नेताजी सुभाषचंद्र बोस … अद्वितीय स्वातंत्र्यसेनानी

नेताजी सुभाषचंद्र बोस ... अद्वितीय स्वातंत्र्यसेनानी

भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात ज्या थोर महापुरुषांनी कशाचीही पर्वा न करता उडी घेतली आणि अगदी निकराने लढा देत भारताला स्वतंत्र करण्यात मोलाची भूमिका बजावली, त्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणजे भारत भूमीला लाभलेले अनमोल नररत्न होते. त्यांचं वक्तृत्व आणि विचार इतके प्रभावी होते की समोरची साधारण व्यक्ती आपसूकच त्यांच्याशी आणि त्यानंतर स्वातंत्र्यलढ्याशी जोडली जायची! त्याकाळी सुभाषबाबूंनी केलेलं कार्य आजही प्रत्येक तरुणाला प्रेरणा देणारं, अन्यायाविरुद्ध हातात शस्त्र उचलायला लावणारं आहे. म्हणूनच त्याकाळी ब्रिटिश सरकारला सुध्दा त्यांची दहशत वाटत होती!

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म दिनांक २३ जानेवारी १८८७ रोजी ओरिसा राज्यातील कटक येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ आणि आईचे नाव प्रभावती होते. जानकीनाथ बोस हे कटक शहरातील नामवंत वकील होते. आधी ते सरकारी वकील म्हणून काम करत होते पण नंतर त्यांनी आपली स्वतःची वकिली सुरू केली. कटक महापालिकेत ते काही काळ काम करत होते. तसेच बंगालचे विधानसभेचे सदस्यही होते. इंग्रज सरकारने त्यांना ‘रायबहादूर’ हा किताब दिला होता.

लहानपणापासूनचं ते बंडखोर वृत्तीचे होते. शाळा शिकत असतानाच राष्ट्रप्रेमाचे बाळकडू त्यांना मिळाले. शाळेत त्यांच्या एका शिक्षकाचे नाव वेणीमाधव दास होते. ते आपल्या विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचे स्फुल्लिंग जागवत. त्यांनी सुभाषमधली सुप्त देशभक्ती जागृत केली. त्यामुळे त्यांच्यात अन्यायाविरुद्ध लढण्याची वृत्ती निर्माण झाली. वयाच्या १५-१६ व्या वर्षीच सुभाषबाबू आपल्या मित्रासोबत गुरूच्या शोधात घराबाहेर पडले होते. त्यासाठी हिमालयावर जाण्याचा त्यांचा मानस होता. त्यांनी त्या दिशेने प्रस्थानही केले होते. मात्र त्यांना काही गुरुदर्शन झाले नाही. त्यानंतर सुभाषबाबूंनी स्वामी विवेकानंदांचे साहित्य वाचून त्यांना आपले गुरु बनवले.

कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी महाविद्यालय शिकत असताना एकदा इंग्रजी शिकवणाऱ्या ‘ओटेन’ नावाच्या शिक्षकाने वर्गात भारतीयांना दुषणे देण्यास सुरुवात केली. ते सुभाषबाबूंच्या लक्षात येताच त्याचक्षणी ते उठून उभे राहिले आणि त्या शिक्षकाला गप्प केले. भारत आणि भारतीयांविरोधात काहीही बरळण्याचा त्या शिक्षकाला जाब विचारला आणि संप पुकारला. या कृतीमुळे सुभाषबाबूंना कॉलेजमधून काढून टाकण्यात आले.

१९२१ मध्ये सुभाषबाबू उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. मुळातच अतिशय बुद्धिमान असलेल्या सुभाषबाबूंनी इंडियन सिव्हील सर्व्हिसची परीक्षा दिली आणि त्यात त्यांनी ४ था क्रमांक पटकावला होता. त्याकाळी गव्हर्नरला भेटायला जाताना सोबत छत्री घेऊन जाण्यास मनाई होती. परंतु सिव्हील सर्व्हिसची परीक्षा पास झाल्यावर नेताजींनी अशाप्रकारचा तुघलकी फतवा पाळण्यास साफ नकार दिला. त्यानंतर स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होऊन भारतभूमीला स्वतंत्र करण्याच्या इराद्याने सुभाषचंद्र बोस यांनी इंडियन सिव्हील सर्विसमधील चांगल्या पगाराच्या सरकारी नोकरीला लाथाडले. आणि ते भारतात परतले.

भारतात परतल्यानंतर रविंद्रनाथ टागोर यांच्या सल्ल्यानुसार ते सर्वप्रथम मुंबईला जाऊन महात्मा गांधींना भेटले. मुंबईत गांधींजी मणिभवन नामक वास्तुमध्ये राहत होते. तेथे२० जुलै१९२१ रोजी महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस सर्वप्रथम एकमेकांना भेटले.गांधींजीनी त्यांना कलकत्याला जाऊन देशबंधू चित्तरंजन दास बाबूंसोबत कार्य करण्याचा सल्ला दिला. मग सुभाषबाबू कलकत्त्याला आले आणि दासबाबूंना भेटले. दासबाबूंना त्यांना पाहून फार आनंद झाला. त्याकाळी, गांधींजीनी इंग्रज सरकारच्या विरोधात असहकार आंदोलन चालवले होते. दासबाबू बंगालमध्ये या आंदोलनाचे नेतृत्व करत होते. त्यांच्याबरोबर सुभाषबाबू या आंदोलनात सक्रिय सहभागी झाले.

१९२२ साली दासबाबूंनी काँग्रेस अंतर्गत स्वराज पक्षाची स्थापना केली. विधानसभेच्या आतून इंग्रज सरकारला विरोध करण्यासाठी,कलकत्ता महापालिकेची निवडणूक स्वराज पक्षाने लढवून जिंकली. स्वतः दासबाबू कलकत्त्याचे महापौर झाले. त्यांनी सुभाषबाबूंना महापालिकेचे प्रमुख कार्यकारी अधिकारी बनवले. सुभाषबाबूंनी आपल्या कार्यकाळात महापालिकेची काम करण्याची पद्धतच बदलून टाकली. कलकत्त्यातील रस्त्यांची इंग्रज नावे बदलून, त्यांना भारतीय नावे दिली गेली. स्वातंत्र्यलढ्यात प्राणार्पण केलेल्या क्रांतिकारकांच्या कुटुंबीयांना महापालिकेत नोकरी मिळू लागली.

१९३८ साली काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन हरिपुरा येथे झाले.या अधिवेशनासाठी गांधीजींनी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून सुभाषबाबूंची निवड केली. हे काँग्रेसचे ५१वे अधिवेशन होते. या अधिवेशनात सुभाषबाबूंचे अध्यक्षीय भाषण फारच प्रभावी झाले. कोणत्याही भारतीय राजकीय व्यक्तीने क्वचितच इतके प्रभावी भाषण कधी केले असेल. आपल्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत सुभाषबाबूंनी योजना आयोग स्थापना केला. पंडित जवाहरलाल नेहरू त्याचे अध्यक्ष होते. सुभाषबाबूंनी बेंगलोर येथे प्रसिद्ध वैज्ञानिक सर विश्वेश्वरैय्यांच्या अध्यक्षतेखाली एक विज्ञान परिषदही भरवली होती.

१९३८ साली गांधीजींनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी सुभाषबाबूंची निवड केली असली, तरी गांधीजींना सुभाषबाबूंची कार्यपद्धती पसंत नव्हती. याच सुमारास युरोपात दुसऱ्या महायुद्धाची छाया पसरली होती. सुभाषबाबूंची इच्छा होती की इंग्लंडच्या कठीण परिस्थितीचा लाभ उठवून, भारताचा स्वातंत्र्यलढा अधिक तीव्र केला जावा. त्यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत त्या दिशेने पावले टाकण्यास सुरूवातही केली होती. मात्र गांधीजी त्यांच्या विचारसरणीशी सहमत नव्हते.

१९३९ मध्ये जेव्हा नवीन काँग्रेस अध्यक्ष निवडण्याची वेळ आली, तेव्हा सुभाषबाबूंना अध्यक्षपदावर कुणी अशी व्यक्ती हवी होती, जी कोणत्याही दबावासमोर झुकणार नाही. अशी कोणती दुसरी व्यक्ती समोर न आल्यामुळे, सुभाषबाबू स्वतः पुन्हा काँग्रेस अध्यक्ष बनू इच्छित होते कविवर्य रवींद्रनाथ टागोर यांनी गांधीजींना पत्र लिहून सुभाषबाबूंनाच पुन्हा अध्यक्ष बनवण्याची विनंती केली. प्रफुल्लचंद्र राय, मेघनाद साहा सारखे वैज्ञानिकही पुन्हा सुभाषबाबूंनाच अध्यक्ष करावे याच मताचे होते. पण गांधीजींनी ह्या प्रश्नावर कुणाचेच म्हणणे ऐकले नाही. शेवटपर्यंत तडजोड न होऊ शकल्यामुळे, अनेक वर्षांनंतर, काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली गेली. सर्वजण समजत होते की जेव्हा स्वतः महात्मा गांधीनी पट्टाभि सितारामैय्या यांना साथ दिली आहे, तेव्हा तेच ही निवडणूक आरामात जिंकणार. पण घडले वेगळेच. सुभाषबाबूंना निवडणुकीत १५८० मते मिळाली तर पट्टाभी सितारमैय्यांना १३७७ मते मिळाली. गांधीजींनी विरोध करूनही सुभाषबाबूंनी २०३ मतांनी ही निवडणूक जिंकली. मात्र नंतर अंतर्गत मतभेद वाढल्याने परिस्थिती अशी बनली की सुभाषबाबू काही कामच करू शकत नव्हते. अखेर, एप्रिल २९, १९३९ रोजी सुभाषबाबूंनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

त्यानंतर ३ मे १९३९ रोजी सुभाषबाबूंनी ‘फॉरवर्ड ब्लॉक’ नामक आपल्या पक्षाची स्थापना केली. पुढे फॉरवर्ड ब्लॉक हा एक स्वतंत्र पक्ष बनला. दुसरे महायुद्ध सुरू होण्यापूर्वीच, फॉरवर्ड ब्लॉकने भारताचा स्वातंत्र्यलढा अधिक तीव्र करण्यासाठी जनजागृती सुरू केली. त्यामुळे इंग्रज सरकारने सुभाषबाबू सहित फॉरवर्ड ब्लॉकच्या सर्व मुख्य नेत्यांना कैद केले. दुसरे महायुद्ध सुरू असताना तुरूंगात निष्क्रिय राहणे सुभाषबाबूंना शक्य नव्हते. सरकारला आपली सुटका करण्यास भाग पाडण्यासाठी सुभाषबाबूंनी तुरूंगात आमरण उपोषण सुरू केले. तेव्हा सरकारने त्यांची सुटका केली. पण इंग्रज सरकार युद्धकाळात सुभाषबाबूंना मोकळे ठेवू इच्छीत नव्हते. त्यामुळे सरकारने त्यांना त्यांच्याच घरात नजरकैदेत ठेवले!

नजरकैदेतून निसटण्यासाठी सुभाषबाबूंनी एक योजना बनवली. १६ जानेवारी १९४१ रोजी पठाणी वेशभूषेत त्यांनी महमद झियाउद्दीन असे नाव धारण केले आणि ते पोलिसांची नजर चुकवून घरातून निसटले. सुभाषबाबूंचे ज्येष्ठ बंधू शरदबाबूंचा प्रथम पुत्र शिशिर ह्याने आपल्या गाडीतून त्यांना कलकत्त्यापासून दूर, गोमोह येथे पोचवले. गोमोह रेल्वे स्थानकावर फ्रंटियर मेल पकडून ते पेशावरला पोचले. पेशावर येथे त्यांना फॉरवर्ड ब्लॉक मधील एक सहकारी मिया अकबर शहा भेटले. मिया अकबर शहांनी त्यांची ओळख कीर्ती किसान पार्टीच्या भगतराम तलवारशी करून दिली. नंतर भगतरामसोबत सुभाषबाबू पेशावरहून अफगाणिस्तानची राजधानी काबूलच्या दिशेने निघाले. ह्या प्रवासात भगतराम तलवार, रहमतखान नामक पठाण बनले होते व सुभाषबाबू त्यांचे मुके-बहिरे काका बनले होते. हा संपूर्ण प्रवास त्या दोघांनी डोंगरातून पायी चालत पूर्ण केला.

काबूलमध्ये उत्तमचंद मल्होत्रा नावाचा एक भारतीय व्यापारी राहत होता. सुभाषबाबूंनी दोन महिने त्यांच्या घरी वास्तव्य केले. तिथे त्यांनी प्रथम रशियन वकिलातीत प्रवेश मिळवण्याचा प्रयत्‍न केला. त्यात यश न आल्यामुळे, त्यांनी जर्मन व इटालियन वकिलातीत प्रवेश मिळवण्याचा प्रयत्‍न केला. इटालियन वकिलातीत त्यांच्या प्रयत्‍नांना यश आले. जर्मन व इटालियन वकिलातींनी त्यांना मदत केली. शेवटी ‘ओरलँडो मझयुटा’ नामक इटालियन व्यक्ती बनून सुभाषबाबूंनी काबूलहून रेल्वेने प्रवास करत रशियाची राजधानी मॉस्को गाठले. नंतर जर्मनीची राजधानी बर्लिन येथे पोहचले.

बर्लिन येथे सुभाषबाबू सर्वप्रथम रिबेनट्रोप इत्यादी जर्मनीच्या अन्य नेत्यांना भेटले. त्यांनी जर्मनीत भारतीय स्वातंत्र्य संघटना व ‘आझाद हिंद रेडिओ‘ची स्थापना केली. याच दरम्यान सुभाषबाबू, नेताजी या नावाने ओळखले जाऊ लागले. जर्मन सरकारचे एक मंत्री फॉन ट्रॉट सुभाषबाबूंचे फार चांगले मित्र बनले. काही दिवसांनी म्हणजे २९ मार्च १९४२ रोजी सुभाषबाबू जर्मनीचे सर्वोच्च नेते हिटलर यांना भेटले पण हिटलरला भारताच्या विषयात फारसा रस नव्हता. त्यांने सुभाषबाबूंना सहकार्याचं कोणतंही स्पष्ट वचन दिलं नाही. शेवटी सुभाषबाबूंना समजले की अ‍ॅडॉल्फ हिटलर व जर्मनी ह्यांच्याकडून त्यांना फार काही मिळण्यासारखे नाही. त्यामुळे ८ मार्च १९४३ रोजी जर्मनीतील कील बंदरात, ते अबीद हसन सफरानी नामक साथीदारासह एका जर्मन पाणबुडीत बसून पूर्व आशियाच्या दिशेने निघाले. या जर्मन पाणबुडीतून त्यांनी हिंदी महासागरातील मादागास्करचा किनारा गाठला. तिथून त्या दोघांनी भयंकर समुद्रातून रबराच्या होडीने वाट काढत जपानी पाणबुडी गाठली. ही पाणबुडी मग त्यांना इंडोनेशियातील पादांग बंदरात घेऊन आली. तेथे सुभाषबाबूंना वयोवृद्ध क्रांतिकारी रासबिहारी बोस भेटले. नंतर त्यांनी सिंगापूर येथील फेरर पार्कमध्ये भारतीय स्वातंत्र्य परिषदेचे नेतृत्व सुभाषबाबूंकडे सोपवले. नेताजींच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित होऊन, जपानचे पंतप्रधान जनरल हिदेकी तोजो यांनी त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. काही दिवसांनंतर, नेताजींनी जपानची संसद ‘डायट’ समोर भाषण केले.

२१ ऑक्टोबर १९४३ रोजी नेताजींनी सिंगापुरात अर्जी-हुकुमत-ए-आझाद-हिंदची (स्वाधीन भारताचे अंतरिम सरकार) स्थापना केली. या सरकारला एकूण नऊ देशांनी मान्यता दिली. नेताजी स्वतः आझाद हिंद सेनेचे सरसेनापती बनले. आझाद हिंद सेनेत जपानी लष्कराने इंग्रजांच्या फौजेतून पकडलेल्या भारतीय युद्धबंद्यांना भरती केले गेले. या आझाद हिंद सेनेत स्त्रियांसाठी ‘झाँसी की रानी’ रेजिमेंटही बनवली गेली. पूर्व आशियात नेताजींनी अनेक भाषणे करून तेथील स्थायिक भारतीय लोकांना आझाद हिंद फौजेत भरती होण्याचे तसेच त्यांना आर्थिक मदत करण्याची आवाहने केली. ही आवाहने करताना त्यांनी ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूँगा’ असा नारा दिला!

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात, आझाद हिंद सेनेने जपानी लष्कराच्या साथीने भारतावर आक्रमण केले. आपल्या फौजेला प्रेरणा देण्यासाठी नेताजींनी ‘चलो दिल्ली’ अशी हाक दिली. दोन्ही फौजांनी इंग्रजांकडून अंदमान आणि निकोबार बेटे जिंकली. ही बेटे अर्जी-हुकुमत-ए-आझाद-हिंदच्या अनुशासनाखाली राहिली. नेताजींनी या बेटांचे शहीद आणि स्वराज बेटे असे नामकरण केले. दोन्ही फौजांनी मिळून इंफाळवर व कोहिमावर आक्रमण केले. पण नंतर इंग्रजांनी बाजी मारली व दोन्ही फौजांना माघार घ्यावी लागली.

आझाद हिंद सेना माघार घेत असताना, जपानी लष्कराने नेताजींना पळून जाण्यासाठी व्यवस्था केली पण नेताजींनी झाँसी की रानी रेजिमेंटच्या मुलींच्या साथीने शेकडो मैल चालत जाणे पसंत केले. अशा प्रकारे नेताजींनी नेतृत्वाचा एक आदर्शच समोर ठेवला.

६ जुलै १९४४ रोजी आझाद हिंद रेडिओवरचे आपले भाषण नेताजींनी गांधीजींना उद्देशून केले. ह्या भाषणाच्या माध्यामातून नेताजींनी गांधीजींना, जपानकडून मदत मागण्याचे आपले कारण व आझाद हिंद सेनेची स्थापना करण्यामागचे उद्दिष्ट स्पष्ट केले. ह्या भाषणात नेताजींनी गांधीजींचा राष्ट्रपिता असा उल्लेख करत, आपल्या युद्धासाठी त्यांचा आशीर्वाद मागितला. अशा प्रकारे नेताजींनी गांधीजींना सर्वप्रथम राष्ट्रपिता असे संबोधले.

दुसर्‍या जागतिक महायुद्धातील जपानच्या पराभवानंतर, नेताजींना नवा रस्ता शोधणे जरूरीचे होते. मग त्यांनी रशियाकडून मदत मागायचे ठरवले होते. ऑगस्ट १८, १९४५ रोजी नेताजी विमानातून मांचुरियाच्या दिशेने जात होते. या प्रवासादरम्यान ते बेपत्ता झाले. ह्या दिवसानंतर ते कधी कुणाला दिसलेच नाहीत. ऑगस्ट २३, १९४५ रोजी जपानच्या “दोमेई” या वृत्तसंस्थेने जगाला कळवले की, “१८ ऑगस्ट १९४५ रोजी नेताजींचे विमान तैवानच्या भूमीवर अपघातग्रस्त झाले व त्या दुर्घटनेत खूपच भाजलेल्या नेताजींचे इस्पितळात निधन झाले! अपघातग्रस्त विमानात नेताजी सुभाषचंद्रांसह त्यांचे सहकारी कर्नल हबिबूर रहमान होते. त्यांनी नेताजींना वाचवण्यासाठी प्रयत्‍नांची शर्थ केली, परंतु त्यांना यश आले नाही. मग नेताजींच्या अस्थी जपानची राजधानी टोकियो येथील रेनकोजी नामक बौद्ध मंदिरात ठेवल्या गेल्या!”

स्वातंत्र्यानंतर, भारत सरकारने ह्या घटनेची चौकशी करण्यासाठी, १९५६ आणि १९७७ मध्ये दोन वेळा एकेका आयोगाची नियुक्ती केली. दोन्ही वेळा हाच निष्कर्ष निघाला की नेताजींचा त्या विमान अपघातातच मृत्यू ओढवला होता. या आयोगाने तैवानच्या सरकारशी संपर्क साधून माहिती मिळवण्याचा प्रयत्‍न केला नव्हता.

१९९९ साली मनोज कुमार मुखर्जी ह्यांच्या नेतृत्वाखाली तिसरा आयोग नेमला गेला. २००५ साली तैवान सरकारने मुखर्जी आयोगाला असे कळवले की १९४५ साली तैवानच्या भूमीवर कोणतेही विमान अपघातग्रस्त झालेच नव्हते. २००५ मध्ये मुखर्जी आयोगाने भारत सरकारला आपला अहवाल सादर केला. आयोगाने आपल्या अहवालात असे लिहिले की नेताजींचा मृत्यू त्या विमान अपघातात घडल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. परंतु भारत सरकारने मुखर्जी आयोगाचा हा अहवाल नामंजूर केला.

ऑगस्ट १८, १९४५ च्या दिवशी नेताजी सुभाषचंद्र कसे व कुठे बेपत्ता झाले तसेच त्यांचे पुढे नक्की काय झाले, हे भारताच्या इतिहासातील सर्वांत मोठे अनुत्तरित रहस्य बनले आहे!!

१९९२ साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मरणोपरान्त भारतरत्न प्रदान करण्यात आले होते परंतु सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या एका जनहितयाचिकेचा आधार घेऊन नेताजींना दिलेला हा पुरस्कार परत काढून घेण्यात आला. त्या याचिकेत नेताजींच्या मृत्यूचा कुठलाही पुरावा उपलब्ध नसल्याने त्यांना मरणोपरान्त ‘भारतरत्न’ पुरस्कार देणे अवैध आहे असा युक्तिवाद करण्यात आलेला होता. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने नेताजींना देण्यात आलेला हा पुरस्कार परत घेण्यात आला. दिलेला भारतरत्न पुरस्कार परत घेण्याची इतिहासातली ही एकमेव घटना आहे!

या थोर महापुरुषाने… नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिलेला “जय हिंद” चा नारा हा आज भारताचा राष्ट्रीय नारा बनला आहे. जय हिंद!!

नेताजींच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन!

विनोद श्रा. पंचभाई
वारजे, पुणे.
९९२३७९७७२५

आमचे इतरही लेख वाचण्यासाठी, दर्जेदार पुस्तके विकत घेण्यासाठी www.chaprak.com ला भेट द्या. ‘चपराक प्रकाशन’चे फेसबुक पेजही जरूर लाईक करा. उत्तमोत्तम व्हिडीओ पाहण्यासाठी ‘चपराक’च्या युट्यूबला भेट द्या आणि सबस्क्राइबही नक्की करा.
Copyright @ www.chaprak.com / All Rights Reserved.

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

5 Thoughts to “नेताजी सुभाषचंद्र बोस … अद्वितीय स्वातंत्र्यसेनानी”

 1. जयंत कुलकर्णी

  माहितीपूर्ण लेख! खूप आवडला!

 2. Arun Kamalapurkar

  अगदी थोडक्या शब्दात नेताजींचे जीवन आणि कार्य यांचा समर्पक आढावा घेतला आहे.महितीपूर्ण लेखनाबद्दल धन्यवाद.

 3. Shrikant sane

  सविस्तर माहिती पूर्ण लेख आवडला

 4. Hamid Hussian Shaikh

  ज़बरदस्त

 5. Satish lolge

  लेख आवडला माहीती पुर्ण होता

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा