मराठीला प्रतिसादशून्यतेचं ग्रहण!

डोंबिवली येथे झालेल्या 90व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘नवोदित लेखन : अपेक्षा आणि आव्हाने’ या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. मनस्विनी लता रवींद्र, प्रशांत आर्वे, रवी कोरडे आणि ‘चपराक’चे संपादक प्रकाशक घनश्याम पाटील यात सहभागी झाले होते. सचिन केतकर या सत्राचे समन्वयक होते. या चर्चासत्रातील घनश्याम पाटील यांचे भाषण खास ‘चपराक’च्या वाचकांसाठी.

सर्वांना नमस्कार!
आज मी ‘चपराक प्रकाशन’चा प्रकाशक, संपादक, लेखक, वाचक, पत्रकार आणि ग्रंथ विक्रेता या सगळ्या भूमिकेतून माझे मनोगत थोडक्यात व्यक्त करणार आहे. खरं तर या परिसंवादासाठी निमंत्रण देणारा पहिला फोन मला महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांचा आला, त्यावेळी मला आश्चर्यच वाटले! कारण मागची पंधरा वर्षे आम्ही ‘चपराक’ हे मासिक, साप्ताहिक आणि प्रकाशन संस्था साहित्यिक निष्ठेने चालवतोय. या क्षेत्रात काम करणार्‍यांची दखल साहित्य संस्था कधीही घेत नाहीत. इथे फक्त कंपुशाही असते. प्रसिद्धी हे असं एक अन्न आहे की, जे मेल्यावरच मिळतं. त्यामुळं प्रा. मिलिंद जोशी यांनी ‘‘तुम्ही चर्चासत्रात आणि तुमचे सहसंपादक माधव गिर निमंत्रितांच्या कवी संमेलनात निमंत्रित आहात’’ असे सांगितल्यावर आश्चर्य वाटले. म्हणजे साहित्य संस्थात आता ‘परिवर्तन’ घडतेय असे समजायला वाव आहे. असो! मी मुख्य विषयावर येतो.

नवोदितांचे लेखन, त्यांच्यासमोरील आव्हाने याविषयी प्रकाशक या नात्याने मी संक्षिप्त स्वरूपात मांडणार आहे. ठोकळेबाज विचारसरणीचे प्रस्थापित लेखक, प्रकाशकांची मुजोरशाही, समीक्षकांचे दुर्लक्ष आणि नवोदितांना त्यातून आलेला न्यूनगंड हे सारेच क्लेशकारक आहे. जुन्या पिढीने नव्या पिढीला ’विचार’ द्यायचा असतो. नेमका त्याचाच आपल्याकडे दुष्काळ दिसतो. बालकवी ठोंबरे, आचार्य अत्रे, भाऊसाहेब खांडेकर, शिवाजीराव सावंत असे मराठीतील लेखक कमी वयात उत्तमोत्तम लिहित होते. या लेखकांनी प्रयत्नपूर्वक स्वविकास साधला. इतकेच नाही तर यांनी अनेक नवोदितांना पुढे आणले. भाऊसाहेबांनी स्वतःच्या खिशातून पैसे टाकून कुसुमाग्रजांचा ’विशाखा’ कवितासंग्रह प्रकाशित केला. आचार्य अत्र्यांनी शांता शेळके, अनंत काणेकरांपासून ते सोपानदेव चौधरींपर्यंत अनेक लेखक-कवी पुढे आणले. ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत यांची ’मृत्युंजय’ ही कादंबरी कोणीही प्रकाशित करायला तयार नव्हते. अनेक प्रकाशकांचे उंबरठे झिजवल्यानंतर त्यांनी त्यातील काही प्रकरणे ग. दि. माडगूळकर यांच्याकडे पाठवली. ती वाचल्यानंतर गदिमांनी ’कॉन्टिनेंटल’च्या कुलकर्णींना फोन केला आणि सांगितले, ‘‘मुलगी गुणवान आहे. तुम्ही करून घ्यायला हरकत नाही’’ त्यानंतर ‘मृत्युंजय’ने इतिहास घडविला आणि मराठीला एक सशक्त लेखक मिळाला. ‘एकवेळ माझे साहित्य बाजूला ठेवा पण हे लेखक वाचाच’ अशी या लेखकांची भावना होती. यातच त्यांचे श्रेष्ठत्व सामावलेले आहे. सध्याचे लेखक मात्र संकुचित मानसिकतेतून बाहेर पडायला तयार नाहीत. ते पूर्णतः आत्मकेंद्री तर झालेले आहेतच पण नवोदितांविषयी त्यांच्या मनात असलेला आकस वेळोवेळी दिसून येतो. विशेषतः प्रतिसादशून्यतेचं ग्रहण मराठी साहित्याला लागलंय. नवीन लेखकांनी कितीही सकस, अभ्यासपूर्ण आणि संशोधनपूर्वक लिहिले तरी त्यांना प्रतिसाद द्यायचाच नाही, असा अलिखित नियम त्यांनी केलाय. हे ग्रहण न सुटल्यानेच अनेक उमलते अंकुर फुलण्यापूर्वीच खुडले जात आहेत. त्यामुळे मराठी साहित्यापुढचं सगळ्यात मोठं आव्हान हेच आहे. कुठं ते भाऊसाहेब खांडेकर, कुठं ते अत्रे? आजच्या प्रस्थापित साहित्यिकांत तुम्हाला ते दिसतात का? तर याचं उत्तर दुर्दैवानं अत्यंत निराशाजनक आहे.

यांना प्रतिसादशून्यतेचा रोग जडलाय. नवोदितांनी काहीही लिहू द्या… ते चांगलं असेल किंवा वाईट असेल…! त्याविषयी मतंच मांडायची नाहीत अशी यांची भूमिका! अरे वाईट आहे तर वाईट म्हणा! कौतुक नका करू; पण प्रतिक्रियाच द्यायची नाही. का? तर त्यांच्यापेक्षा अस्सल साहित्य सध्या मराठीत येतेय….
‘वाचनसंस्कृती कमी होतेय’, अशी आवई काही प्रकाशक जाणिवपूर्वक सातत्याने उठवतात. ही वस्तुस्थिती नाहीये. म्हणजे आम्ही जवळपास सव्वाशे पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यातली पन्नास-साठ लेखक मंडळी तरूण आहेत. त्यांची पहिलीच पुस्तके असूनही त्या पुस्तकांच्या अनेक आवृत्त्या निघाल्यात. आमच्या मासिकाचे सहा राज्यात सभासद आहेत. अगदी दोन उदाहरणं घ्यायची तर माझ्यासमोर सागर कळसाईत आणि निलेश सूर्यवंशी बसले आहेत. सागरने वयाच्या बावीसाव्या वर्षी ‘कॉलेज गेट’u ही कादंबरी लिहिली. जवळपास पन्नासएक प्रकाशकांनी त्याला नकार दिला. ती कादंबरी आम्ही ‘चपराक’कडून प्रकाशित केली. मागच्या तीन वर्षात त्याच्या पाच आवृत्त्या झाल्यात आणि तिच्यावर आता चित्रपट येतोय. निलेश सूर्यवंशीचेही असेच. निलेश सूर्यवंशीने 2009 ला कादंबरी लिहिली. अनेक प्रकाशकांचे उंबरठे झिजवले. कोणीही ती प्रकाशित करायला तयार नव्हते. त्यानंतर त्यानं ठरवलं की, ‘मी लिहिणारच नाही… माझं जर कोणी छापणारच नाही तर लिहून उपयोग काय?’ मध्यंतरी सोलापूरला महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या जुळे सोलापूर शाखेचा आमच्या दिवाळी अंकाला प्रथम पुरस्कार मिळाला. त्यावेळी आम्ही गेलेलो असताना ‘दिव्य मराठी’ने अँकर स्टोरी केली. त्यात आम्ही सांगितलं की, ‘नवोदितांना आम्ही प्राधान्याने व्यासपीठ देतोय.’ निलेश सूर्यवंशी माझ्या संपर्कात आले. त्यांची ‘आभाळ फटकलं’ ही कादंबरी परवाच 19 जानेवारीला आम्ही समारंभपूर्वक प्रकाशित केली.

मावळते अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्याविषयी मी ‘कुत्र्याला खीर पचली नाही’ असा जळजळीत अग्रलेख केला. त्यावर ‘नवाकाळ’सारख्या वृत्तपत्राने पहिल्या पानावर मुख्य बातमी करून माझा अग्रलेख पुनर्मुद्रित केला. त्यांनी तब्बल तीन पानं त्यासाठी मला दिली होती. इतर काही वृत्तपत्रांनी माझ्या अग्रलेखांवर अग्रलेख केले. वृत्तवाहिन्यांवर चर्चा झाल्या. सबनीसांनी मात्र त्यावर काहीही प्रतिक्रिया दिली नाही. कारण ते देऊच शकत नाहीत. मी जे लिहिलं होतं त्यातला शब्द न शब्द खरा होता. पूर्वीचे लेखक नवोदितांना पुढं आणायचे. हे सर्व लेखक त्यासाठी काय करतात? श्रीपाल सबनीस असतील, सदानंद मोरे असतील किंवा आत्ताचे अध्यक्ष अक्षयकुमार काळे असतील! यांनी मराठीला किती नवे लेखक दिले याचे मूल्यमापन केले तर हातात काय येणार? साहित्यबाह्य विषयांवरून कायम वादग्रस्त विधाने करायची आणि चर्चेत राहायचे हेही आजच्या साहित्यापुढील मोठे आव्हान आहे. यातून आपण मराठीचा विकास कसा साधणार? प्रतिसादशून्यतेबरोबरच सबनीसांसारख्या लेखक म्हणून मिरवणार्‍यांची वैफल्यग्रस्तता यानेही आजच्या साहित्याचे मोठे नुकसान केले आहे.
प्रकाशकांचं काय चाललं आहे? जे केवळ अनुवादित पुस्तकं प्रकाशित करतात त्यांना प्रकाशक म्हणायचं का? लेखकांकडून पैसे घेऊन तुम्ही पुस्तकं छापता, त्यांना प्रकाशक म्हणायचं का? यात लेखकांचा तर उतावळेपणा दिसून येतोच पण ग्रंथव्यवहारामध्ये नक्की काय चालतं? आमच्या ‘चपराक’ फेब्रुवारीच्या अंकात ज्येष्ठ प्रकाशक आणि प्रकाशक परिषदेचे कार्याध्यक्ष अनिल कुलकर्णी यांचा एक अत्यंत सुंदर लेख आहे. ते याठिकाणी आलेले आहेत. त्यांचा हा लेख प्रकाशन क्षेत्राचा बुरखा फाडणारा आहे. तो आपण जरूर वाचला पाहिजे.
आपल्याकडे लिखाण हे कॉर्पोरेट होत नाहीये. एखाद्या कॉर्पोरेट कंपनीचा मालक हा तिशीतला-पस्तीशीतला असू शकतो; मात्र मराठीमध्ये एकाही वृत्तपत्राचा मुख्य संपादक तिशीतला का असू नये? मी वयाच्या अठराव्या वर्षी ‘चपराक’हे मासिक पुणे शहरातून सुरू केलं. का सुरू केलं? तर मला नवोदितांसाठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून द्यायचं होतं!
सध्या लेखकांची आर्थिक फसवणूक केली जाते. वीस- वीस वर्षे लिहिणारे लेखकही यांच्यासाठी नवोदितच असतात. का? तर त्यांच्या नावावर एकही पुस्तक नसते, मग या लेखकांकडून पैसे उधळण्याचा धंदा बिनधास्तपणे केला जातो. प्रसिध्दीच्या मागे लागलेले लेखकही या प्रकाराला बळी पडतात. दुर्दैवाने आज परिस्थिती अशी आहे की, नवोदित लेखक प्रकाशकांकडे गेले तर प्रकाशक ती संहिता वाचण्यासाठी सुद्धा पैसे घेतात. हा अनुभव आपल्यापैकी अनेकांनी घेतला असेल. पाच-सहा महिने ती संहिता जशास तशी ठेवतात. त्यावरची धूळही झटकली जात नाही. ती संहिता तशीच परत दिली जाते. ही लेखकांची फसवणूक नाहीये का? ह्याविषयी कोण बोलणार? दुसरीकडे लेखक!! म्हणजे मला अनेकजण भेटतात!! म्हणे ‘सर, काल रात्री मी पंचवीस कविता केल्या…’ काय कारखाना आहे? अरे करताय काय नक्की तुम्ही? तुमची दिशा कोणती? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण गंभीरपणे सोडवली तरच ग्रंथव्यवहार पुढे जाऊ शकेल, असं मला वाटतं. प्रकाशकांच्या बाबत दुर्दैवाने सातत्याने नकारात्मक प्रतिमाच पुढे येत असताना अनेक प्रकाशक चांगल्या पद्धतीनेही काम करत आहेत. सगळंच हातातून गेलं नाही, त्यामुळे निराश होण्याचं कारण नाही.
मराठीत हजारो प्रकाशन संस्था आहेत, असं सांगितलं जातं. आहेत! नोंदणीकृत हजारो संस्था आहेत. त्यातल्या किती प्रकाशन संस्था ललित आणि वैचारिक साहित्य प्रकाशित करतात? जेमतेम तीस-चाळीस! यात सातत्यानं दर्जेदार पुस्तकं प्रकाशित करणारे प्रकाशक किती? पंधरा-वीस-पंचवीस! ‘चपराक’चा आम्ही शंभर-दोनशे पानांचा नाही तर पाचशे पानांचा दिवाळी अंक प्रकाशित करतो. तोही संपूर्ण रंगीत. सहा राज्यातले सव्वाशे लेखक त्यात सहभागी होतात. यंदाच्या दिवाळी अंकाच्या 32 हजार प्रती विकण्याचा, काऊंटर सेलचा आम्ही विक्रम केलाय. ही जर वस्तुस्थिती आहे तर ‘वाचक नाहीत’ असं आपण कसं म्हणू शकतो?
समीक्षक नवोदितांकडे नेहमी दुर्लक्ष करतात. नवोदितांची दखल घ्यायचीच नाही. वृत्तपत्रांचेही तसेच! नवोदितांच्या पुस्तकांची परीक्षणे छापायचीच नाहीत. यातून आपण बाहेर पडायला हवं? मग काय करायचं? आम्ही आमचाच पर्याय उपलब्ध करून दिला. प्रकाशकाने प्रस्तावना लिहू नये, असा एक प्रघात आहे म्हणे! ते आम्ही खोडून काढलं. मी जवळपास पंचेचाळीस पुस्तकांना प्रस्तावना लिहिल्या. आमचे उपसंपादक माधव गिर उत्तम प्रस्तावना लिहितात. कार्यकारी संपादिका शुभांगी गिरमे, उपसंपादिका चंद्रलेखा बेलसरे अशी समीक्षकांची फळीच्या फळीच आम्ही उभी केली. ‘कमी तिथं आम्ही’ आणि ‘उपेक्षित ते अपेक्षित’ हे सूत्र ठेवलं आणि आज मराठीला चांगले लेखक मिळाले. आपल्याला नवोदित-प्रस्थापित असा भेद करायचाय की गुणात्मक दर्जा बघायचाय? म्हणजे एखाद्या लेखकाला नवोदित म्हणून नाकारायचं? अरे, पु. ल. देशपांड्यांची पहिली कथा कोणी छापली नसती तर ते पुढे आलेच नसते. आचार्य अत्र्यांचा पहिला लेख कुणी छापला नसता तर ते पुढे आलेच नसते. त्यामुळं नवोदित-प्रस्थापित हे ग्रहण सुटणं ही काळाची गरज आहे. त्यासाठी प्रकाशकांनी पुढाकार घ्यायला हवा. वृत्तपत्रांच्या संपादकांनी आणखी गंभीरपणे पुढाकार घ्यायला हवा. साहित्य संस्थांची परिस्थितीही फारशी वेगळी नाहीये. म्हणजे मिलिंद जोशी नेहमीच म्हणतात, ‘कोणतीच भूमिका न घेणं हीच एक सध्याच्या साहित्यिकांची भूमिका आहे.’ पण सुदैवानं त्यांचं हे विधान त्यांनीच खोडून काढलं आहे. भूमिका घेणारे कार्याध्यक्ष म्हणून मिलिंद जोशी यांच्यासारखं एक तरूण नेतृत्व साहित्याला मिळालेलं आहे. त्यामुळे आपल्याला आणखी चांगल्या अपेक्षा ठेवता येतील.
आपल्यापुढं तंत्रज्ञानाचं एक मोठं आव्हान आहे. आजचे लेखक व्हाटस्अ‍ॅप, फेसबूक अशा समाजमाध्यमांवर इतका वेळ घालवतात की, लेखणीशी त्यांची नाळ तुटते की काय? अशी भीती मला वाटतेय. ठीक आहे, फेसबुक, व्हाटस्अ‍ॅप, ब्लॉग ही समाजमाध्यमं निश्चितपणे गरजेची आहेत. त्यामुळं लोकांपर्यंत पोहोचता येतं. पेनने लिहिणारे लेखक कमी होत चाललेत. जे आतून येतं, ज्याला आपण ‘अंत:स्फूर्ती’ म्हणतो ते कागदावर टिपायला हवं. लेखकांनी सातत्याने दर्जेदार लिहायला हवं.
इतरांचं लिखाण न वाचणं ही देखील आपल्या पुढील एक मोठी समस्या आहे. इतरांचं सोडा, लेखक स्वतःचेही लेखन तटस्थपणे वाचत नाहीत. त्यांना प्रसिद्धिची एवढी घाई झालेली असते. ‘प्रसिद्धीची घाई, सिद्धी संपवत जाई‘ असं म्हणतात. म्हणजे एखादी संहिता प्रकाशक म्हणून जेव्हा माझ्याकडे येते तेव्हा लेखक प्रचंड आग्रह करतात. ‘हे तुम्ही प्रकाशित कराच. यावर वाचकांच्या उड्या पडतील, हे पुस्तक हातोहात जाईल’ असे ते सांगत असतात. ते स्वतःच्या कोशात इतके मशगुल असतात की त्यांना वाटते आपण म्हणजे बर्नार्ड शॉच! अरे भल्या गृहस्थांनो, तुम्ही जे लिहिताय ते पुन्हा पुन्हा वाचा. त्यावर संस्कार करा. मग ते प्रकाशकांकडे द्या! म्हणजे आत्ताच मी सांगितलं, आमचा दिवाळी अंक पाचशे पानांचा निघतो. यंदाच्या दिवाळी अंकासाठी आमच्याकडे तब्बल साडेपाच हजार कविता आल्या. त्यातल्या शंभरएक आम्ही प्रकाशित केल्या. मग इतर कवितांत गुणात्मक दर्जा नव्हता का? इतक्या कविता काळजीपूर्वक वाचाव्या लागतात. ते वाचणं म्हणजे एक दिव्यच असतं. त्यातल्या दीडएक हजार कविता सर्वोत्तम होत्या; मात्र जागेअभावी आम्हाला त्या घेता आल्या नाहीत. मग त्यांना वाटतं आम्हाला कुठं व्यासपीठच मिळत नाही, आमची कुणी दखलच घेत नाही. तर मित्रांनो, असं नसतं! निराश होऊ नकात! जे काही सर्वोत्तम आहे ते सातत्यानं वाचकांना द्या! खूप चांगला प्रतिसाद मिळेल. आधुनिक तंत्रज्ञानाचाही पुरेपूर वापर करा. फक्त त्याच्या आहारी जाऊ नकात.
तुमच्या प्रत्येक पुस्तकाचं ई-बुक हे व्हायलाच हवं. ही काळाची गरज आहे. मल्याळममध्ये एक संस्था आहे. त्या संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी सुरूवातीला काही पैसे उभे केले. एकत्र येऊन त्यांनी मल्याळम साहित्याचा विचार केला आणि ठरवले, मल्याळी भाषेत जेवढं साहित्य येतं त्याचा इंग्रजीत अनुवाद करायचा आणि जागतिक स्तरावर ते साहित्य उपलब्ध करून द्यायचं. हा त्यांचा भाषेसाठीचा एक आदर्श प्रकल्प आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. मराठीत इतर भाषेतलं साहित्य मोठ्या प्रमाणात येतंय. काही प्रकाशक गब्बर होत आहेत. आपले मराठी साहित्य मात्र इतर भाषेत जाताना दिसत नाही. त्यामुळे ‘चपराक’चा प्रकाशक या नात्याने मी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून एक घोषणा आनंदपूर्वक करतोय की, ‘आमच्या चपराककडून जी काही पुस्तके प्रकाशित होत आहेत त्या सर्वांचा इंग्रजी अनुवाद आम्ही वाचकांना उपलब्ध करून देऊ.’ आपलं साहित्य जागतिक भाषेत जायला हवं. इतर भारतीय आणि जागतिक भाषेतील साहित्य मराठीत यायला हवं. फक्त इंग्रजी पुस्तकांचा अनुवाद करणं, इमारतीच्या इमारती उभारणं, आलिशान गाड्या घेणं म्हणजे प्रकाशन क्षेत्राचं यश नाही, हे ठासून सांगायची वेळ आता आलीय.
संवाद, संघर्ष, सांस्कृतिक अनुबंध, साहित्यिक संचित असे शब्द आपण मागचे वर्षभर सातत्याने ऐकतोय. मराठीत एकाही पुस्तकाची पहिली आवृत्ती दहा हजार प्रतींची निघू नये? हे आपलं केवढं मोठं दुर्भाग्य! अकरा करोडचा महाराष्ट्र! त्यात पुस्तकांची आवृत्ती निघते हजार प्रतींची! तीही खपायला किमान पाच-सहा वर्षे सहजपणे जातात. तर हे कशाचं लक्षण आहे? महाराष्ट्रातले साखर कारखाने वेगवेगळे कार्यक्रम घेतात. तिथं मग तमाशापासून ते अखंड हरिनाम सप्ताहापर्यंत सगळे उद्योग होतात. का बरं त्यांनी उत्तमोत्तम पुस्तकं छापू नयेत? किंवा चांगली पुस्तकं विकत घेऊन ती सभासदांना वाटू नयेत?
महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाकडून नवोदित लेखकांच्या कलाकृतीला अनुदान दिलं जातं. ज्या लेखकांना हे अनुदान दिलं जातं, दिलं गेलं त्यापैकी किती लेखक आज यशस्वी आहेत? पन्नास प्रती छापायच्या… त्यांचं बिल मंजूर करून घ्यायचं… दोघांनी ते पैसे वाटून घ्यायचे असा धंदा सररासपणे चाललेला असतो. लेखकही स्वतःचे पैसे टाकून पुस्तकं छापतात. हौस मिरवण्याची! दुसरं काय? मग त्यानं हजार प्रती छापल्या तर पन्नास-शंभर-दोनशे प्रती मित्रांना, नातेवाईकांना भेट म्हणून वाटायच्या आणि उरलेल्या प्रती मग सत्तर ते ऐंशी टक्के कमिशनने ग्रंथालयांना, विक्रेत्यांना द्यायच्या. ग्रंथपालही शंभर टक्के रकमेचं बिल घेतात. त्यांना 50-50, 60-60, 70-70 टक्के कमिशन मिळते. असं जर असेल तर मराठीत चांगली पुस्तकं कशी येणार? या सगळ्या आव्हानांचा आपण विचार केला पाहिजे. या खर्‍या समस्या आहेत.
प्रामुख्यानं तरूणांनी लिहितं राहिलं पाहिजे. आपलं भवितव्य उज्ज्वल आहे. मगाशी जॉर्ज बर्नार्ड शॉचं उदाहरण सांगितलं. शॉ साहेब उत्तमोत्तम लिहायचे आणि लिहिल्यानंतर त्यांची कलाकृती ते चक्क विक्रीला काढायचे. प्रकाशकांकडे लिलाव करायचे कादंबरीचा! ‘ही कादंबरी मी एवढ्या डॉलरला देईन, ती तेवढ्या डॉलरला देईन…’ त्यांना ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या एका पत्रकारानं विचारलं, ‘‘शॉ साहेब, तुम्ही जगातले एवढे मोठे लेखक आहात. हे असं लिलाव करून कादंबरी विकणं योग्य आहे का?’’ त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर अतिशय मार्मिक आहे. ते म्हणाले, ‘‘भल्या गृहस्था, जेव्हा मी कोणतीही कादंबरी लिहित असतो तेव्हा मी फक्त लेखक असतो. त्यासाठी मी जास्तीत जास्त संदर्भ गोळा करतो. मी पूर्ण अभ्यास करतो. माझं दिवसरात्र चिंतन सुरू असतं! पण त्या कादंबरीला जेव्हा मी शेवटचा पूर्णविराम देतो तेव्हा मी त्या कलाकृतीचा विक्रेता झालेलो असतो; कारण माझं पोट त्यावर अवलंबून आहे.’’
मराठीमध्ये लिखाण हे उदरनिर्वाहाचं साधन होऊ शकतं का?
तर निश्चितपणे होऊ शकतं! खूप चांगले अनुभव आहेत माझे. तुम्ही लिहित रहा. चांगल्या लेखनाला सध्या प्रचंड प्रतिसाद मिळतोय. तुमचे लेखन प्रिंट, ऑडिओ, व्हिडीओ अशा सगळ्या माध्यमांतून, ई-बुक लोकांपर्यंत येऊ द्यात! एक मोठं मार्केट आपल्यापुढं उपलब्ध आहे. सुदैवाने आमची पिढी खूप बदल पाहतेय. जागतिकीकरण आहे. आपण नोटबंदीचा काळ बघितला. काळा पैसा सगळा बाहेर येतोय. उत्तमोत्तम विषय आहेत. हे आपण कुणीही चांगल्या पद्धतीने मांडत नाहीये. लेखकांचं अनुभवविश्व समृद्ध असताना, लिहिण्याच्या क्षमता असताना न लिहिणं हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे. तो गुन्हा आपण सातत्यानं करतोय. माळीणसारखी एवढी मोठी दुर्घटना घडते. गावच्या गाव उद्ध्वस्त होतं. त्यावर मराठीत एक चांगलं पुस्तक येऊ नये? आज तुम्ही जे काही लिहिताय तो उद्याचा इतिहास आहे. तो इतिहास आपणच निर्माण करायला हवा. वाचकांना जास्तीत जास्त चांगलं साहित्य द्यायला हवं. कथा, कविता, ललित, वैचारिक, चरित्र, आत्मचरित्र सगळ्या प्रकारची पुस्तकं मोठ्या प्रमाणात यायला हवीत. वाचकांनीही ती विकत घ्यायला हवीत. घर घेताना घराची रचना चार चार वेळा विचार करून आपण करतो. इथं माझं बेडरूम असावं, इथं माझं देवघर असावं…. पण घरामध्ये जोपर्यंत पुस्तकाचा कोपरा कुठं असावा याचं आपण नियोजन करणार नाही तोपर्यंत मराठीला चांगले दिवस येतील असं मला वाटत नाही. त्या दृष्टिनं प्रयत्न व्हायला हवेत. कुठल्याही कार्यक्रमाला फुले, बुके देण्यापेक्षा तुम्ही पुस्तकं विकत घ्या, पुस्तकं भेट द्या! लग्न, मुंज, वाढदिवस कुठल्याही प्रसंगी जर चांगली पुस्तकं तुम्ही लोकांना दिलीत, प्रत्येक मराठी माणसानं कुठल्याही किमान दोन मासिकांची वर्गणी भरली तरी मासिकं जगू शकतात. सत्य सांगण्याचं काम सध्या फक्त छोटी वृत्तपत्रं करताहेत. मित्रांनो, मोठ्या वृत्तपत्रात आज लिहिलेला अग्रलेख दुसर्‍या दिवशी माघार घ्यावा लागतो, ही शोकांतिका आहे. ‘शोकसत्ता’ होतेय सगळी! तर ही शोकसत्ता थांबवायला हवी.

आधीच्या परिसंवादात एकानं सांगितलं, नवोदित लेखकांचं हे कर्तव्य आहे, ही आपल्या पुढील आव्हानं आहेत, या आपल्या पुढील समस्या आहेत म्हणून मी बोलतोय. बाबासाहेब पुरंदर्‍यांचा विषय निघाला. महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवाजी महाराज घराघरात पोहोचवले. त्यांना करावं तितकं वंदन कमी आहे. त्यांचं एक वाक्य फक्त घेतलं गेलं. ‘दादोजी कोंडदेव, आऊसाहेब आणि बालशिवाजी यांचं गोत्र एकच…’ हे वाक्य घेऊन राडा केला गेला. महाराष्ट्र पेटवला. भांडारकरसारखी इन्स्टिट्यूट फोडली गेली. ते पूर्ण वाक्य काय होतं? ‘दादोजी कोंडदेव, आऊसाहेब आणि
बालशिवाजी यांचं गोत्र एकच, ते म्हणजे सह्याद्री!’
‘ते म्हणजे सह्याद्री’ हे काढायचं आणि हवा तसा अर्थ घेऊन भांडत रहायचं. हा खोटेपणा आजच्या लेखकांनी लेखणीच्या माध्यमातून पुढे आणला तर समाज आणखी निकोप होऊ शकेल. वैचारिक क्रांती घडू शकेल. जगण्याचं बळ आपल्याला त्यातून मिळू शकेल. हे सगळं साध्य होईल! प्रकाशक म्हणून खरंतर खूप काही बोलायचंय; पण वेळेची मर्यादा त्यांनी घालून दिलीय. त्यामुळं फार काही बोलत नाही. आपण सगळ्यांनी ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपवतो.

जय हिंद, जय महाराष्ट्र!!
-घनश्याम पाटील
7057292092

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा