मराठवाड्यातील साहित्यप्रेमींसाठी सुवार्ता

‘चपराक’ने मराठवाड्यातील वाचकांना, लेखकांना नेहमीच प्राधान्य दिले आहे.‘उपेक्षित ते अपेक्षित’ या न्यायाने सर्वच गुणवंतांना, प्रतिभावंतांना सामावून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. याचाच एक भाग म्हणून सुप्रसिद्ध कवी, पत्रकार आणि शिक्षक असलेल्या श्री. दिनकर जोशी यांची ‘चपराक’च्या मराठवाडा विभागाच्या संपादकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या प्रयोगाबाबतच्या नेमक्या संकल्पना काय आहेत हे जाणून घेण्यासाठी त्यांचे हे मनोगत देत आहोत. या परिसरातील लेखक, कवी, वाचकांनी श्री. जोशी यांच्याशी 7588421447 या क्रमांकावर संपर्क साधावा.

मराठवाड्यातील साहित्यिकांसाठी एक छान कल्पना ‘चपराक’चे संपादक घनश्याम पाटील यांनी मांडली आहे. त्यांच्या ‘साहित्य चपराक’ या मासिकात मराठवाड्यातील साहित्यिकांसाठी खास जागा असणार आहे. मराठवाड्यात ‘चपराक’चे वर्गणीदार आहेत. त्यांना ‘चपराक’चा दर्जा आणि आवाका माहीत आहे. त्यामुळे त्या मासिकातील काही पाने मराठवाड्यातील साहित्यिकांसाठी असतील. हा निर्णय किती मोठा असेल याची कल्पना येईल. त्यासाठी मी घनश्याम पाटील यांचे अभिनंदन करतो आणि आभारही मानतो.

मराठवाड्यात मी फिरतो तेव्हा जाणवतं की खूप दर्जेदार लेखन करणारे साहित्यिक आहेत. त्याचप्रमाणे नव्या पिढीतल्या लोकाकडे विकसित होण्याच्या क्षमता आहेत पण त्याला व्यासपीठ नाही. चांगले मार्गदर्शक नाहीत. आपल्यासाठी काय चांगले आहे हे ओळखण्याची दृष्टी नाही. हे सगळं मिळवण्याची सोय नाही. त्यामुळे ‘चपराक’चा हा निर्णय खूप महत्त्वाचा आहे. ‘चपराक’चे मासिक आणि साप्ताहिक आहे. त्याचप्रमाणे प्रकाशन संस्था आहे. या क्षेत्राचा दहा ते पंधरा वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळे ‘चपराक’च्या या मराठवाड्यातील लेखकांसाठी घेतलेल्या निर्णयासाठी खूप महत्व असेल.

मराठी साहित्यविश्वाात आता सध्या मराठी साहित्य लिहिणारे शिक्षणक्षेत्रातील लोक अधिक आहेत. प्राध्यापक, शिक्षक वगैरे. विद्यापीठातील प्राध्यापक, महाविद्यालयाचे प्राध्यापक (ज्युनिअर/सिनीअर) शिक्षक (माध्यमिक शिक्षक/प्राथमिक शिक्षक) अशी सगळी उतरंड तिकडे आहे. लेखनाच्या दर्जापेक्षा वेळेनुसार ही उतरंड वापरुन सगळे साहित्य व्यवहार चालतात. पैसे मिळाल्यावर प्रसिद्धी हवी. सध्या या वर्गाला पगारी चांगल्या आहेत, त्यामुळे प्रसिद्धीसाठी धडपडी सुरू असतात. विचारांचे नाव घेवून चालणारी जातीपातीची भांडणं आहेतच. धाक दाखवण्यासाठी वय वापरलं जातं. मराठी साहित्यविश्वाातील हे सगळं मराठवाड्याच्याही साहित्यविश्वाडत आहेच. त्याचबरोबर गुलामी आहे. लाचारी आहे. त्यामुळे साहित्य व्यवहार आणखीच अवघड झालाय. प्रत्येकाचे गट आहेत. त्यांचे उद्देश्य आहेत. उद्देश्यांसाठी गटांची भांडणं आणि कुरघोड्या आहेत. शह आणि काटशह आहेत. पुरस्कार, व्यासपीठ व संमलेनात सहभाग यासाठी चाललेल्या मारमार्याा आहेत. दु:ख एवढंच की एकविसाव्या शतकातही हेच सुरू आहे. कुणाला खंत नाही, दु:ख नाही. बदलावं वाटत नाही, काही करावं वाटत नाही.

हे वर सांगतोय ते पण नवं नाही. जुनचं आहे पण या गदारोळात नवं लिहिणारा आणि विकसित होण्याची क्षमता असणारा कोमेजून जातोय. उभं राहण्याचा प्रयत्न करून या रस्त्यावर आला की जळून जातोय. मराठवाड्याच्या नाही तर मराठी साहित्याचे हे दुर्दैव सुरू आहे. त्याला थोडं थांबवता येईल का? वैचारिक कुपोषणामुळे किंवा विषारी अन्नामुळे निघणार्याह या साहित्याच्या प्रकृतीला काही बळ देता येईल का हे पाहण्यासाठी ‘चपराक’चा हा प्रयोग आहे.

कुणाचे तरी अनुकरण हा लेखनाचा प्रारंभ असतो. नाटक, कथा आणि कविता यात चालू नाण्याचे अनुकरण होते. ते चालू आहे. ते जेवढे दिवस चालेल तेवढे दिवस हे साहित्यिक! पण स्वत:ची वाट असते ती शोधावी लागते. ती सापडेपर्यंत संयम ठेवावा लागतो. हे कुणीतरी सांगण्याची गरज आहे. ते विश्वाीस ठेवून ऐकण्याची गरज आहे. कारण निर्मिती ही सोपी गोष्ट नाही. ती तुमच्या सर्वस्वाचे दान मागते. ती देण्याची तयारी लागते. त्याशिवाय निर्मिती होत नाही पण त्याबाबत आणि त्याच्या आनंदाबाबत अनुभव घ्यावा लागेल. तो घेता येईल हे दाखवावे लागेल.

मराठवाड्यात वेगवेगळ्या पद्धतीने लिखाण होते आहे. वेगवेगळ्या व्यासपीठावरुन ते मान्यताही पावत आहे पण ते सर्व रसिकांपर्यंत नीट पोचत नाही. ते पोचण्यासाठीही या उपक्रमाचा फायदा होईल. त्याचप्रमाणे आपापल्या ठिकाणी लिहित राहणार्यांची संख्या खूप आहे. ते प्रसिद्धीसाठी धडपडत नाहीत पण त्यांचे साहित्य लोकांसमोर येत नाही. ते सुद्धा काम होईल. चांगले लिहिण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे काम आहे तसेच चांगले वाचण्याची सवय लावावी लागेल. या दोन्ही कामांसाठी परिश्रम करण्याची गरज आहे. ते आपण करू या. नक्की करू. भेटू. धन्यवाद.
– दिनकर जोशी

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा