संघर्ष हेच सामर्थ्य – तीन महिन्यात तिसरी आवृत्ती

एखादे आत्मकथन म्हणजे त्या काळाचा, त्या व्यक्तिचा पट असतो. त्यातून आपल्या आयुष्यालाही दिशा मिळते. म्हणूनच जागतिक साहित्यात आत्मकथनांना मोलाचे स्थान आहे.

आपल्याकडील प्रत्येक माणसाचे आयुष्य म्हणजे एक कादंबरी असते; मात्र ते शब्दबद्ध करण्यात आपण कमी पडतो. प्रस्तुतचा ग्रंथ म्हणजे आत्मकथनाचे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे.‘सिद्धेश्वरा’ची कृपा आणि मातृ‘छाया’ असली की आयुष्याचा ‘रवी’ प्रकाशमान होतो. त्यासाठी फक्त स्वतःवर विश्वास असायला हवा. स्वाभिमान जागृत ठेवून संकटांचे संधीत रूपांतर करताना अनेक अडथळे येतात. ते पार करताना आयुष्याचा कस लागतो. हतबल न होता त्यातून तुम्ही मार्ग काढला तर विजयश्री खेचून आणता येते. ‘करना है, कुछ करके दिखाना है’ या पठडीतील रविंद्र सिद्धेश्वर खंदारे या कार्यतत्पर आणि नेकदिल अधिकार्‍याची ही आत्मकथा वाचताना म्हणूनच आपल्या मनात चैतन्याचे नंदादीप प्रज्वलित होतात. कितीही अडचणी आल्या तरी आपण त्यातून तगून जाऊ शकतो, हा विश्वास मनात पेरतात. नैराश्याचे मळभ दूर सारणारे आणि लंगडत जाणार्‍याला बोटाला धरून चालायला लावणारे, चालणार्‍याला पळायला भाग पाडणारे आणि पळणार्‍याला देदीप्यमान यशाची ग्वाही देणारे हे आत्मकथन आहे.
खंदारे साहेबांनी आयुष्यात जो संघर्ष केला त्यामुळे ते तावूनसुलाखून निघाले. त्यांच्या आयुष्याला झळाळी प्राप्त झाली. ‘काहीही झाले तरी हार मानायची नाही,’ हा त्यांचा स्वभावगुण! हलाकीची कौटुंबिक पार्श्वभूमी असतानाही त्यांनी शिक्षणाची कास सोडली नाही. वडिलांना विहिरीत दगडे टाकून मारण्याचा प्रयत्न झाला, किमान गरजा भागवताना मेटाकुटीला यावे लागले, कचरा गोळा करण्यापासून ते मजुरीपर्यंत पडतील ती कामे करावी लागली, शैक्षणिक फी भरण्यापासून ते जेवणापर्यंतचे वांदे झाले, व्यवस्थेच्या गलथानपणाचा अनुभव घ्यावा लागला, प्रिय सहचारिणीचा वेदनादायी मृत्यू बघावा लागला, अवघ्या चार दिवसाच्या बाळालाही साश्रू नयनांनी अखेरचा निरोप द्यावा लागला… असे सगळे हलाहल पचवताना त्यांनी जी दुर्दम्य इच्छाशक्ती दाखवली, धीरोदात्तपणा आणि मनाचा संयम दाखवला, स्वाभिमानाची परंपरा जपत जो आत्माविष्कार घडवला तेच तर त्यांच्या यशस्वी जीवनाचे गमक आहे. अशी सकारात्मकता अंगी बाळगल्यास शून्यातून विश्व निर्माण करण्याचा प्रवास सुकर होईल. संघर्षाचे रूपांतर सामर्थ्यात करणार्‍यांनीच इतिहास घडवलाय. ‘झिरो टू हिरो’ अशी वाटचाल असणार्‍या खंदारे साहेबांचे हे जीवनचरित्र म्हणूनच प्रत्येकाने वाचायला हवे.
खंदारे साहेब म्हणतात, ‘‘नशिबात नसेल तर प्रयत्न करून काय फायदा? असे अनेकजण म्हणतात! मात्र ‘प्रयत्न केले तरच नशिबात येईल’ हे अनेकांना उमजत नाही. त्यामुळे मी प्रयत्न सोडत नाही. अडथळे आणि समस्या कुणालाही चुकलेल्या नाहीत. त्यातून मार्गक्रमण करत असताना खचायचे नाही, हेच तर यशस्वी जीवनाचे सार आहे. आपला भूतकाळ लक्षात ठेवून भविष्याची वाटचाल करणे आवश्यक आहे.’’
त्यांच्या लेखनातील सुसूत्रता आणि स्मरणशक्ती याचीही मला कमाल वाटते. बालपणापासून ते अधिकारी होईपर्यंतचे सर्व प्रसंग, घटना त्यांनी इतक्या सामर्थ्याने मांडल्या आहेत की सगळा चलचित्रपट डोळ्यासमोर येतो. एखाद्या निर्मात्याला त्यांच्या आयुष्यावर चित्रपट निर्माण करायची भुरळ पडली तर त्यात मुळीच आश्चर्य वाटू नये. आत्मकथनात्मक लेखन असले तरी एखाद्या रोचक, रोमहर्षक कादंबरीचा अनुभव यावा असे हे लेखन आहे. जगण्याची धडपड सुरू असलेल्या प्रत्येक सामान्य माणसाबरोबरच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांनी आवर्जून वाचायलाच हवे असे हे पुस्तक आहे.
रडगाणे गाणारे अनेक महाभाग आपल्या आजूबाजूला असतात; मात्र आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर साथ देणार्‍यांची कृतज्ञतेने जाणीव ठेवणारे खंदारे साहेबांसारखे मान्यवर विरळच! त्यांनी त्यांचे मित्र, हितचिंतक, आप्तेष्ट, त्यांना साथ देणारे सहकारी, कर्मचारी अशा सगळ्यांचा खूप गौरवाने, अभिमानाने उल्लेख केला आहे. क्वचितप्रसंगी आलेले कटू अनुभवही मांडले आहेत मात्र ते स्वाभाविक आणि गरजेचे आहेत. हे सगळे सहन करताना आणि आकाशाला गवसणी घालताना त्यांना ज्या परिस्थितीला सामोरे जावे लागले ते पाहून त्यांच्याविषयीचा आदर द्विगुणित होतो.
त्यांचा अधिकारी पदापर्यंत मजल मारण्यापर्यंतचा टप्पा यात आलाय. पदावर आल्यानंतरचे त्यांचे अनुभवही व्यवस्थेला आरसा दाखवणारे असतील. त्यामुळे याचा पुढचा भागही त्यांच्याकडून लवकरात लवकर लिहून पूर्ण व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना अंतःकरणपूर्वक शुभेच्छा देतो.

– घनश्याम पाटील
लेखक, प्रकाशक आणि संपादक

 

रवींद्र खंदारे सरांच्या ‘संघर्ष हेच सामर्थ्य’ या अत्यंत प्रेरणादायी आत्मकथनाच्या एका आठवड्यात दोन आवृत्त्या झाल्या. आता निवडक अभिप्रायासह तिसरी आवृत्ती लवकरच प्रकाशित होत आहे. शिवाय हे महत्त्वाचे पुस्तक इंग्रजीतही अनुवादित होत आहे.

पुस्तक घरपोच मागवण्यासाठी

संघर्ष हेच सामर्थ्य

 

जगभरातील मराठी वाचकांसाठी या ग्रंथाची इ आवृत्तीही उपलब्ध करून दिली आहे. आपल्या संग्रहात असायलाच हवे असे हे पुस्तक आमच्या  या संकेतस्थळावरून घरपोच मागवू शकाल. इ आवृत्तीसाठी अमेझॉनची लिंक –

https://amzn.eu/d/iUPJJH

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा