पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरसंदर्भातलं कलम 370 हटवल्यानंतर सुषमा स्वराज यांनी ट्विट केलं की, ‘मी आयुष्यभर या दिवसाची प्रतीक्षा करत होते.’ दुर्दैवानं त्यांचं हे ट्विट शेवटचंच ठरलं आणि त्यांनी जगाचा निरोप घेतला. जणू या एकाच गोष्टीसाठी डोळ्यात प्राण आणून त्यांनी वाट पाहिली होती.
तीन वेळा आमदार, सात वेळा खासदार आणि दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून त्यांनी योगदान दिलं. वयाच्या अवघ्या पंचवीसाव्या वर्षी चौधरी देवीलाल यांच्या सरकारमध्ये त्यांनी श्रम मंत्री होत सगळ्यात लहान कॅबिनेट मंत्री होण्याचा मान मिळवला.
सुषमा यांचे वडील हरदेव शर्मा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. त्यामुळे त्याच वातारवणात वाढलेल्या सुषमा यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून त्यांच्या कारकिर्दीची सुरूवात केली. मुळातच फर्ड्या वक्त्या असलेल्या सुषमा यांचे संस्कृत आणि राज्यशास्त्र हे जिव्हाळ्याचे विषय. 1973 साली त्यांनी सर्वोच्च न्यायालात वकिली सुरू केली आणि तिथेच वकिली करणार्या स्वराज कौशल यांच्याशी 1975 साली त्यांचा विवाह झाला. स्वराज कौशल हे सुद्धा उत्तम वक्ते आणि राजकारणी असल्याने वयाच्या 37 व्या वर्षी ते मिझोरामचे राज्यपाल झाले.
अणीबाणीच्या काळात स्वराज कौशल हे समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडीस यांचे वकील होते. जॉर्ज तुरूंगात असताना निवडणूक लढवत असल्याने सुषमा आणि कौशल यांनी त्यांच्या प्रचाराची जबाबदारी स्वतःकडे घेतली. मुजफ्फरपूरला जॉर्ज यांनी तुरूंगातून अर्ज भरल्यानंतर सुषमा तिथे पोहोचल्या आणि संपूर्ण मतदारसंघ त्यांनी पिंजून काढला. मतदारांना जॉर्ज यांचा बंदीवासातील फोटो दाखवत त्या आक्रमक प्रचार करायच्या. त्यावेळी त्यांचा नारा होता, ‘जेल का फाटक टुटेगा, जॉर्ज हमारा छुटेगा…’ त्यांच्या या प्रचाराला यश आले आणि जॉर्ज निवडून आले.
हा लेख ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
अटलबिहारी वाजपेयी यांच्या तेरा दिवसाच्या सरकारमध्ये त्या माहिती आणि प्रसारण मंत्री होती. या काळात त्यांनी घेतलेला महत्त्वाचा निर्णय म्हणजे लोकसभेच्या कामकाजाचं थेट प्रक्षेपण! आज भारतीय चित्रपटला बँकांकडून उद्योजक म्हणून कर्ज मिळतं तेही सुषमा यांच्याच धोरणामुळं! कारण त्यांनीच या क्षेत्राला स्वतंत्र उद्योग म्हणून मान्यता दिली. अटलजींच्या मंत्रीमंडळात पुन्हा त्यांनी आरोग्य, कुटुंब कल्याण आणि संसदीय मंत्रीपदाचा कारभार बघितला. मोदींच्या पहिल्याच टर्ममध्ये त्या पहिल्या पूर्णवेळ महिला परराष्ट्र मंत्री झाल्या. यावेळी त्यांनी जगभरातील भारतीयांशी ट्टिटरच्या माध्यमातून संपर्क ठेवला. त्यांच्या कोणत्याही अडचणीला त्या क्षणाचाही विलंब न करता धावून जात.
2015 च्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत त्या पाकिस्तानवर घणाघाती टीका करताना तुटून पडल्या. त्यांनी थेटपणे पाकिस्तानचा ‘दहशतवादाची फॅक्टरी’ असा उल्लेख केला. 6 ऑगस्ट 2019 रोजी त्यांचं निधन झालं आणि ‘प्रशासनातील मानवी चेहरा’ अशी ओळख असलेल्या या सभ्य, सुसंस्कृत नेत्याला आपण गमावलं. यंदा त्यांच्या कन्या बांसुरी स्वराज या नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून भाजपाकडून लोकसभेची निवडणूक लढवत आहेत.
– घनश्याम पाटील
7057292092
दैनिक पुण्य नगरी, 16 मे 2024