यांना नवी नाही. चौधरी आणि त्यांचे वैचारिक बाप अनेकदा असा रमणा घेऊनच फड रंगवतात.
ते म्हणतात की, ‘माझा समज आहे की, साहित्य परिषद म्हणजे साहित्य संमेलनाला लागणारे साहित्य (तंबू, सतरंज्या, खुर्च्या आदी) बाळगून असलेली परिषद!’ आता, समज करायचा म्हटल्यावर तो काहीही करून घेऊ शकतो. ज्यांचा वास्तवाशी काहीही संबंध नसतो ते नेहमी समजावरच तर जगतात. म्हणजे हे चौधरी परदेशी निधी घेऊन, हप्ते, खंडण्या गोळा करूनच जगतात, सामाजिक कार्यकर्ते असल्याचा आव आणतात असा आमचा ‘समज’ होऊ शकतो. आपल्याला हवा तसा समज करून घेऊन मते मांडायची आणि अज्ञान उघडे पडले की आक्रस्ताळेपणा करायचा हा आदर्श चौधरी यांच्यासारखे ‘बुजूर्ग’च आमच्या पिढीसमोर ठेवतात. त्यामुळे भविष्यात विश्वंभर चौधरी यांच्याविषयी आमचे काहीही समज झाले तरी त्यांनी आम्हाला जाब विचारू नये!
‘एवढ्या प्रतिष्ठित संस्थेकडून कोणत्याही पुस्तकाला पुरस्कार दिला तरी काय फरक पडतो? सुमारांच्या सद्दीत दुसरे काय अपेक्षित असते?’ असे म्हणायचे आणि पुरस्काराच्या निवड प्रक्रियेवर आक्षेप नोंदवायचे हे पुरोगाम्यांना न शोभणारे आहे. ‘विरोधी विचारसरणीचे स्वागत’ हा गुण दुरापस्त होत चालल्यानेच चौधरी यांच्यासारखे लोक साहित्यिक वातावरण कलुषित करतात. शेवडे यांच्या ज्या पुस्तकाला पुरस्कार दिलाय त्याची बुरखाफाड प्रस्तावना सुप्रसिद्ध पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी लिहिलीय. या पुस्तकातील केवळ ही एक प्रस्तावना वाचली तरी चौधरी यांच्यासारखे लोक उघडे पडतील आणि हेच यांचे खरे दुखणे आहे.
दलित चळवळीचे अभ्यासक रावसाहेब कसबे हे साहित्य परिषदेचे अध्यक्ष आहेत. पुरोगामी विचारधारेचेच अनेक लोक विश्वस्त मंडळावर आहेत. याबाबत परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी सांगितले की, ‘‘साहित्य परिषदेची एक स्वतंत्र यंत्रणा आहे. आमच्या सर्वच परीक्षकांच्या सद्विवेकबुद्धिवर आणि निर्णयक्षमतेवर आमचा विश्वास आहे. हा सर्व प्रकार रावसाहेब कसबे यांच्यापर्यंत गेला आहे. त्यांनीही सांगितले की, परीक्षकांच्या निर्णयात पदाधिकार्यांनी हस्तक्षेप न करणे हीच आपली परंपरा आहे. हे पुस्तक अजून मी वाचले नाही. पुस्तकाबाबत काही मतभेद असतील तर मी मसाप पत्रिकेच्या आगामी अंकातून त्याची समीक्षा करेन. त्यामुळे पुरस्कार निवडीवरून कोणीही राजकारण करू नये आणि साहित्य संस्थांना अकारण बदनामही करू नये!’’
गंमत म्हणजे शेवडे यांच्या पुस्तकातील सर्व लेख हे एका समाजवादी विचारधारेच्या वृत्तपत्रातून सदर स्वरूपात प्रकाशित झालेले आहेत. त्यांना या पुस्तकाला पुरस्कार देणे मान्य नसेल तर त्यांनी पुस्तकातील मुद्दे खोडून काढावेत. मात्र त्यासाठी लागणारी प्रतिभा असायला चौधरी हे काही लेखक नाहीत. इतकेच काय यावर्षी या पुस्तकाव्यतिरिक्त इतर कोणत्या साहित्यकृतींना पुरस्कार दिले हेही चौधरी यांना सांगता येणार नाही. मग या एकमेव पुस्तकाला विरोध हे केवळ द्वेषपूर्ण मनोवृत्तीचे लक्षण नाही का?
मसापसारख्या प्रतिष्ठित संस्थेचा परीक्षक या नात्याने आम्ही लेखकांची विचारधारा बघितली नाही तर साहित्यकृतीचा गुणात्मक दर्जा बघितला. परीक्षक या नात्याने आमचे ते कर्तव्यच होते. त्यामुळेच विश्वंभर चौधरी यांच्यासारख्या टिनपाटाने जे आरोप केले त्याचा प्रतिवाद आम्ही केला. त्यांची मसापविषयीची भूमिका किती द्वेषमूलक आणि अज्ञानावर आधारित होती हे लक्षात आल्यावर मुख्य मुद्याला बगल देत ते वैयक्तिक स्तरावर उतरले आहेत. म्हणजे मी त्यांना प्रकाशक म्हणून साहित्य मागितले असा त्यांचा आक्षेप आहे. असंख्य लोकांना लिहितं करताना मी सर्वांकडे साहित्यच मागणार ना? की मी यांना त्यांच्याकडे खंडण्या मागणे अपेक्षित आहे? यामाध्यमातून ‘भगवा अजेंडा’ पुढे करत असल्याचाही त्यांनी आरोप केलाय. हे त्यांच्या मानसिक कमजोरीचे आणि अस्वस्थतेचे लक्षण आहे. मी त्यांची आहे, नाही ती सगळी अब्रू घालवलीय तरी ते माझ्यावर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्यासाठी ‘सल्लामसलत’ करत आहेत. म्हणजे त्यांची अब्रू गेलीय हे त्यांना कळत नाही का? त्यासाठीही इतरांचे ‘सल्ले’ घ्यावे लागतात. असे सल्ले मसापसारख्या संस्थेवर टीका करण्यापूर्वी घेतले असते तर ही वेळच आली नसती. दुसरी बाब म्हणजे मसापला ‘मातृसंस्था’ म्हटल्याने माझी संस्कृती कळते असेही त्यांनी लिहिले आहे. 111 वर्षे अव्याहतपणे कार्यरत असलेल्या या आद्यसंस्थेला मातृसंस्था म्हटल्याने माझी कोणती संस्कृती चौधरींना कळली हे त्यांनी जाहीर करावे.
या सगळ्या प्रक्रियेत विश्वंभर चौधरी हे फक्त एक प्यादे आहे. चौधरी यांचे वैचारिक पितृत्व करणारे सातत्याने उघडे पडत आहेत आणि त्यामुळे ते उद्विग्न आहेत. ज्या विषयातली गरजेपुरतीही अक्कल नाही त्या विषयात मते मांडली की तोंडावर आपटणारच. पुरोगामी हा शब्द पुरता बदनाम झालेला असताना त्यांनी आता परिवर्तनवादी व्हायला हवे. हे परिवर्तन विधायक हवे. ‘उचलली जीभ, लावली टाळ्याला’ या वृत्तीमुळे अनेक सशक्त विचारधारा, परंपरा संपल्या. पुरोगामी म्हणजे काळाच्या पुढचे पाहणारा. त्याच्याकडे ते सामर्थ्य असायला हवे. मात्र अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले असे लोकच ही विचारधारा संपविण्याचे पाप करतात. या घटनेतून विश्वंभर चौधरी यांनी काही बोध घेतला तर ठीक; अन्यथा अशी सुमारांची सद्दी संपविण्यासाठी त्यांचे अज्ञान आणि द्वेषवृत्तीच पुरेशी आहे.

– घनश्याम पाटील, पुणे
7057292092