कातळावरील अक्षरलेणी

'चपराक' दिवाळी अंकातील प्रिया धारूरकर यांचा लेख.

‘चपराक’ दिवाळी अंकातील प्रिया धारूरकर यांचा लेख. 

दगडा-खडकांच्या झिजण्यातून बनलेली माती असंख्य खंडप्राय भूभाग तयार करत गेली. स्वतः जगली, जगवत राहिली. समाज, संस्कृती म्हणून घडली. रक्तात उतरली, उसळली, लढली. इतिहास घडवत राहिली. परंपरा सांभाळत राहिली. वर्तमानला प्रवाही ठेवती झाली. काळानुसार बदलत्या सामाजिक पर्यावरणाला सामोरे जात मानवीय बदल स्वीकारती झाली. जगभर त्या-त्या प्रदेशात फळत फुलत राहिली. तिचा त्या-त्या मातीत लहेजा उतरवत राहिली. ओंकाराच्या हुंकारातून बोली उमटत गेली तसे शब्द मौखिक परंपरेतून आपला वसा सांगते झाले. कधी या वस्यांच्या कहाण्या झाल्या. कधी त्या सुफळ संपूर्ण झाल्या तर कधी त्या भळभळत्या जखमा झाल्या. हळूहळू लिप्यांतरीत झाल्या. साहित्य म्हणून मिरवू लागल्या. आपापल्या प्रांताचं सम्राटपण आपापल्या भाषेत, सौष्ठवात सांगू लागल्या. प्रत्येकच मातीचा जगण्याचा स्वतंत्र इतिहास, स्वतंत्र वर्तमान.
अशीच माती माझ्या मराठवाड्याचीही! कणखर कातळाची म्हणून मजबूत कण्याची कणखर. दुष्काळी म्हणून कष्टाळू, सोशिक बाण्याची. संतांच्या संपन्न सहवासाच्या पुण्याईने नटलेली ही भौगोलिक भूमी. आद्यकवी मुकुंदराज, महदंबा, ज्ञानेश्वर माऊलींच्या अक्षरसाहित्यानं जगभर अमर झालेली. बोटावर मोजण्याइतक्या लेखणीतून असंख्य लेखणीचा उद्गार होत आलेली. मराठवाड्याची बोली म्हणून प्रसिद्ध पावलेली. याच मातीतल्या ‘तिच्या’ लेखणीच्या ‘नोंदीचा’ हा वर्तमान वेध.

व्यक्त होता होता तिच्याही नकळत तिची स्वतंत्र अभिव्यक्ती निर्माण होत गेली. ती अक्षरांचं गोत्र धारण करून, शब्दधनीण झाली. ती मौखिक साहित्यातून जात्यावरच्या ओव्या, अभंग गुणगुणत गुणगुणत बोलायची, सांगायची, रडायची आणि दुःख-वेदना आपल्या आत जपायची, जगायची. जगता जगता इतरांसाठीच शेवटच्या श्वासापर्यंत उरता येईल एवढं उरायची. ती शिकू लागली, वाचू लागली. वाचता वाचता लिहूही लागली. तशी ती आत्मभानानं झळाळू लागली. आपला भोवताल, आपलं जगणं समजून घेऊ लागली. विचार करू लागली. विचार करता करता ते व्यक्त करताना अंतर्बाह्य बदलू लागली. माणूस म्हणून स्वतःला घडवू लागली. त्याच्या बरोबर समर्थ पाऊल टाकू लागली. स्वतःचा स्वतंत्र इतिहास निर्मू लागली. आपल्या मातीचा पोत, आपल्या समृद्ध सांस्कृतिक वाङ्मयीन संवेदनेचा पेरा, आपल्या शब्दातून पेरू लागली. सोस, भोग असले तरी तगून जाणं इथल्या मातीतूनच रक्तात भिनलेलं. साहित्यात उतरू आलेलं. म्हणून तर इथली लेखणी सहजतेनं हृदयाचा ठाव घेऊ लागली. खरंतर हा साहित्य प्रवास, स्वतःची मुद्रा जगभर उमटवू शकणारा पण दुर्लक्षित राहिलेला. हा सल असला तरी इतिहासात नोंद घेताना सुवर्ण पानावर कोरला जावा असा अतुलनीयच.

12 व्या शतकातील महानुभाव पंथातील उत्कट, रसाळ काव्याचा नमुना असणारे ‘धवळे’ हे कथाकाव्य रचणारी ‘महदंबा’ ही मराठीतली आद्यकवयित्री. त्यांचे मातृका, रुक्मिणी स्वयंवर, गर्भकांड ओव्या, स्फुटपद्य हे देखील तेवढेच ओघवते. त्यांच्याच प्रवाहातल्या मठाधिकारी असणार्‍या नाईकबाई, हिराईसा, ग्रंथ लेखिका नागाईसा! तर वारकरी संप्रदायातील व संत परिवारातील मुक्ताबाई, प्रेमाबाई, संत नामदेव परिवारातील जनाबाई, आऊ बाई, राजाई, गोणाई, लाडाई, लिंबाई, साखराई, विठाबाई, संत तुकाराम शिष्या बहिणाबाई, कन्या भागूबाई, संत चोखोबांची पत्नी सोयराबाई, बहीण निर्मळा, राधाबाई, संतूबाई, भागूबाई, कान्होपात्रा… किती तरी नावे आहेत ज्यांनी मध्ययुगीन काळात सामाजिक विषमता, स्पृश्यास्पृश्यता, मासिक पाळीतला विटाळ यावर त्यांच्या रचनांमधून जोरकस भाष्य केलेलं आहे. संतसाहित्य अभ्यासताना त्यांच्या आत्मनिष्ठ, समृद्ध जाणिवांचा प्रत्यय वारंवार येत राहतो. यांच्याच समर्थ स्त्रीवादी जाणिवांच्या संचिताचं लेणं अंगी भिनवून यांच्याच लेकीबाळी आम्ही लिहू लागलो, बोलू लागलो. स्वतःचं अक्षरस्थान, स्वतःची मतं निर्माण करू लागलो.

त्याचीच परिणती म्हणता येईल की 2009 सालापासून या लिहित्या हातांची दखल घेत, यांचा सन्मान म्हणून मराठवाडा साहित्य परिषदेने ‘मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाची’ सुरुवात केली आणि अनेक लिहीते हात समोर येऊ लागले. तर अनेक हात लिहितेही झाले आणि विशेष म्हणजे यातले अनेक लिहिते हात पीएचडीच्या अभ्यासाचे देखील विषय झाले आहेत.

ग्रामीण, शहरी, स्त्रीवादी, दलित-आदिवासी असे सारेच प्रवाह अभ्यासले तर लक्षात येईल केवढा तरी आत्मीय स्रोत, आपलं स्वत्व घेऊन आपल्या वैशिष्ट्यांसह वाहतो आहे.

औरंगाबाद
औरंगाबादेतील आता कालवश झालेल्या ज्येष्ठ लेखिका अनुराधा वैद्य या औरंगाबाद येथे झालेल्या पहिल्या लेखिका संमेलनाच्या अध्यक्षा होत्या. सामाजिक बांधिलकीतून आणि मध्यमवर्गीय प्रश्नांचा मागोवा घेत त्यांनी विपुल लेखन केले. कविता, कथा, कादंबरी, काव्यांबरी, विनोदी साहित्य असे अनेक साहित्यप्रकार लीलया पेलणार्‍या अनुराधाताईंचे अजुनी खुळा हा, अंतर, अस्तित्वरेषा, काजळ हे कथासंग्रह तर आजन्म, उजेडाचं दार, गारूड, गुंफण, चांदवा, जोगवा, चौफुला (यावर तर चित्रपट देखील आला आहे.), श्वानप्रस्थ अशा अनेक कादंबर्‍या, तीन चमचे प्रोत्साहन (विनोदी कथा) देहस्थ, निमिष, पंख (संकीर्ण लेखसंग्रह), प्रवाह, बाकी क्षेम (कथासंग्रह), माझी चिंध्यांची बाहुली (काव्यांबरी), माध्यम (हिंदी कादंबरी), सुमी आणि सोन्या, क्षणकाल असे अजून केवढेतरी लेखन त्यांनी केलेले आहे.
आता पुण्यात वास्तव्यास असणार्‍या वृंदा दिवाण यादेखील औरंगाबादच्याच. बदलता समाज, कौटुंबिक पार्श्वभूमी व काळानुसार बदलते कौटुंबिक प्रश्न हा त्यांच्या लेखनाचा गाभा. अनेकानेक दिवाळी अंकातून सातत्याने कथा, दीर्घकथा लिहिणार्‍या वृंदा दिवाणांचे रंगांकीत लक्ष्मणरेषा, कशिद्यातील मोर, पप्पू, सोनेरी फ्रेमचा चष्मा, फुलका इत्यादी बालकथा तसेच आलेख, सेतू असे अनेक कथासंग्रह सुद्धा प्रसिद्ध आहेत.

लघुतम कथेसाठी प्रसिद्ध असणार्‍या छाया महाजन या 17/18 जानेवारी 2015 साली जालना येथे झालेल्या सहाव्या मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा होत्या. यांनी मुन्शी प्रेमचंद, मोपॉंसा, सॉल बेलो आदी लेखकांच्या पुस्तकांचे मराठी अनुवाद केले आहेत. एकादश कथा, ओढ, कॉलेज, मानसी, तन अंधारे, गगन जीवन तेजोमय, दशदिशा, पाण्यावरचे दिवे, मुलखावेगळा, मोरबांगडी अश्या कादंबर्‍या, ललित निबंध, कथासंग्रह त्यांनी लिहिले आहेत. घटना, घटनेचं गांभीर्य, त्यावरील नेमकेपणाने केलेले भाष्य, आधुनिकता त्यांच्या लेखनात आढळून येते.

‘बिनपटाची चौकट’ या आत्मकथनपर आत्मचरित्रामुळे महाराष्ट्राला परिचित असलेल्या इंदूमती जोंधळे यांचे अस्वस्थ श्वासांची डायरी, पाषाण निद्रा, बेदखल हे कथासंग्रह प्रकाशित आहेत. स्वतः अनाथपण भोगलेल्या, सोसलेल्या यातनांचे स्वर त्यांच्या लेखनातून आपल्याला अस्वस्थ करत राहतात.

‘मरणकळा’ हे आत्मचरित्र लिहिणार्‍या जनाबाई गिर्हे यांनी दोन्ही पायात बेड्या घातलेली जिला तोंड दाखवण्याचेही स्वातंत्र्य नसलेली स्त्री दाखवली आहे आणि अशाच अवस्थेत त्या शिकलेल्या आहेत. त्यांच्या समाजातील स्त्रीची गत अशीच आहे असे त्या सांगतात. भटक्यांच्या जीवनाच्या किती तरी परवडीची दखल घेणार्‍या कथा देखील त्यांनी लिहिल्या आहेत.

पुष्पा देशमुख, प्रतिभा जोशी यांनी देखील कथा, कादंबरी लेखनात आपला ठसा उमटवलेला आहे.

आपल्या कथांमधून स्त्री प्रश्नांची उकल करणार्‍या मंगला अवलगावकर, सुनंदा गोरे यांचे कथासंग्रह आवर्जून संग्रही ठेवण्यासारखे आहेत. अध्यात्म आणि एकूण जीवन यांच्या तात्त्विक चिंतनाची सरमिसळ प्रतिभा जोशी यांच्या कादंबरीतून अनुभवाला येते.

खेळीमेळी, रंगीबेरंगी, आनंदाचा गाव, सचित्र बालकविता असे अनेकविध बालकाव्य निर्माण करणार्‍या लीला शिंदे यांचे बालसाहित्यातील योगदान फार मोठे आहे. चार गोष्टी आवडीच्या, छोट्यांचं मोठं जग, मुलं ती फुलं, मित्र जिवाचा खरा हे बालकथासंग्रह तर कडू नावाची गोड मुलगी ही कादंबरीका छोट्यांच्या विश्वाचा वेध घेत कितीतरी विपुल लेखन त्यांनी केले आहे.

अनुराधा पाटील मराठवाड्यातल्या आणि मराठी भाषेतल्या महत्त्वाच्या कवयित्री. दिगंत, तरीही, दिवसेंदिवस, वाळूच्या पात्रात मांडलेला खेळ, कदाचित अजूनही असे त्यांचे आशयघन, तरल काव्यसंग्रह वाचताना आपण कवितीक अनुभवानं समृद्ध होत जातो. स्वतःशी बोलतं करणारी यांची कविता आजच्या लिहित्या नव्या पिढीनी जरूर अभ्यासावी, आत्मचिंतन करावं आणि मगच आपली कविता लिहावी.

डॉ. मंगला वैष्णव यांचेही मोलाचे योगदान काव्यविश्वाशी निगडित आहे. त्यांचे सांध्यरंग, तालमोर हे काव्यसंग्रह तसेच अटलबिहारी वाजपेयी आणि नरेन्द्र मोहन यांच्या हिंदी कवितांचा अनुवाद प्रकाशित आहे.

माजलगाव येथे झालेल्या पाचव्या लेखिका साहित्य संमेलनाच्या व सातव्या ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा, लेखिका ललिता गादगे यांचे फसवी क्षितिजे, अग्निजळ, संवेदन हे काव्यसंग्रह तर आयुष्याच्या काठाकाठाने, दुःख आणि अश्रू, प्राजक्ताची फुले हे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. ग्रामीण जीवनाचे तसेच ग्रामीण स्त्रीचे जीवन, तिची उपेक्षा, तिच्या जगण्याची एकूण लढाई यांचे चित्रण त्यांच्या लिखाणातून आपल्याला सातत्याने दिसून येते.

व्यवसायाने डॉक्टर असणार्‍या पैठणच्या उर्मिला चाकूरकर यांचे चांदणचाफा, पर्णपाचू, पर्जन्यास्त्र, पलाशपंख हे चार काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. गद्य-पद्य दोनीही समर्थपणे पेलणारी यांची अभिव्यक्ती आहे. निसर्ग, स्त्री अभिनिवेश, आत्मशोध असा प्रवास करणारी यांची कविता अधोरेखित करावी अशीच आहे.

कवयित्री वैशाली दंडे यांचा ‘अस्तित्व पणती’ काव्यसंग्रह 1996 ला प्रकाशित झाला. ‘क्षणस्थ’ हा प्रकाशनाच्या वाटेवर आहे. स्त्रियांची अस्मिता जाणून समाजाने दखल घ्यावीच पण तिनेही आपला आयुष्य-गोवर्धन एक आदिशक्ती बनून पेलावा. चिंतन आणि मनन करून अभिव्यक्त झाले तर त्या अभिव्यक्तिला विचारांची खोली प्राप्त होईल, असे त्या नेहमीच म्हणतात.

आपल्या भावनांना लिहून वाट करुन दिली की मोकळं वाटतं हे लक्षात येऊन सुरवातीला स्वांतसुखासाठी लिहिणारी कवयित्री रंजन कंधारकर हिच्या कवितेनी मात्र दखल घ्यायला लावली. ‘स्वधा’ या त्यांच्या काव्यसंग्रहाला 2007 चा महाराष्ट्र शासनाचा ‘बहिणाबाई चौधरी’ उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार देखील मिळाला आहे. आता त्यांचा ‘भूर्जपत्र’ नावाचा दुसरा काव्यसंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे. वास्तवावर आधारित दु:ख मांडणारी कविता हे त्यांच्या कवितेचे वैशिष्ट्य म्हणता येईल.

राधाकृष्णाच्या अद्वैतात रमणार्‍या वृषाली श्रीकांत यांची कविवर्य ना. धों. महानोर यांच्या ‘तिची कहाणी’ या काव्यसंग्रहावर ‘तिची कहाणीच्या निमित्ताने’ आस्वादक समीक्षा, राधा, जावे ‘ती’च्या वंशा या कादंबर्‍या प्रकाशित तर सृजन सोहळा-ललित लेख संग्रह व एक काव्यसंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे.

वृंदा देशपांडे – जोशी यांचे अंतर्नाद (काव्यसंग्रह), गंमत – जंमत (बालकवितासंग्रह) प्रकाशित असून त्यांनी हैद्राबाद मुक्तिसंग्रामातील पूर्णवेळ कार्यकर्ते (भाग 1 व 2), संस्कृती उपासक व संवर्धक – ना. वि. देशपांडे या ग्रंथांच्या संपादनामध्येही सहभाग घेतलेला आहे.

औरंगाबादच्या उपजिल्हाधिकारी असणार्‍या लेखिका अंजली धानोरकर यांचे गट्टी फू – बालकथासंग्रह, मनतरंग – ललित लेखसंग्रह, व्यक्तिमत्त्व विकासासाठी सॉफ्ट स्किल्स आणि ‘मला आय.ए.एस.व्हायचंय’ ‘आप भी आय एस बन सकते हो’ या मुकेश कुमार यांच्या पुस्तकाचा हा अनुवाद देखील प्रसिद्ध आहे. तसेच आकाशवाणीवरील ‘अमृतधारा’साठीही त्यांनी लिखाण तसेच प्रसारण केले आहे.

आहारतज्ज्ञ असणार्‍या रसिका देशमुख यांचे स्त्री मनाचा वेध घेणारे श्रावणसरी, रंग गवसल्या शब्दांचे, नात्यांच्या तळ्यात-मळ्यात हे काव्यसंग्रह प्रकाशित असून अल्हाद, आई आणि बुलबुल ही किशोर कादंबरी व त्याचा हिंदी अनुवाद आणि पपन गाणी, मिठू गाणी हे बालकवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. आहारावरील 14 पुस्तके त्यांनी लिहिलेली आहेत.

अतिशय हृद्य लिहिणार्‍या कवयित्री आशा जोशी यांचे रंग अक्षतांचे हा काव्यसंग्रह, आभाळच कोसळलंय, खेळिया हे कथासंग्रह, मनाचा उंबरा ओला हा ललित लेखसंग्रह, एक कादंबरी प्रकाशनाच्या मार्गावर आहे.

स्वतःचे वेगळेपण जपत दलित संवेदनेपार जाऊन स्त्रीवादी लेखन करणार्‍या प्रतिभा अहिरे यांची कविता नोंद घ्यायला लावते. मला हवी असणारी पहाट हा त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित आहे.

गझल हा काव्यप्रकार हाताळणार्‍या, स्वरचित गीतांचे अनेक कार्यक्रम करणार्‍या, गीतेचा प्रसार प्रचार करणार्‍या, अरुणा कुलकर्णी यांचे काव्यांजली, पू. गोंदवलेकर महाराजांच्या 365 प्रवचनांवर 365 गाणी आणि एक नवी पहाट इत्यादी काव्यसंग्रह प्रकाशित आहेत.

तिसर्‍या मराठवाडा लेखिका संमेलनाच्या अध्यक्षा लता मोहरीर यांनी शेक्सपियर आणि मराठी नाटक प्रदीर्घ तुलना, वेध साहित्यकृतीचा – हा समीक्षा ग्रंथ लिहिला आहे. यांचे समीक्षेच्या क्षेत्रातील अभ्यासपूर्ण योगदान अतिशय मोलाचे आहे.

वा. रा. कांत यांच्या काव्याचा चिकित्सक अभ्यास करणार्‍या, समीक्षकीय परिप्रेक्षातून लिहिणार्‍या अरुणा चौधरी यांची एकूण तीन पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.

सुहासिनी इर्लेकर या आपल्या कवयित्री आईच्या प्रेरणेतून लिहिणार्‍या सुषमा म्हैसेकर यांचे निलांबरी, अमृतकुंभ, परीसस्पर्श असे दखलपात्र काव्यसंग्रह आणि रात पुनवेची हा एक कथासंग्रह प्रकाशित आहे. कांत : काव्य दर्शन, शोध कांतांच्या-नाट्यकाव्यावर आधारित, चिंतनवाटा – समीक्षा. समीक्षेतले राजश्री पवार हे नाव देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. अलका राजेभोसले, विमल पंडित, दिव्यलता गुजराती, नीलिमा पंढरे, सुमित्रा जोशी, छाया तातेड, अनुपमा मोघे, ज्योती स्वामी, विद्या पाटील, ज्योती सोनवणे, आशा डांगे, माधुरी चौधरी, सविता लोंढे, उज्ज्वला बागुल-खोब्रागडे असे अजूनही अनेक लिहिते हात औरंगाबाद येथे आहेत.


जालना

रेखा बैजल ‘सृजनाच्या वाटेवरील निगर्वी लेखिका’ असे संबोधित होणार्‍या या अक्षरयात्री. मराठवाड्यातील एक महत्त्वाची आणि सशक्त, सर्वस्पर्शी लेखन करणारी अभिव्यक्ती. परभणी येथे झालेल्या दुसर्‍या लेखिका संमेलनाच्या अध्यक्षा. यांचे प्रस्थान, तृप्ता, जलपर्व, अज्ञेय, देवव्रत, युगावर्त, मृत्यू जगलेला, माणूस (कादंबरी), अंतरिक्षातील शेजारी (विज्ञानकथा), अब तो जिया जाएँ (हिंदी कविता संग्रह) या कवितासंग्रहाला अमिताभ बच्चन यांची प्रस्तावना आहे, अशब्द (कथासंग्रह), आकाशओढ (नाटक), आदिम (एकांकिका), आदिम (कथासंग्रह), कॉंच की दीवार (‘भिंत काचेची’ या नाटकाचे हिंदी रूपांतर), काटा रुते कुणाला (चित्रपटकथा), किडनॅपिंग (विज्ञानकथा), क्लोन (विज्ञानकथा), तपस्या (कथासंग्रह), दुष्काळ (कथासंग्रह), नक्षत्र (ललित गद्य), निसटते किनारे (कथासंग्रह), पक्षी जाय दिगंतरा (कथासंग्रह), प्रकाश शलाका (ललित गद्य), प्रकाशाची फुल, मम्मी रोबो (एकांकिका), मानस, शिवार, स्पंदन, स्वप्नस्थ इत्यादी कथासंग्रह, स्वतःतून उगवताना (कवितासंग्रह), असे केवढे तरी साहित्य प्रसव यांच्या नावावर.

अनेक पुरस्कारांनी सन्मानित म्हणून आवर्जून नामोल्लेख करावा लागेल अशा कवयित्री डॉ. संजीवनी तडेगावकर यांचे अरुंद दारातून बाहेर पडताना, संदर्भासहित इत्यादी कवितासंग्रह प्रकाशित आहेत तसेच आणि झरे मोकळे झाले, चिगूर हे लेखसंग्रहही प्रकाशित आहेत.

जालन्याच्या परंतु आता पुणे येथे वास्तव्यास असणार्‍या आराधना कुलकर्णी यांचे लेखनातील कार्य मोलाचे आणि लक्षवेधी आहे. त्यांचे अनुबंध-कथासंग्रह, यशोशिखरावर हा महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा पत्रसंग्रह खंड तिसराचा अनुवाद, रवींद्रनाथ टागोरांच्या निवडक कथा, ज्योतिष विज्ञान ओशो अनुवाद, जगातील 20 महान शास्त्रज्ञ अनुवाद, जागतिक शास्त्रज्ञांची 15 चरित्रात्मक द्विभाषिक पुस्तके, प्रेमचंद यांच्या निवडक कथा, अद्भुत परिकथा मालिका, कुरूप बदकाची गोष्ट, राजाचा अंगरखा, मोगलीची गोष्ट इत्यादी साहित्य प्रकाशित असून त्या नैमित्तिक वृत्तपत्रीय लेखन तसेच साप्ताहिक ‘स्वदेश’साठी कोलाज नावाचे सदर लिहीत आहेत.

प्रा. डॉ. ज्योती धर्माधिकारी, रेखा नाथ्रेकर, रत्नमाला मोहिते, प्रा. डॉ. विद्या दिवटे, मुमताज खान अशा अनेकजणी लिहिताना स्वतःची मुद्रा उमटवत आहेत.

नांदेड
डॉ. मथु सावंत या ग्रामीण साहित्यासाठी विशेष परिचित असलेल्या मराठी लेखिका आणि नांदेडच्या पीपल्स महाविद्यालयात मराठीच्या प्राध्यापक आहेत. चार कथासंग्रह, दोन कादंबर्‍या, दोन नाटके व एक समीक्षाग्रंथ प्रसिद्ध झाला असून याशिवाय त्यांनी चरित्रात्मक लेखनही केले आहे. मराठवाड्यातील पहिल्या ग्रामीण कथाकार असल्याचा मान त्यांच्याकडे जातो. ‘तिची वाट वेगळी’ हा त्यांचा कथासंग्रह म्हणजे महिलांच्या 33 टक्के आरक्षणाची स्पंदने आणि आंदोलने टिपणारा लेखाजोखा आहे.

बीड येथे झालेल्या चौथ्या मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. जिनगानी, राहुकेतू या कादंबर्‍या, नवरसांची नवलाई- नाटक, निवडुंगाची फुलं-बालकथासंग्रह, समाज, साहित्य आणि संस्कृती आणि सर्जनाचा शोध ही समीक्षा असे कितीतरी साहित्य त्यांचे प्रकाशित आहे.

सातव्या लेखिका संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. वृषाली किन्हाळकर यांचे तारी, वेदन हे कवितासंग्रह तर संवेद्य, सहजरंग हे ललित लेखसंग्रह प्रकाशित आहेत. यांची कविता वैद्यकीय अनुभवातून विविध स्तरातील वैविध्यपूर्ण स्त्री प्रश्न जवळून अनुभवत अतिशय संवेदनशील होत सक्षमतेने स्त्री जीवनानुभूत प्रश्नांना सामोरी जाते. स्वत्त्व शोधते. आत्मनिष्ठ शब्दातून प्रसवत राहते.

गंधखुणा या वार्षिक अंकाच्या संपादक असणार्‍या आशा पैठणे यांनी चाळीस वर्षांच्या लेखनप्रवासात संवेदन हा कवितासंग्रह आणि नुकतेच ‘दिले… घेतले’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध केले आहे.

मराठवाड्याच्या काव्यक्षेत्रातील लता बोधनकर हे मोठं नाव. डॉक्टर सुहासिनी इर्लेकर यांच्याही आधी 1965 मध्ये कौटुंबिक भावजीवनावर आधारित असा लता बोधनकर यांचा ‘कर्पूर’ नावाचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला.

वाळुतील फुले, गजगे ही वृत्तपत्रीय सदरे तसेच लोकसत्ता, म. टा., दिव्य मराठी, लोकमत, मराठवाडा, अजिंठा, लौकिक, पुण्यनगरी, गोदावरी टाइम्स, प्रजावाणी आदी नियतकालिकांतून त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे.

बाईपणाचे दु:ख उगाळत न बसता संपूर्ण समष्टीच्या सुखदु:खाशी नातं सांगणारं लेखन करणार्‍या डॉ. ज्योती कदम यांचे मोरपीस आणि गारगोट्या चित्रकाव्य हे दोन काव्यसंग्रह तसेच दोन वैचारिक, पोलिसिंग : अ न्यू डायमेंशन आणि महिला सहाय्य कक्ष पुस्तिका प्रकाशित असून एकविसाव्या शतकारंभीच्या मराठी कविता आणि कवी हे बालकवितासंग्रह, ललित लेख संग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहेत.
बालभारती अभ्यास मंडळावर कार्यरत असणार्‍या तसेच लातूर बोर्डात तज्ज्ञ प्राध्यापक म्हणून नियुक्त असणार्‍या प्रा. स्वाती कानेगावकर यांचे अश्रूंचे मोल, बंध-अनुबंध हे कथासंग्रह प्रकाशित आहेत.

ललित, कथा, व्यक्तीचित्र, कविता, समीक्षा यांचे सातत्याने त्या लेखन करत असतात. त्यांचे एक व्यक्तीचित्र प्रकाशनाच्या वाटेवर आहे.

भाळआभाळ (आत्मचरित्र), विचार संपदा, मराठवाड्यातील आदिवासींच्या बोलीभाषा आणि हिंदी, हिंदी के मुस्लिम रचनाकार, मेहरुनिसा परवेझच्या कादंबर्‍यातील भारतीय स्त्रियांचे स्थान, भारतीय मुसलमान शोध आणि बोध, भारताची फाळणी का आणि कश्यासाठी झाली? असे केवढे तरी अभ्यासपूर्ण लेखन करणार्‍या प्रा. डॉ. तस्नीम पटेल यांचे साहित्य निश्चितच नोंद घेण्याजोगे आणि आपणही अभ्यासण्याजोगे असेच आहे.

जाणिवांच्या वाटेवर संयमाने अभिव्यक्त होत, तहहयात, पाय पोळ, प्रलयानंतरची तळटीप हे काव्यसंग्रह आणि स्त्री कवितेचे भान-काल आणि आज हा समीक्षाग्रंथ लिहिणार्‍या शिक्षण विस्तार अधिकारी सुचिता खल्लाळ हे आजचे काव्यजाणिवेतले एक आश्वस्त आणि महत्त्वाचे नाव.

इंडियन राईटर्स इन इंग्लिश : अ ट्रीटाईज (प्रोज, फिक्शन अँण्ड ड्रामा) हे योगिनी पांडे सातारकर यांचे इंग्रजी भाषेतील पुस्तक करंट पब्लिकेशन, आग्रा यांनी 2012 मध्ये प्रकाशित केले आहे. जाणिवांचे हिरवे कोंभ हा त्यांचा कॉन्टिनेन्टलने प्रकाशित केलेला काव्यसंग्रह लक्षवेधी, स्वतःची मुद्रा उमटवणारा असून त्यांची कविता सातत्याने विविधही साहित्य पत्रिकांमधून प्रकाशित होत असते. त्यांच्या कवितांचा अनुवाद हिंदी, इंग्रजी भाषेतही झाला असून लवकरच बंगाली भाषेत होणार आहे. इंग्रजी कविता साहित्य अकादमीच्या इंडिअन लिटरेचर या नियतकालिकातून समकालीन मराठी कविता या विशेषांकात प्रकाशित झाल्या आहेत. साहित्य अकादमी, नवी दिल्ली यांनी आंतरराष्ट्रीय महिलादिनानिमित्त आयोजित केलेल्या अखिल भारतीय लेखिका संमेलनात निमंत्रित कवी म्हणून 8 मार्च 2018 रोजी मराठीसाठी त्या सहभागी होत्या. त्यांची कवितारती, या वाङ्मयीन नियतकालिकात ‘समकालीन कवितेतील स्त्री’ ही समीक्षेची लेखमाला सध्या सुरू आहे.

मसाप शाखा उमरीच्या कार्यवाहपदी असणार्‍या नंदा देशमुख-देशपांडे यांचा ‘मधुरा’ कवितासंग्रह, ‘गंधवेणा’ चारोळीसंग्रह प्रकाशित. विविध दैनिकात सातत्याने लेखन करतात. प्रामुख्याने नवसाहित्यावरील समीक्षा लिहितात. गेल्या पंधरा वर्षापासून सातत्याने कथा, कविता, ललित लेखन प्रकाशित.

डॉ. सौ. शारदा तुंगार यांचे पाथेय, शिकोरी, मुक्तध्रुवा, शांग्रीला, अमृतयोग इत्यादी ग्रंथ प्रकाशित असून याशिवाय अनेक मासिके, दिवाळी अंक, दैनिकातून त्यांचे वैचारिक लेखन सातत्याने चालू आहे. आर्य समाज नांदेड तर्फे प्रकाशित होणार्‍या आर्य भास्कर या साप्ताहिकातून सालापासून पत्रकारितेस सुरुवात नंतर अमृतपुत्र, युग धारा, युग मंथन या मासिकाचे संपादन केले आहे.

‘समाजाचे हित जपते ते साहित्य’ अशी जीवनवादी भूमिका असल्यामुळे लेखिकेचा शाब्दिक चमत्कार करणारे कलावादी साहित्य निर्माण करण्यापेक्षा समाजाला नवी दिशा देणारे साहित्य निर्माण करण्याकडे कल आहे.

महिलांचे सबलीकरण, स्त्री पुरुष समानता, सामाजिक प्रबोधन, जागरूकता या दृष्टिकोनातून लेखन करणार्‍या दीपा बियाणी यांची ऑन द पाथ ऑफ मेरीट, येस स्वप्नातून सत्याकडे, ‘अशी मी घडले’चे संपादन इत्यादी साहित्य संपदा प्रकाशित आहे.

स्वाती काटे-तौर, चांगुणाबाई गोणारकर, लीला धनपलवार, गीता लाठकर, कमल कदम, मंगल फुलारी देखील आवर्जून दखल घ्यावी अशा महत्त्वाच्या कवयित्री आहेत.

माहूर
समाजात घडणार्‍या घटना, सामाजिक विषमता, शोषण अशा अनेक समस्यांनी विद्ध होऊन, त्या घटनांना आपल्या कादंबर्‍यामधून उजागर करणार्‍या माहुरच्या कादंबरीकार पद्मा मदकुंटे यांच्या झापड, जायदाद या दोन कादंबर्‍या प्रकाशित असून वांङ्मयीन मासिकांमधून त्यांच्या कथाही प्रकाशित आहेत. गद्य लेखनातील लेखिकांचा एकूण सहभाग बघताना या दशकातील गद्य लेखनातले हे नाव महत्त्वाचे ठरावे असेच आहे.

परभणी
समाजाशी जोडलेली नाळ आणि त्यातून येणार्‍या अनुभवातून लिहित्या झालेल्या लेखणीतून, ‘पंख कापलेल्या पक्षाची भरारी’ हा कथासंग्रह तर ‘हा दैवाचा खेळ निराळा’ आणि ‘दीपस्तंभ’ या दोन कादंबर्‍या लिहिणार्‍या कमलताई कुलकर्णी यांनी त्यांचे बंधू ज्येष्ठ विचारवंत, समाजचिंतक आणि समीक्षक कै. नरहर कुरुंदकर यांच्यावर लिहिलेला ‘भावतरंग’ हा काव्यसंग्रह आठवणींची आदरांजली म्हणून प्रसिद्धच आहे.

अनेक साहित्यसंमेलनांमधून कथा-कथनामध्ये आपला ठसा उमटवणार्‍या सरोज देशपांडे यांचे ‘झाले मोकळे आकाश’, ‘या अशा सांजवेळी’ आणि ‘म्हणावा नवरा अपुला’ असे कथासंग्रह प्रकाशित आहेत.

समाजभान जपणारी, कृतीत उतरवणारे काही सांगण्याच्या भूमिकेतून लिहिणारी अर्चना डावरे हिचे ‘जुलूस’ आणि ‘वर्तुळाबाहेर’ हे दोन कथासंग्रह तर बालगोपाळांची गाणी हा काव्यसंग्रह प्रकाशित आहे. ‘जुलूस’ हा त्यांचा कथासंग्रह ‘चपराक’चे घनश्याम पाटील यांनीच प्रकाशित केला आहे.

गद्य आणि पद्य दोन्हीतही आपला ठसा उमटवणार्‍या वसुधा देव यांना टाळून आपल्याला पुढे जाता येणार नाही.

‘अनपेक्षित’ – वैशाली कोटंबे, ‘चंद्र साक्षी’ – अनुराधा पोळ, ‘पहाटवेळी’ – प्रतिभा जोशी, ‘गंध ओल्या मातीचा’ – रत्नमला मोहिते, ‘चंदन गंध’ – सुलभा देशपांडे, ‘आत्ममग्न’ – सुषमा मुंजे या काव्यसंग्रह प्रकाशित असणार्‍या तर माधुरी सावंगीकर, रजनी कुलकर्णी, पल्लवी देशपांडे, सुनंदा जोशी, मनीषा कुलकर्णी-आष्टीकर, सावित्री चिताडे, मयुरी लव्हेकर, जयश्री सोन्नेकर या प्रकाशन नावाच्या वाटेवरच्या लेखिका, कवयित्री आहेत.

अंबेजोगाई
प्रखर स्त्रीवादी भूमिका न घेता स्त्रीचं दुःख, तिची समाजाप्रती होणारी अगतिकता, तिचे भोग मांडणार्‍या कै. डॉ. शैला लोहिया यांनी उपेक्षित समाजघटकासाठी आपलं आयुष्य शब्दशः आणि अक्षरशः वेचलं. त्यामुळेच त्यांच्या कवितेतली असहाय्य स्त्री आपल्याला अंतर्बाह्य हलवून टाकते. जाणिवांना बधीर न करता जाग आणते. त्यांचे ‘इत्ता इत्ता पाणी’, ‘सात रंग सात सूर’, ‘मनतरंग’, ‘तिच्या डायरीतली पाने’, ‘भूमी आणि स्त्री’ असे सारेच साहित्य खूपच हृद्य आहे.

डॉ. प्रा. वैशाली गोस्वामी-कुलकर्णी हे अंबेजोगाईच्या काव्यक्षेत्रातले एक सशक्त नाव पण अजूनही काव्यसंग्रह त्यांनी काढलेला नाही. मात्र ‘रंग अंतरीचे’ या त्यांच्या ब्लॉगवर आपण त्यांना जरूर वाचू शकतो. सकस काव्यनिर्मिती करणार्‍या या कवयित्रीचा संत साहित्यावर गाढा अभ्यास असून, ‘श्रीदिगंबरार्पणमस्तु’ हे संत सर्वज्ञ दासोपंतस्वामींचे भावचरित्र, ज्यात दासोपंतांचा संप्रदाय, आख्यायिका यावर त्यांनी संशोधकीय भाष्य केले आहे. तसेच संत साहित्य, ललित लेख, विनोदी लेखनही त्यांनी केलेले आहे.

गृहिणीच्या सीमित जगातले असीमित भावविश्व कवितेतून मांडणार्‍या, अनुपमा कृष्णा मोटेगावकर या म. सा. प. अंबेजोगाईच्या माध्यमातून सक्रिय असणार्‍या लेखिका. यांचा ‘अनुसंधान’ हा काव्यसंग्रह प्रकाशित असून अनेक दैनिकातून, दिवाळी अंकांमधून त्या स्फुट, ललित, काव्यलेखन करतात.

जगण्याचे बळ पुरवत कविता जगण्याचं गाणं करते असं म्हणत जगण्यातील उत्कटता, संवेदना व्यक्त करत दीर्घकालापासून मंजुषा कुलकर्णी काव्यलेखन करत आहेत. ‘वेधांच्या प्रदेशात’ या मराठवाड्यातील निवडक कवींच्या काव्यसंग्रहात त्यांच्या कवितांचा समावेश आहे.

संवेदनशील मनानी प्रवासताना, मनातलं, समाजातलं, नात्यातलं, निसर्गातलं, लपलेलं, खुपलेलं, भावलेलं, भारावलेलं असं सारं काही लयीला पांघरत शब्दबद्ध होणार्‍या निशा चौसाळकर लिहित्या होतात आणि कथा, कविता, बालगीते, बाल नाटुकले असे लेखनप्रकार हाताळतात. त्यांचा, निनाद हा काव्यसंग्रह प्रकाशित आहे.

बीड
संत साहित्याच्या अभ्यासक असणार्‍या मराठवाड्यातल्या अतिशय महत्त्वाच्या कवयित्री, मराठवाडा विद्यापीठाच्या पहिल्या महिला पीएचडी म्हणूनही ज्यांची आवर्जून दखल घ्यावी लागेल त्या कै. डॉ. सुहासिनी इर्लेकर यांचे तृप्ती, छांदस, अक्षर, गाथा, ह्या मौन जांभळ्या क्षणी, चित्रांगण, आल्या जुळूनी तारा असे सात काव्यसंग्रह आहेत. भावोत्कट, तरल, निसर्ग स्पंदनं आपल्या लेखणीतून अभिव्यक्त करत त्यांनी साहित्य आणि समीक्षा, संत साहित्याचे सखोल विवेचन, यादवकालीन मराठी काव्य समीक्षा अशा अनेकविध ग्रंथांचीही निर्मिती त्यांनी केलेली आहे.

तितक्याच व्यासंगी, अभ्यासू आणि जगण्याचा आवाकाही भरपूर मोठा असणार्‍या सुहासिनी इर्लेकर यांची लेक डॉ. दीपा क्षीरसागर आठव्या मराठवाडा लेखिका संमेलनाच्या अध्यक्षा यांनीही अनेक पुस्तकांचे संपादन केलेले आहे. प्राचार्या असताना महाविद्यालयाच्या आवारात अनुभवलेले प्रसंग तसेच नगराध्यक्ष असताना घेतलेले अनुभव, केलेली निरीक्षणे यातूनच माणूस वाचता येऊ लागला, समजू लागला. त्यातूनच पुढे कॉलेज कॅम्पस आणि प्रकाश उजळवणार्‍या वाटा या संग्रहाची निर्मिती झाली. मैत्र जीवांचे, रंगवेध, झाले मोकळे आकाश, आईवरील कवितांचे संकलन अशा अनेक ग्रंथांचे संपादन देखील त्यांनी केलेले आहे. ऊसतोड महिला कामगार आणि ग्रामीण महिला यांच्या प्रश्नांवर आधारित त्यांचा ग्रामीण कथासंग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहे.

स्त्रीच्या आंतरिक मनाचा वेध घेत, ओढ, गाऊ देत गाणी, नक्षत्रांचा गाव अशा भावगर्भ काव्यसंग्रहाची निर्मिती करणार्‍या कै. कांचन पाडगावकर यांचेही योगदान मोलाचे आहे.

अलका चिडगोपेकर यांच्याही कविता दखलपात्र आहेत.

लातूर
स्रीने स्त्रीवादाच्या कोषातून बाहेर पडून आता नवी कविता लिहिली पाहिजे. नवे, वेगळे आयाम तिच्यातून व्यक्त व्हायला हवेत. अशा भूमिकेतून नीलिमा श्रुतिश्रवण लिहितात. त्यांचा ‘हिरवीच खंत खोल’ हा काव्यसंग्रह असून ‘आग सनातन आहे’ हा काव्यसंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे. वेगवेगळ्या दैनिकांमधून पुस्तक परीक्षणं, समीक्षा लेखन त्या सातत्याने करतात.

‘नात्यात विभागले गेलेले अस्तित्व मला मान्य नाही म्हणून मी स्वत्त्वाचा शोध घेण्यासाठी लिहिते,’ अशी एक स्वतंत्र भूमिका घेत लिहिणार्‍या वृषाली विक्रम पाटील यांचे ‘इंद्रधनुष्य’ – काव्यसंग्रह, ‘पैशाचे झाड’ – बालकाव्यसंग्रह, ‘स्वप्नं सांधताना’ हा कथासंग्रह प्रकाशित असून ‘अंधारातील डोळे,’ ‘पक्षी गेले कुठे?’ या बालकादंबर्‍या, एक कथासंग्रह, हायकूसंग्रह, बालकवितासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.

व्यक्त होण्याच्या असोशीतून लिहिणार्‍या प्रा. नयन भादुले – राजमाने यांचे ‘बिल्वदल’ हा काव्यसंग्रह, ‘रूंदावणार्‍या कक्षा’ हा कथासंग्रह तर ‘इंद्रवज्र,’ ‘शब्दकंगोरे,’ ‘लहानपण दे गा’ हे ललित लेखसंग्रह प्रकाशित आहेत. अनेक वृत्तपत्रातून स्तंभलेखन, वैचारिक लेखन त्या करतात.

आपल्या लेखनातून स्त्री जाणिवा आणि समाज यांना अधोरेखित करणार्‍या मेनका धुमाळे यांचा ‘आता उसळूदेत लाटा’ हा कवितासंग्रह आणि ‘कोरडा पाऊस’ हा कथासंग्रह प्रकाशित आहे.

अलवार शब्दात स्त्री मनाची जाणीव पेरणारी, तेवढ्याच सशक्तपणे नाजूक, हळूवार लावणी सुद्धा लिहिणारी शैलजा कारंडे यांचे ‘तुर्तास एवढेच’, ‘बाभूळवेडी राधा’, ‘हे परमप्रिय परपुरुषा’ हे काव्यसंग्रह आणि एक लावणी संग्रह प्रकाशनाच्या वाटेवर.

‘कहां से आये साईबाबा,’ ‘साईबाबांची हिंदी भजनं’, भूपाळी, आरत्या आणि अध्यत्मिक लेख लिहिणार्‍या अनुराधा दिलीप भातलवंडे या सध्या सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या 365 प्रवचनांचा साररुपी काव्यानुवाद करत आहेत. त्यांचा अंबरपाणी हा काव्यसंग्रह प्रकाशित असून चांदण वेल हा प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे.

विमल मुदाळे, अनुराधा भातलवंडे, सुनंदा सिंगनाथ, सुलोचना मुळे ही लिहिती नावेही उल्लेखनीय आहेत. व्यवसायाने डॉक्टर असणार्‍या अस्मिता फड यांच्या कवितेत चिंतनशील अनुभवकथन दिसून येते.

मनातली घुसमट, अस्वस्थता आणि सामाजिक अस्वास्थ्य तसेच अनेक प्रकारचे भेद यांनी विषण्ण होऊन लेखनाला सुरुवात केलेल्या विद्या बयास- ठाकूर या शिरूरताजबंद येथील कवयित्री. यांचे ‘आभाळ अंतरीचे’ हा काव्यसंग्रह प्रकाशित आहे. ‘सुमी’ या ‘चपराक दिवाळी अंका’त प्रकाशित दीर्घकथेला 2018 चा म.सा.प.पुणेचा ‘दि. अ. सोनटक्के’ पुरस्कारही प्राप्त झाला आहे. साहित्य पत्रिका, दैनिके, नियतकालिके आणि दिवाळी अंकातून त्या सातत्याने लेखन करतात. ‘मौनाचा करार’ हा त्यांचा दीर्घ कथासंग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहे.

अनुभवविश्वाचे बंदिस्तपण टाकून परिस्थितीच्या कठोर विश्लेषणाचे वैचारिक आत्मभान विकसित करत माणूसपण असलेली स्त्री प्रतिमा लेखिकांनी जन्माला घालावी, अशी भूमिका घेऊन लिहिणार्‍या उदगीरच्या अनिता येलमटे यांचा ‘आभाळपाटी’ हा शैक्षणिक लेखसंग्रह प्रकाशित असून दिवाळी अंकांमधून त्यांच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. कथेचं दमदार सादरीकरण करणार्‍या या लेखिकेची नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडियाच्या राजन गवस संपादित नवलेखन मराठी कथेत ‘काकणचोळी’ या कथेचा समावेश आहे.

आंबेडकरी चळवळीतील परिवर्तनवादी विचाराची कास धरणार्‍या, रुढी-परंपरा, वर्ण, वर्ग आणि रंगाच्या आधारे राजकारण करू पाहणार्‍या आणि एकूणच समाजव्यवस्थेवर भाष्य करणार्‍या कवयित्री संध्या रंगारी यांचे ‘आघात’, ‘कवडसे’, ‘संध्यारंग’ हे काव्यसंग्रह आणि ‘चांदणचुरा’ हा ललित लेखसंग्रह प्रसिद्ध आहे.

स्त्री-पुरुष नातेसंबंधांवर कविता करणारी हिंगोली जिल्ह्यातील वसमतची कवयित्री मीरा शंकर यांचे ‘चांद झुलतो आभाळी’ आणि ‘उत्सव’ असे दोन काव्यसंग्रह प्रकाशित आहेत.

उस्मानाबाद
माध्यम कोणतेही असो निर्भयपणे व्यक्त होणं महत्वाचं असतं, असे म्हणत आपली अभिव्यक्ती जपणारी तृप्ती अंधारे यांचा ‘अंतर्दाह’ हा काव्यसंग्रह प्रकाशित असून ‘श्वास नवे कवितेचे’, ‘दप्तरातील कविता’, ‘इटुकल्या पिटुकल्या गोष्टी’, ‘प्रगतीचे पंख नवे’ इत्यादी संपादित
पुस्तके आहेत.

कौटुंबिक पार्श्वभूमी अत्यंत सामान्य, त्यामुळे भवताल हाच लेखनाचा मुख्य गाभा. केवळ व्यक्त होण्यापुरतं मर्यादित न राहता एक सूचक, दिशानिर्देश करण्याचा कसोशीने प्रयत्न करीत, मानवी मूल्यांचा नैतिक बंध जपत आणि संविधानाने बहाल केलेली मूलभूत जाणीव ही कवितेची मूळ प्रेरणा. हीच प्रेरणा अधिक प्रवाही करण्यासाठी शब्दाचे निखारे पदरात बांधून कायम लेखन करीत राहणे हाच जिवंत असण्याचा खरा पुरावा आहे असे मानत, लिहिणार्‍या भाग्यश्री केसकर या विविध दैनिकांतून कविता, ललित आणि कविता संग्रहावरील रसग्रहण लिहितात. डॉ. यशवंत मनोहर यांनी संपादित केलेल्या ‘दीक्षाभूमीच्या कविता’ या संग्रहात त्यांच्या कवितांचा समावेश आहे. स्वतंत्र कवितासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे.

लोकजीवन, परंपरा, संस्कृती यातून स्त्री मनाचा वेध घेणार्‍या कमल नलावडे या कथा लेखिका असून त्यांचा ‘गोफ नात्यांचा – कथाव्यथा’ हा कथासंग्रह प्रकाशित आहे. गेल्या काही वर्षांपासून त्या दिवाळी अंकाचे संपादनही करतात.

निरागस, संवेदनशील मनातून परकाया प्रवेश हे गुण स्वभावतःच असले की काव्य प्रसवतेच या गुणांनी लिहिणार्‍या स्वप्नाली अत्रे, तनुजा ढेरे, मीना महामुन या कवयित्रींचा नामोल्लेख आवर्जून करावाच लागेल.

माजलगाव
पती स्व. प्रा. श्याम पाठक यांच्या अकाली निधनानंतर कोसळलेल्या मानसिकतेतून व्यक्त होण्यासाठी बेचैन मनातून आणि प्रतिकूल परिस्थितीतून प्रतिभा फुलत गेली. जे सोसले, जे भोगले ते शब्दबद्ध केले असे म्हणत लिहित्या झालेल्या स्नेहल पाठक यांचे ‘स्पंदन’, ‘आरोळ्या पाचटाच्या’ हे काव्यसंग्रह आणि ‘श्याम रंग’ हा स्मृतिग्रंथ प्रकाशित आहे.

प्रतिभा सदाशिव थिगळे यांचे साहित्य अनेक दिवाळी अंकातून प्रकाशित असून विविध दैनिकात त्या सातत्याने लिहितात. त्यांचा ‘माय माऊली’ हा कवितासंग्रह प्रकाशित आहे तसेच कथासंग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहे.

गौरी सुहास देशमुख यांचे अनेक दैनिकात, दिवाळी अंकातून तसेच आकाशवाणीसाठी लेखन चालू असते. दखलपात्र कवयित्री. येत्या काही दिवसात त्यांचा काव्यसंग्रह येईलच.

मराठवाडा साहित्य संमेलन, अंबाजोगाई, शिक्षक साहित्य संमेलन बीड, माजलगाव परिसरातील विविध शिवार संमेलनात कविता सादर करणार्‍या लता मुकुंद जोशी यांच्या ‘बहूतांची अंतरे’ तसेच निवडक कविंच्या ‘परागकण’ या कवितासंग्रहात कविता प्रकाशित आहेत.
मानवी मनाचा वेध घेत घेत सामाजिक चित्रण करणार्‍या प्रेमा कुलकर्णी यांचे ‘नात’ं, ‘जाणिवा अंतरीच्या’ आणि ‘उकल’ हे तीन काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. स्मिता लिंबगावकर, डॉ. प्रज्ञा जोशी, सुरेखा कोकड, स्मिता थाळकर अशा अजूनही अनेकजणी लिहित्या वाटेवरच्या प्रवासी आहेत.

पूर्वपरंपरांना सामावून घेत आपले अनुभवविश्व समृद्ध करत आपल्या साहित्यकृतीतून स्वतःला व्यक्त करणार्‍या या सगळ्या अभिव्यक्ती.

जाणिवांच्या सामर्थ्याने यातल्या काहीजणी महामार्गावरून चालत आहेत तर काहींना रस्ता सापडतोय. काही अजून चाचपडत आहेत आणि काही ठेचकाळत स्वतःला सावरत आहेत. यातल्या प्रत्येकीला आणि माझ्या अज्ञानामुळे किंवा विस्मरणामुळे जिचा नामोल्लेख राहिलेला आहे तिलाही या सर्जनशील अनुबंधाचा निश्चित मार्ग मिळो.

– प्रिया धारुरकर
औरंगाबाद
9890922089

‘चपराक दिवाळी अंक २०१९’ 

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा