चौथं पोट – ह. मो. मराठे

विजयबापूंनी बाहेर जाण्याचे कपडे घातले आणि ते मोठ्या आरशासमोर उभे राहिले. त्यांनी आपलं भारदस्त रूप आरशात पाहिलं. थुलथलीत देह, चेहराही तसाच. गोरा आणि गुबगुबीत. सतत एसीतच वावरण्याच्या सवयीचा परिणाम त्यांच्यावर चांगलाच दिसून येत होता. मंत्री म्हणून मिळालेला बंगला पुष्कळसा एसी. गाडी एसी. मंत्रालयातील दालनही एसी. असा सर्व काळ एसीमधला वावर. त्यामुळे त्यांना गोरेपण आलं होतं. केसांना काळाभोर कलप लावलेला. तसेच मिशीलाही. डोळ्यांवर रूबाबदार चष्मा. अंगात सफारी. इतर मंत्र्यांप्रमाणे त्यांनीही काही दिवस जाकीट वापरून पाहिलं. त्यात त्यांना अवघडल्यागत वाटू लागलं. त्यांनतर त्यांनी छानशा कपड्याचा सफारीच वापरायला सुरूवात केली.

सफारीत एक वाईट दिसते. ते त्यांचे गोल गरगरीत पोट. ते चांगलंच मोठं दिसे पण जाकीट घातलं की ते अधिकच मोठं दिसे. जाकिटाच्या गळ्यापर्यंतची बटने ते लावून घेत. त्यामुळे पोटाचा घसघशीत नगाराच दिसे. सफारीमुळे तो नगारा थोडासा तरी झाकला जाई. त्यांनी आपल्या पोटाच्या नगार्‍याचं दर्शन आरशात घेतलं. त्याच्यावरून नजर काढता ते पुटपुटले, ‘‘चांगलंच फुगून आलंय की बेट! पण… दुसरं तरी काय करणार कोणी शेरा मारलाच तर सांगायचं अहो, मंत्रीपद अंगी लागतंय! असं काय करता?’’ ते स्वत:शीच हसले. मग पत्नीला म्हणाले, ‘‘आम्ही तयार झालो. जातो बाहेरच्या हॉलमधी. व्हिजिटर येऊन बसलेत. पीए सांगून गेला.’’

पत्नी तिथं आली. त्यांच्या पोटाकडे कौतुकानं बघत उद्गारली, ‘‘चांगलं गरगरीत फुगत चाललंय पोट, एकच हाय का दोन? आता जीमला जा. व्यायाम करा. योगासनं करा. निदान सकाळी फिरून या चार मैल.’’
ते हसले. त्यांनी देवाच्या तसबिरीला हात जोडले.
‘‘तरी मी खायला कमीच घालते’’ पत्नी लाडिक स्वरात म्हणाली.
‘‘तू कमी वाढलंस म्हणून काय मी कमी का खाणार आहे? आणि कमीच खायचं असेल तर राजकारणात यायचंच कशाला?’’

ते हॉलमध्ये आले. गावाकडले कार्यकर्ते जमायला लागले होते. अन्य व्हिजीटर्स होते. काही अधिकारीही आले होते. विजयबापूंनी सर्वांना उभ्या उभ्या हात जोडून नमस्कार केला. कुणा कुणाला हसून ओळख दाखवली आणि ते बंगल्यातल्या ऑफिसच्या खोलीत आले.
पाठोपाठ पीएही आला. ‘‘आधी गावाकडच्या कार्यकर्त्यांना आत घ्या’’ ते पीएंना म्हणाले आणि त्यांनी विचारलं, ‘‘त्यांचं चहापाणी झालं ना? मतदार संघातील कार्यकर्त्यांची विचारपूस आधी करावी लागते.’’
‘‘झाला सर्वांचा चहा’’
‘‘त्यांना आधी पाठवा’’
गावाकडले कार्यकर्ते खोलीत आले.
‘‘या! या! या काका, बसा. दत्ता, वसंता तुम्हीही या, बसा सगळे.’’
सगळे बसले.
‘‘काय काम काढलं?’’ विजयबापूंनी आस्थेचा स्वर काढत विचारलं.
‘‘इसारला नाय म्हणायचं बापू तुम्ही!’’ काका नमस्कार करीत उद्गारले.
‘‘कसं विसरेन काका तुम्हाला? आमचं राजकारण चालतंय ते तुम्हा थोरा-मोठ्यांच्या आशीर्वादावर आणि कार्यकर्त्यांच्या जीवावर’’ विजयबापूंनी सर्वांना खूश करणारे शब्द उच्चारले.
आमच्या एरियातला माणूस मंत्री झालाय. त्याची अपूर्वाई वाटतीच की आम्हाला बी!’’ काका म्हणाले.
‘‘काम सांगा’’ औपचारिकता संपवत विजयबापू म्हणाले.
‘‘काम म्हंजी…’’ काका अडखळतच सांगू लागले.
‘‘पटकन कामाचं सांगा. आज कॅबिनेटची मिटिंग आहे. वेळेवर पोचावं लागतं. ऑफिसात दांडी मारून चालत नाही शाळेतल्यासारखं.’’ घाई असूनही विजयबापूंनी विनोद केला.
‘‘तुम्ही कधी दांड्या मारायचा? लईच अभ्यास करायचा तुम्ही. तुमच्या वेळचे मास्तर सांगतात ना अजून!’’ काका कौतुकानं म्हणाले.
‘‘ते जाऊ दे कामाचं बोला काका!’’
‘‘संस्थेचा हिरकमहोत्सव साजरा करायचा हाय.‘’ काकांनी विषयाला सुरूवात केली.
‘‘आम्ही येणार!’’ बापूंनी अधिरपणं म्हणून टाकलं.
‘‘तुम्ही आमच्या संस्थेच्या शाळेत शिकला. तुम्हाला यायलाच पाहिजे की.’’
‘‘तारीख सांगा. आत्ताच डायरीत टिपून ठेवतो.’’ बापू पीएकडे बघत म्हणाले. पीएंनी पटकन डायरी उघडली.
‘‘दोन वर्ष आहेत अजून’’ काकांच्यासोबत आलेले संस्थेचे सेक्रेटरी म्हणाले.
‘‘त्याहीवेळी बोलवणार ना?’’ बापूंनी हसतच विचारलं ‘‘त्यावेळी मी मंत्री असेलच असं नाही म्हणून विचारलं!’’
‘‘त्यावेळी तुम्ही मुख्यमंत्री असाल, बापू!’’ तरूण कार्यकर्ते कौतुकाने म्हणाले. ते ऐकून बापूंना बरं वाटलं.
ते म्हणाले, ’’कार्यकर्त्यांनी जोर लावायला हवा.’’
‘‘आम्ही लावूच’’ कार्यकर्ते.
‘‘गप्पा गावाकडे आल्यावर. आता पटकन काम सांगा.’’ बापूंनी घाई केली.
‘‘हिरकमहोत्सव समितीचे तुम्ही अध्यक्ष…’’
‘‘होईन.. होईन… पण कामं तुम्ही करायची.’’
‘‘ती करू आम्ही’’
‘‘घाला नाव’’ बापू सर्वांना हात जोडून म्हणाले.
‘‘दुसरे कोण कोण आहेत?’’ विजयबापूंनी पीएंना विचारलं.
‘‘एक उद्योगपती, एक जमीन खरेदी विक्री धंद्यातला एजंट, एक आमदार, एक बिल्डर, एक कंत्राटदार…’’ पीएंनी यादी वाचली.
‘‘आमदारांना आधी घ्या.’’
आमदार आले. बसले.
‘‘चहा घेतला?’’
‘‘हो’’
‘‘बोला’’
आमदारांनी कामे सांगितली. रस्ते, पाटबंधारे, पाणीपुरवठा, शाळा, दुष्काळी कामं.
‘‘करून घ्या.’’
‘‘आमदार निधी आडवून ठेवलाय साहेबांनी.’’
विजयबापूंनी पीएंना म्हटलं, ‘‘यांच्याकडून नंबर घेऊन फोन लावा’’
पीएंनी फोन जोडून मोबाईल विजयबापूंच्या हाती दिला.
बापू दरडवाणीच्या सुरात बोलू लागले, ‘‘आमदार निधी आडवून ठेवलाय म्हणे. मोकळा करा. जनतेची कामं व्हायला हवीत. लोकसभेची निवडणूक लागेल पुढल्या वर्षी. यावेळी पक्ष आम्हाला लोकसभेच्या रिंगणात उतरवणार. तुम्ही आडवे येऊ नका. बदली करून टाकीन. बायकापोरं हायत ना? का उदार झालाय त्यांच्या जीवावर?’’ थोड्यावेळ कानावर मोबाईल धरून बापू न बोलता थांबले मग आमदारांना म्हणाले, ‘‘जा करतोय तो काम. जनतेची कामं झालीच पाहिजेत. त्यांच्या आड नियम येऊ नयेत. त्याला म्हणाव, विजयबापूंना रागवायला भाग पाडू नका! जा’’
आमदार उठले.
‘‘लोकसभेच्यावेळी आम्हाला मदत करायची.’’
‘‘हा बापू’’ म्हणत आमदार गेले.
‘‘इतरांना घ्या. पण एकेक. एकाची भानगड दुसर्‍याला कळता कामा नये.’’ विजयबापू हसत हसत पीएला म्हणाले.
उद्योगपती आले. नमस्कार करून बसले.
‘‘बोला…’’ बापू म्हणाले.
‘‘ओळखलं ना?’’
‘‘ओळखलं’’
‘‘काम झालं नाही अजून?’’
‘‘तुमच्या नव्या कारखान्याच्या लायसन्सचंच ना?’’
‘‘बरोबर लक्षात आहे तुमच्या!’’
‘‘अहो, मंत्री म्हटलं की सगळं लक्षात पायजे!’’
‘‘फार रेंगाळलंय काम. पैसा अडकून पडतो. लौकर झालं तर…’’
‘‘सगळी प्रोसिजर पूर्ण केलीय ना तुम्ही?’’
‘‘तीन पोचवले. गेल्या महिन्यात. इथंच आलो होतो घेऊन’’
‘‘उरलेत किती?’’
‘‘तसे थोडेच…’’
‘‘लक्षात असतं आमच्या. बाकी आहे अजून…’’
‘‘दोन उरलेत’’
‘‘तीन उरलेत’’ बापू म्हणाले, ‘‘लाख नव्हे, कोटी!’’
‘‘हो… उद्याच…’’
‘‘पोचतं करा. मंजुरी मिळवून देऊ आम्ही’’
उद्योगपती उठले. त्यांना थांबवत बापू म्हणाले, ‘‘उद्या नको. उद्या मी दौर्‍यावर जातोय. परवा या. माल घेऊन या.’’
‘‘येतो.’’
‘‘आणि त्या चळवळ्यांचं भागवलं का?’’
‘‘कारखाना उभारण्याच्या विरोधातलं आंदोलन ना?’’
‘‘त्यांचंच भागवून टाका. कारखान्याला विरोध करणारी माणसंही माझीच आहेत. त्यांच्याही पोटापाण्याचा प्रश्न सोडवा. मी थांबवतो त्यांचं आंदोलन.’’
कारखानदार गेले. लँडडिलिंगवाले एजंट आले.
‘‘बोला!’’
‘‘जमतंय! फायनल करू का सांगा.’’
‘‘डिटेल्स सांगा’’
‘‘डोंगर आहे. तसा शहराच्या जवळच. शहर वाढतं आहे. शंभर बंगले होतील. सध्या एका कोटीला एक बंगला विकला तरी…’’
‘‘शंभर बंगले? एकेक कोटी रूपये किंमतवाले? म्हणजे शंभर कोटींचा प्रोजेक्ट झाला की हो!’’
‘‘कबूल करायला लावतो मालकाला.’’
‘‘कितीपर्यंत?’’
‘‘दहा कोटी म्हणतोय मालक.’’
‘‘त्याला सांगितलं ना, मला इंटरेस्ट आहे असं?’’
‘‘नाही’’
‘‘सांगून टाका. एक कोटीला विकून टाक म्हणावं. नाहीतर फुकट मरशील.’’
‘‘लावू फोन?’’
‘‘हितनच लावा.’’
एजंट फोनवर बोलू लागला. विजयबापू उत्सुकतेने, काळजीपूर्वक ऐकू लागले.
‘‘पाच म्हणतोय…’’ एजंट म्हणाला.
‘‘त्याला माजं नाव सांगा. चळाचळा मुततोय बघा पँटीत.’’
एजंटने नाव सांगितलं.
‘‘नायच म्हंतोय सा…’’ तो बापूंना म्हणाला.
‘‘दीडपर्यंत मिळवून टाका.’’ बापू एजंटाला म्हणाले, ‘‘मला पायजेच तो डोंगर. मी बघितलंय ते लोकेशन. सोन्याची खाण आहे. नाय नाय, सोन्याचा डोंगर! सगळं कंत्राट तुम्हालाच देणारेय मी. मला पन्नास कोटी सुटले की पुरेत. वरचे तुम्हाला.’’
‘‘करतो.’’
‘‘माझं नाव सांगा त्याला. गुमान कबूल होतो का नाय बगा.’’ म्हणत ते उठलेच. इतरांना ‘पुन्हा या’ असं सांगत ते मंत्रालयाकडे निघाले.
काही दिवसांनी एजंटचा फोन आला. म्हणाला, ‘‘साहेब जमलं त्या डोंगराचं कंत्राट!’’
‘‘शाब्बास! कसं कसं जमवलंत ते सांगायला या एकदा!’’

त्याप्रमाणे एजंट आला. तीन पेग संपेपर्यंत इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. मग बापूंनी म्हटलं, ‘‘सांगा तरी कसं कसं जमवलं ते!’’
‘‘तयारच होत नव्हता भडवा!’’ एजंट एक मोठा घोट घेऊन सांगू लागला, ‘‘त्याला विचारलं, सांग रे! तू काय करणारेस या एवढ्या डोंगराचं? शेती तर पिकतच नाही. दुसरी कशाची लागवड करायची तर त्यासाठी पैसा लागतो. तो तुझ्याकडे नाही. मग उपयोग काय एवढा डोंगर असून? माजं ऐक. कबूल करून टाक. असं एकदा नव्हे, चारदा सांगून झालं. तयारच होईना. शेवटी शेवटचं अस्त्र काढलं. नाव सांगितलं, म्हणालो, एका बड्या लीडरला इंटरेस्ट आहे. या डोंगरात… तर बेटा म्हणाला, इतरांना पण इंटरेस्ट आहे. ऑफर्स आल्या आहेत. चांगली किंमत मिळेल, पण देणार नाही. का, विचारलं तर म्हणाला, मुलगा आर्किटेक झाला की, तो काहीतरी चांगला उपयोग करील या डोंगराचा. हे ऐकलं आणि म्हटलं, पैसा कुठून आणणार इनव्हेस्टमेंटला? तर म्हणाला, तो त्याचा मित्र पार्टनरशिपमधे काहीतरी करणार आहेत. त्यावर म्हटलं, तुम्ही आणि मीच करूया पार्टनरशीपमधे. तर नाही म्हणाला. दोनचारदा हाच डायलॉग झाला. पाचव्या भेटीच्यावेळी त्याला म्हटलं, साहेब, तुमचा हा डोंगर ज्यांना विकत हवा आहे त्यांचं नाव ऐका. विजयबापू. सध्या कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांची ख्याती आलीय ना कानावर? आता आढेवेढे घेऊ नका. नाहीतर त्यांची माणसं कधी तुमच्या बायकापोरांना उचलून नेतील सांगता येणार नाही. विचार करा. असं म्हणून तुमचे एकदोन किस्से त्यांना सांगितले. जमीन न देणार्‍यांना तुम्ही कसा धडा शिकवला. घाबरून गेला. थरथरू लागला. म्हणाला, कबूल आहे. तुम्ही द्याल ती किंमत पुरे. पण जिवंत ठेवा. किती दहशत आहे बघा बापू तुमच्या नावाची.’’
‘‘दहशतसुद्धा सावकाश सावकाश तयार करावी लागते, राव!’’ असं म्हणून बापूंनी एक मोठा घोट घेतला. बायकोला म्हणाले, ‘‘आज नको मला जेवायला. पोट भरलंय आजच्या पुरतं. तुम्ही घ्या जेवून आणि झोपा. मी कलंडतो इथंच.’’ म्हणत बापूसाहेब बसल्याजागीच कलंडले. काही न बोलता एजंट निघून गेला.

सकाळी बापू उठले ते तारवटल्या डोळ्यांनी पण एकदम आनंदी मूडमधे. डोंगराचा सौदा जमवला होता त्यांच्या एजंटने. एक कोटीवाले शंभर बंगले होतील म्हणाला. शंभर कोटी! त्यातले पन्नास कोटी दे मला असं आपण म्हणालो खरे एजंटला; पण ते काही खरं नाही. बंगले उभारायचा खर्च आपण करणार. च्छे! आपण कसा करणार? ते पैसे लोकांकडूनच एडवान्स घ्यायचे. आपणाला पन्नास कोटी एका प्रोजेक्टमध्ये सुटले तरी चालतील असे आपण एजंटला म्हणालो. हेच चुकलं आपलं. पंच्चाहत्तर कोटी तरी सुटायला हवेत. लोकसभा लढवताना तेवढे तरी हवेतच!

लगेचच त्यांनी फोन उचचला आणि एजंटचा नंबर जोडला.
म्हणाले, ‘‘अरे हे बघ. काल रात्रीच्या चर्चेत थोडा बदल करावा लागणार. मला पाऊणशे कोटी, तुला पंचवीस कोटी असं ठरवलंय मी.’’
‘‘पण साहेब…’’
‘‘भडव्या तो सोन्याचा डोंगर कोणामुळे मिळाला रे तुला?‘‘
‘‘तुमच्या, साहेब!’’
‘‘मग निमूटपणे ऐक माझं.’’ बापू दरडावून म्हणाले.
‘‘मला अगदी कमी सुटतंय, हो…’’
‘‘पंचवीस कोटी पुरेसे नाहीत व्हय रं भडव्या? सगळी नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट मिळणार ती माझ्या नावामुळं, प्लॅन पास होण्यापासून सगळीकडं वापरणार तू माझं नाव…’’
‘‘होय, साहेब…’’
‘‘मग म्हंतो तसं कर. काय दगाफटका केलास तर याद राख.’’
‘‘नाय होणार साहेब…’’
‘‘हां! असा ये वळणावर!’’ म्हणत त्यांनी मोबाईल बंद केला आणि ते तोंड धुण्यासाठी गेले.
तो दिवसभर त्यांच्या मनात तो एकच विचार घोळत होता. त्या प्रोजेक्टमधून निदान पंचाहत्तर कोटी सुटतील. आपण एक अख्खा डोंगर खाल्ला! डोंगर खाण्याची कल्पना त्यांना फारच आवडली. कोंबडी खाल्ली त्याचप्रमाणे डोंगर खाल्ला! त्या कल्पनेत खेळतच ते दिवसभर काम करीत राहिले.
‘‘पोट फुगल्यासारखं वाटतंय सकाळपासून’’ ते रात्री जेवायला बसताना पत्नीला म्हणाले. ‘‘फार नको वाढू’’
‘‘काय झालं पोट फुगायला?’’ पत्नीनं विचारलं.
‘‘काय म्हाईत?’’ त्यांनी साळसूदपणे म्हटलं.
‘‘काल रातच्याला चांगलं बारा वाजेस्तर चाल्ला होता प्रोग्रॅम? जादा ढोसली असंल तर फुगणारंच की पोट!’’ पत्नीने टोमणा मारला.
‘‘आईच्यानं सांगतो’’ ते म्हणाले, ‘‘चार-पाच पेग म्हन्जी काई लई ढोसणं म्हनशील का तू? सवय झालीय मला आता. पिण्यानं नाय माजं पोट फुगत.’’
‘‘मग काय, खाण्यानं फुगतं?’’ पत्नीनं रोखून बघत विचारलं.
‘‘तसं समज!’’
‘‘काय खाल्लं एवढ्यात? दौर्‍याला तर गेला नाय येवढ्यात’’
‘‘दोर्‍यावरच जावं लागतं की काय खायला?’’
‘‘मग?’’
‘‘घरीच येतं, खायचं ते चालत.’’
‘‘काय खाल्लं बाई एवढ्यात?’’ पत्नीनं कोतुकानं विचारलं.
‘‘सांगू?’’
‘‘सांगा की!’’
‘‘डोंगर!’’
‘‘डोंगर? डोंगर खाल्ला? की उंदीर?’’
‘‘कर मस्करी कर. इथं सरकारी बंगल्यात आपुन दोगंच असतो. घरी प्रायवसी नाय मिळत. घे करून मस्करी.’’
‘‘काय खाल्लं ते तरी समजू दे की आमाला’’ पत्नीनं लाडीकपणे विचारलं.
‘‘सांगितलं ना? डोंगर खाल्ला म्हणून?’’
‘‘डोंगर खाल्ला? तो कसा बाई?’’
बापूसाहेबांनी अगदी विस्ताराने सगळी हकीकत सांगितली आणि ते म्हणाले, ‘‘पाऊणशे कोटी तरी सुटतील बग त्यातून आपल्याला.’’
‘‘पाऊणशे कोटी का पाऊण कोटी?’’
‘‘पाऊणशे कोटी! पाऊणशे! शंबराला पंचवीस कमी. इतके कोटी’’ बापूसाहेब अभिमानाने उद्गारले आणि थांबून म्हणाले, ‘‘मावत न्हाईत गं पोटात? म्हणून दुखतया पोट!’’
‘‘मग डॉक्टरकडं जावा की!’’
‘‘तेच करतो उद्या.’’
रात्री झोपल्यावर ते आपल्याला पोट दुखण्याचा, डोंगर मिळण्याचा आणि डॉक्टरकडे जाण्याचा विचार करीत होते.
त्यांना मागच्या वेळचं पोट दुखणं आठवलं. त्यावेळी त्यांनी दहा एकर जमीन खाल्ली होती. कसल्यातरी कार्यक्रमासाठी ते एका खेड्यात गेले होते. तेव्हा ते राज्यमंत्री होते. कार्यक्रम आटोपला आणि ते तालुक्याला असलेल्या रेस्टहाऊसला मुक्कामासाठी आले. तिथं एकजण पुष्पगुच्छ घेऊन भेटायला आला. नमस्कार चमत्कार झाले. आलेला माणूस तसा बोलका होता. त्याने येताना विदेशी व्हिस्कीच्या दोन बाटल्याही आणल्या होत्या. त्याने गप्पा सुरू केल्या. बापूही गप्पात रंगले. मद्यपान झालं. जेवण झालं. ते त्यांनी रूमवरच मागवलं.
आलेल्या माणसाने हळूच विषय काढला. म्हणाला, ‘‘तुमच्या इंटरेस्टचं एक प्रपोजल आहे, बापूसाहेब!’’
‘‘असं म्हणता? सांगा तरी!’’
आलेल्याने सांगितलं, ‘‘जवळच इंडस्ट्रियल इस्टेट व्हायचीय. जागा मिळत नाहीय पुरेशी म्हणून रेंगाळलय काम. माझ्या बघण्यात एक पंधरा एकरांचा प्लॉट आहे. इस्टेटला लागूनच आहे. आहे एका म्हातार्‍याच्या मालकीची. शेतजमीन आहे. पण लागवड नाही. एकटा म्हातारा काय करणार? लहानसं घर बांधून एकटाच र्‍हातोय. जमीन सरकारला मिळवून देतो.’’
‘‘कशी पण?’’
‘‘म्हातार्‍याला संपवायचा. प्रकरण वाढणार नाही असं बघायचं. जमीन माज्या नावावर करून घेतो. तुमची मदत लागेल. वाटा देईन अर्धा. सरकारचा प्रोजेक्ट अडकून पडलाय. तुमी जमीन सरकारला घ्यायला लावा. दर लावू थोठा चढा. इथले पोलीस, सरकारी अधिकारी मी सांभाळतो. एकरी पाच लाखांचा भाव चाललाय. तो सात लाख करून घ्या. दहासुद्धा करता येतील. वारस कोणी नाहीय म्हातार्‍याला. त्याला कसं संपवायचं ते मी बघतो. गळफास घेऊन आत्महत्या असा पंचनामा करून घेतो. पोलिसांना चिरीमिरी दिली की भागतं. जमीन सरकार विकत घेईल कशी? ते तुम्ही बघायचं.’’
‘‘पण भानगड अंगाशी नाय ना यायची?’’ बापूंनी विचारलं.
‘‘ते मी बघतो ना!’’ आलेला म्हणाला, ‘‘तुम्ही फक्त सरकारमधले लोक संभाळायचे. इथलं मी बघतो.’’
काम झालं. बापू मध्यस्थाला म्हणाले, ‘‘जमीन तुम्ही हडप केली होती असं सांगू का पोलीस महासंचालकांना?’’
माणसाने पाय धरले. म्हणाला, ‘‘वाटलं तर तुमच्या नावचं मालकाच्या सहीचं बक्षीसपत्र करून देतो. पण मला नसत्या भानगडीत नका अडकवू.’’
‘‘कसं करणार बक्षीसपत्र?’’
‘‘तुम्ही त्या म्हातार्‍याचे लांबचे नातेवाईक दाखवता येईल. लांबच्या वहिनीचा नातू. ते सगळं जमवतो मी. जमीन तुमच्या नावावर होईल. तुम्ही मला विकायची. मी सरकारला. सगळ्या प्रकरणात मला धापाच लाख आणि तुम्हाला पाचपंचवीस लाख सुटले की पुरेत?’’
सगळं काम झालं. बापूंना पंचवीस लाख सुटले! ती पहिली यशस्वी मोहीम! त्यावेळी बापू नुसतेच राज्यमंत्री झाले होते.
त्यारात्री बायकोने म्हटलं, ‘‘पोट फुगायला लागलंय बरं का!’’
‘‘एवढ्यात कसं फुगेल? हा घास पयलाच खाल्लाय मी.’’
‘‘कसला घास खाल्लाय?’’ पत्नीने विचारलं.
तेव्हा बापूंनी पत्नीला सगळं सांगितलं. ती घाबरली. ‘‘काही तरी लफडं झालं तर?’’ तिनं घाबरून विचारलं.
‘‘आता मी राज्यमंत्री झालोय. पुढं मंत्री होईन, पुढं मुख्यमंत्री. कसं खायचं आणि कसं पचवायचं हे समजत जातं म्हणे हळूहळू!’’
‘‘कोण म्हणं?’’
‘‘आमचेच मंत्री सांगतात की!’’
बापूंचं पोट फुगलेलं दिसू लागलं. राजाकरणातले मित्र म्हणाले, ‘‘बापूसाहेब, जरा सावकाश खात जा बरं का! पोट झपाट्यानं वाढतंय!’’
‘‘काळजी काय काय घ्यायची, आता समजतं मला. काय काय खावं, किती खावं, कसं खावं? पथ्य काय पाळावं? समजतंय हळूहळू!’’ बापू आपल्याच पोटावरून हात फिरवीत आत्मविश्वासाने म्हणाले.
पुढच्या निवडणुकीनंतर विजयबापू कॅबिनेट मंत्री झाले. आता ते वेगाने खायला शिकले. त्यांनी शहरातल्या दोन झोपडपट्ट्या खाल्ल्या. तिथल्या झोपड्या उठवल्या. दमदाटी केली. त्यांच्या गुंडांनी तिथल्या माणसांवर हल्ले केले. त्यांना दहशत दाखवली. आगी लावल्या. खाजगी मालकीच्या जमिनीवर होत्या झोपड्या. त्या उठविल्यानंतर लवकरच तिथं उंच इमारती उभ्या राहिल्या. सगळं सूत्रसंचालन बापूंनी केलं. दर्शनी वेगळी माणसं उभी केली. इमारतीमधील गाळे विकले गेले. पैसे बापूंना मिळाले.
एके रात्री ते पत्नीला म्हणाले, ‘‘सगळ्या व्यवहारात पन्नास कोटी सुटले. राजकारण असं फायद्याचं असतं बघ! आणि तू म्हणत होतीस, मी राजकारणात पडू नये.’’
‘‘यापुढं नाही म्हणणार!’’ त्यांच्याशेजारी झोपत त्यांची पत्नी म्हणाली.
लवकरच बापूंनी प्लॉट्स खाल्ले, सहकारी बँकही खाल्ली, एक पतसंस्था खाल्ली.
दहा वर्ष झाली. बापूंनी राजकारणातली पंधरा वर्ष बर्‍याच गोष्टी खाऊन पूर्ण केली. एका रात्री त्यांच्या पोटात किंचीत दुखू लागलं. असेल कशाने तरी असं स्वत:ला समजावीत त्यांनी झोपायचा प्रयत्न केला. पण दुखणं थांबेना.
सकाळी ते डॉक्टरकडे गेले. आपल्या पोटातल्या दुखण्याबद्दल सांगितलं.
‘‘काय खाल्लं, प्यालं होतं रात्री?’’ डॉक्टरांनी विचारलं.
‘‘नेहमीचंच डॉक्टर, काही वेगळं नाही’’बापू म्हणाले.
‘‘झोपा’’
बापू पेशंट बेंचवर झोपले. डॉक्टरांनी तपासलं. म्हणाले ‘‘एक्स रे काढू या.’’
‘‘काढा.’’
डॉक्टरांनी एक्स रे काढला. काळजीच्या (खोट्या) स्वरात म्हणाले, ‘‘बापूसाहेब तुमच्या पोटात बर्‍याच गोष्टी दिसून आल्या. सांगू का?’’
‘‘सांगा की?’’ बापू घाबरत म्हणाले.
‘‘शेतजमीन, झोपडपट्ट्या…’’
‘‘काय तरी थट्टा करताय डॉक्टर…’’
‘‘खरंच सांगतोय…’’
‘‘आता?’’
‘‘ऑपरेशन करायला हवं.’’
‘‘मायला! एकदम ऑपरेशन?’’
‘‘पोटातला माल बाहेर काढण्यासाठी ऑपरेशनच करायला हवं’’
‘‘करून टाका!’’
ऑपरेशन झालं. पोटातून काढलेल्या असं सांगून डॉक्टरांनी त्यांना मातीचं मोठं डिखळ, झोपडपट्टी यांच्या प्रतिकृती दाखवल्या.
डॉक्टर म्हणाले, ‘‘अशा वस्तू तुम्ही खा बापू! राजकीय नेते म्हणून ते तुम्हाला करायलाच हवं. पण त्यासाठी थोडी प्लॅस्टिक सर्जरीही करूया!’’
‘‘ती कशासाठी डॉक्टर?’’
‘‘एक जादा पोट शिवून देतो तुम्हाला! अशा वस्तू खायच्या झाल्या तर हे जादा पोट उपयोगी पडेल. नेहमीच्या साध्या पोटावर ताण नाही पडणार जादा. शिवू?’’
‘‘बेस्ट आयडिया डॉक्टर. शिवाच एक जादा पोट!’’
डॉक्टरांनी बापूंच्या पोटाला एक जादा पोट शिवून दिलं. बापूसाहेब खूष झाले. त्यांच्या खाण्याचा उत्साह वाढला. त्यांनी नवं पोट कौतुकानं कुरवाळलं आणि डॉक्टरांना विचारलं,
‘‘डॉक्टर कितीही माल खाल्ला तरी पोट फाटाफुटायचा धोका नाही ना?’’
‘‘बिनधास्त रहा. भरपूर खा. नव्हे हादडा!’’
बापूंनी खाण्याचा वेग वाढवला. मालात विविधता आणली. हळूहळू दुसरं पोटही वाढत गेलं. तेही मोठं दिसू लागलं. जड वाटू लागलं. खाण्याचं प्रमाण वाढलं तसतसं ते बेढब वाटू लागलं. आपलं दुसरं पोट त्यांनी पत्नीपासून लपवलं होतं. पण तिच्या नजरेतून ते थोडंच सुटणार होतं? म्हणूनच तिनं म्हटलं होतं, ‘‘पोट लईच मोठं दिसाया लागलंय बरं का? पोट एकच हाय का दोन?’’
‘‘माझं पोट फारंच मोठं दिसतं का गं?’’ त्यांनी एकदा पत्नीला विचारलं.
‘‘तर हो! लईच मोठं दिसतंया!’’
‘‘काय गं तुला कळलं तरी का कधी?’’
‘‘काय कळायचं?’’
‘‘माझ्या मूळच्या पोटाला एक जादा पोट जोडलंय, हे?:’’
‘‘अगं बया!’’ पत्नी उद्गारली आणि म्हणाली, ‘‘मला वाटायचं मूळचं पोटंच फुगत फुगत चाललय खाऊन खाऊन!’’
‘‘अगं खाण्याचं प्रमाण इतकं वाढल्यावर मूळचं एकच पोट कसं पुरेल? म्हणून एक जादा पोट शिवून घेतलं एका डॉक्टरकडून. आता मला एकूण पोटं झाली दोन.’’
मुख्यमंत्र्यांनी खातेबदल केला. विजयबापूंकडे सार्वजनिक बांधकाम खातं आलं. त्यांनी आपली अक्कल हुशारी वापरली. खाणं सुरूच ठेवलं.
त्यांनी रस्त्यांची कामं काढली – ते खाल्ले
उड्डाणपूल बांधले – ते खाल्ले.
साधे पूल बांधले – ते खाल्ले.
नद्यांवर पूल बांधले – ते खाल्ले.

सार्वजनिक इस्पितळांच्या इमारती बांधतो म्हणाले – त्या खाल्ल्या.
एके दिवशी त्यांनी पत्नी त्यांना म्हणाली, ‘‘अहो ऐका जरा…’’
‘‘आता काही बोलूच नकोस. डोकं जड झालंया!’’
‘‘कशांनं?’’
‘‘बाजूला हो गप, मला झोप येतीय…’’ असं म्हणत ते अंथरूणावर कोसळलेच!
सकाळी त्यांनीच पत्नीला सांगितलं, ‘‘गेली दोन दिवस हिशेब करतोय. किती झाली असेल आपली इस्टेट? सगळं अगं आठवंच ना!’’
‘‘कसं आठवणार? कागदावर टिपून नाय का ठेवायचं?’’
‘‘वेडी का काय?’’ बापूंनी विचारलं, ‘‘त्ये कागद कुणाच्या तरी हाती लागलं म्हंजे? आली का आफत? एक तर तो ब्लॅकमेल करणार अँटीकरप्शनवाल्यांना दाखवतो म्हणून. नायतर सरळ शीएमना देणार.’’
‘‘टिपून नको ठेवायला किती काय काय खाल्लंय ते?’’ पत्नीने पुन्हा विचारलं.
‘‘सगळं आठवत बसलो. अबाबा! डोक्यात आकडे मावेचनात!’’
‘‘मग हो?’’
‘‘गेलो पुन्हा डॉक्टरकडे. मला पोटं शिवून देणार्‍या’’
‘‘मग?’’
‘‘त्यांना म्हटलं, डॉक्टर साहेब, मला आणखी एक पोट द्या बुवा शिवून!’’
‘‘मग?’’
‘‘डॉक्टर म्हणाले, तुम्हाला एकूण तीन पोटं होतील, एक निसर्गाने किंवा देवाने दिलेलं. मी शिवलेले एक. झाली दोन. तिसरं कुठं शिवू ते सांगा.’’
‘‘मग?’’ पत्नीने विचारलं.
‘‘म्हणालो, डॉक्टर एक पोट नेहमीच्या जागी आहे. जसं सर्वांना असतं. दुसरं उजव्या बाजूला तुम्ही शिवून दिलं. तिसरं डाव्या बाजूला फिट करा!’’
‘‘पेलवणार नाहीत तुम्हाला.’’ डॉक्टर म्हणाले.
‘‘का नाही पेलवणार?’’
‘‘अहो साहेब, मंत्री झालात म्हणून काय टम्म फुगलेली तीन तीन पोटं का पेलवणार तुम्हाला?’’
‘‘पेलतील की!’’
‘‘फार चमत्कारिक दिसाल.’’
‘‘भरलेल्या पोटांमुळं दिसायला झालं थोडं चमत्कारिक म्हणून काय बिघडलं?’’
‘‘ठीक आहे.’’ डॉक्टर म्हणाले, ‘‘पेशंटची तक्रार नसली तर मी तिसरंही पोट शिवून देतो. मग तर झालं?’’
‘‘मोठी मेहेरबानी होईल डॉक्टर.’’
डॉक्टरांनी आणखी एक पोट शिवले आणि म्हणाले, ‘‘झाली तीन पोटं. एक मूळचं. देवाने दिलेलं. मी दोन शिवून दिली. एक डावीकडे, एक उजवीकडे. बघा आरशात किती बेढब दिसताय ते!’’
बापूंनी आरशासमोर उभं राहून स्वत:कडे बघितलं. बेढबपणा वाढला होता, हे खरं. पण काय करणार दुसरं तरी?
‘‘आता सफारी ऐवजी ढगळसा कोट घालायला लागा.’’ डॉक्टरांनी सल्ला आणि निरोप एकदमच दिला.
बापू आता जाकीट, सफारी ऐवजी कोट वापरू लागले. आपली तीनही पोटं दडवू लागले. खाणं वाढलं.
जेवतानाही ते पत्नीला म्हणू लागले, ‘‘भाकर्‍या दोन दोन लागतील मला यापुढं.’’
‘‘त्या का? भूक वाढलीया जणू!’’ पत्नी म्हणाली.
‘‘भूकही आणि पोटही!’’ बापू उद्गारले आणि जेवू लागले.
‘‘म्हंजी?’’
‘‘अगं, तुला न सांगताच मी एक काम करून टाकलं.’’
‘‘कोणतं ग बया?’’
‘‘आणखी एक पोट शिवून घेतलं!’’
‘‘अगं बया! म्हंजी दोन खोटी पोटं झाली म्हणा की!’’
‘‘खोटी नाही गं! तीच पोटं खरी!’’ बापू म्हणाले आणि तिसरी भाकरी खाऊ लागले.
मुख्यमंत्र्यांनी मंत्रीमंडळात फेरबदल केले. आता विजयबापूंकडे पाटबंधारे खातं आलं. ते देताना मुख्यमंत्री बापूंना विश्वासात घेत म्हणाले,
‘‘हायकमांडने हे खातं मुद्दाम तुमच्याकडे द्यायला सांगितलं. आलं का लक्षात?’’
‘‘आलं साहेब! आता फक्त खात सुटायचं. लोकसभा निवडणूक लागेलच आता. मी केलीय आधीच तयारी.’’
‘‘तयारी? ती कसली?’’
‘‘खूप खावं लागणार, त्याची!’’ बापू म्हणाले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांचा निरोप घेतला.
रात्री ते पत्नीला म्हणाले, ‘‘तिसरं पोट शिवून घेतलं ते बरंच झालं बघ!’’
‘‘कसं काय?’’
‘‘सी एम सायबांनी माझं खातं बदललं. पाटबंधारे खातं दिलं माझ्याकडे. हायकमांडने सांगितलं म्हणे हा बदल करायला. आता काम एकच खात सुटायचं! मला चौथही पोट शिवून घ्यावं लागेल. लोकसभा लागेल बहुतेक सातआठ महिन्यात.’’
जेवण करून थोडा वेळ टीव्ही बघून बापूसाहेब झोपण्यासाठी बेडरूममध्ये गेले. एसी चालू होता तरी ते नुसत्या पायजम्यावरच उताणे पडले.
थोठ्या वेळाने पत्नी बेडरूममध्ये आली. उघडा बंब झोपलेल्या आपल्या नवर्‍याकडे पत्नीने नीट बघितले. किती चमत्कारिक आणि बेढब दिसत होता तिचा नवरा! मूळचं पोट वाढलेलंच. टुमरूक झालेलं. शिवून घेतलेली दोनही तशीच. दोनी अंगांना दोन भोपळे धरल्यासारखी दिसणारी त्याची ती दोन शिवून घेतलेली पोटं.

थोडा वेळ आपल्या नवर्‍याकडे बघून ती हॉलमध्ये आली. टीव्ही बघत बसली. रात्रीचे दोन वाजून गेले. टीव्ही बंद करून ती उठली. स्वयंपाकघरात आली. टेबलवरची सुरी घेऊन ती बेडरूममध्ये आली.
थोडा वेळ बेडच्या कडेवर बसली. अजूनही उताणाच झोपलेल्या आपल्या नवर्‍याकडं बघत राहिली. थोड्यावेळाने तिने सुरी हातात घेतली आणि नवर्‍याची दोन्ही खोटी पोटं कचकन् कापून काढली.
नवर्‍याला जाग आली. ‘‘अगं काय करते आहेस हे?’’ तो ओरडतच उठून बसला.
‘‘काही नाही. तुम्ही शिवून घेतलेली जादाची दोन्ही पोटं कापून काढली.’’
‘‘अगं माझी पोटंऽऽ’’ बापूसाहेब किंचाळले.
‘‘गप र्‍हावा. वरडायचं काम न्हाई. रगताचा एक थेंब पण आलेला न्हाई.’’
‘‘काय केलंस पण तू हे? आणि का?’’
‘‘सांगते.’’ ती म्हणाली आणि तिने कापून काढलेली दोन्ही पोटं कचर्‍याच्या बास्केटमधे टाकून दिली. पुन्हा नवर्‍यापाशी आली आणि बेडच्या कडेवर बसत म्हणाली,
‘‘डॉक्टरांकडून तुम्ही शिवून घेतलेली दोन्ही पोटं मी कापून टाकून दिली. देवानं दिलेलं एक पोट शिल्लक आहे. ते नाही कापणार मी. इथून पुढं त्या पोटात मावल तेवढंच खा!’’

– ह. मो. मराठे पुणे
पूर्वप्रसिद्धी – मासिक ‘साहित्य चपराक’, दिवाळी विशेषांक 2015

‘चपराक प्रकाशन’च्या वाचनीय आणि दर्जेदार पुस्तकासाठी आणि ‘चपराक’चे सभासद होण्यासाठी संपर्क ७०५७२९२०९२

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

One Thought to “चौथं पोट – ह. मो. मराठे”

  1. जयंत कुलकर्णी

    ह. मो. मराठे यांची कथा विनोदी असून वास्तवाला धरून आहे.

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा