छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आजही तरुण पिढीला कमालीचे आकर्षण आहे. येणारी प्रत्येक नवी पिढी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेमात पडते, शिवचरित्राचा अभ्यास करते व ‘जय भवानी, जय शिवाजी’ म्हणण्यात धन्यता मानते. असा परिपाठ गेली कित्येक वर्षे महाराष्ट्रात सुरू आहे.
‘मानवतेला उपकृत करणारा महामानव’ अशी जगाच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख आहे. माणूस इतिहास घडवतो की इतिहास माणसं घडवतो, हा इतिहासाच्या अभ्यासकांसाठी नेहमीचा प्रश्न आहे; मात्र छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषाने एक गौरवशाली इतिहास घडवला आणि या इतिहासाकडे बघताना नवा इतिहास घडला. हा वेगळा इतिहास महाराष्ट्राच्या मातीत घडला. प्रत्येक मराठी माणसाच्या मनात अपार आदर असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांकडे बघितले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील कथा ऐकत इथली पिढी लहानाची मोठी होते. अशा परिस्थितीत शिवचरित्राबद्दल असणाऱ्या कमालीच्या आदरापोटी निवृत्त शिक्षक आणि मालेगावातील शिवव्याख्याते श्री. रमेश शिंदे यांनी शिवचरित्र लिहिण्याचा हा प्रयत्न केला आहे, याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल गेली तीनशे वर्षे आम्ही सातत्याने बोलत आहोत व लिहित आहोत, मात्र तरीही कुठेही आम्हाला त्याचा कंटाळा आलेला नाही. शिवाजीराजांच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण करणे, तो इतिहास एकमेकांना सांगणे व त्या इतिहासापासून स्फूर्ती घेत आपल्या आयुष्याची वाटचाल करणे हा आमचा परिपाठ झाला आहे. विविध लेखकांची अभ्यासपूर्ण शिवचरित्रे गेल्या काही वर्षांत मराठीमध्ये सातत्याने आली आहेत. या चरित्रग्रंथात आज आणखी एका चरित्रग्रंथाची भर पडते आहे, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे.
शिवचरित्र सर्वसामान्य लोकांसमोर मांडणे व शिवचरित्राची ओळख प्रत्येक नव्या पिढीला करून देणे हे अत्यंत अवघड काम आहे. इतिहासाच्या अभ्यासकांनी शिवचरित्र लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत, अन्यथा हे काम चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, कथाकार, कवी, कादंबरीकार स्वतःच्या हातात घेतात व खरा इतिहास त्यापासून दूर जातो. ‘गड आला पण सिंह गेला’ या नावाची एक कादंबरी विसाव्या शतकाच्या सुरुवातीला हरिभाऊ आपटे यांनी लिहिली. त्या कादंबरीमध्ये त्यांनी ‘कमलकुमारी’ नावाचे काल्पनिक पात्र रेखाटले. कमलकुमारी या काल्पनिक पात्राने व तिच्या समाधीने वाचकांना इतकी भुरळ पाडली की, सिंहगड किल्ला पाहायला जाणारे अनेक पर्यटक ‘कमलकुमारीची समाधी सिंहगडावर कोठे आहे?’ अशी विचारणा करीत असत.
कथाकार व कादंबरीकार यांच्या कचाट्यात ऐतिहासिक महापुरुष सापडले की ते काय करतील हे सांगता येत नाही. रणजित देसाई यांच्या ‘श्रीमान योगी’मध्ये मनोहरी नावाचे एक काल्पनिक पात्र त्यांनी अशाच पद्धतीने रेखाटले आहे. ते पात्र खरोखरच शिवचरित्रात होते, अशा गैरसमजुतीने वाचणाऱ्यांची संख्या काही कमी नाही.
अशावेळी इतिहासाच्या अभ्यासकाचे काम अधिक महत्त्वाचे आहे. इतिहास वस्तुनिष्ठपणे व अत्यंत सोप्या भाषेत लोकांसमोर मांडणे व पोहोचवणे हे इतिहासाच्या अभ्यासकाचे महत्त्वाचे काम आहे. इतिहासाच्या अभ्यासकाला इतिहास सोप्या भाषेत मांडण्याचा व वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा बर्याचदा कंटाळा येतो, असे दिसून येते. इतिहासाचे वाचन करावे, अभ्यास करावा, नवीन संशोधन करावे व त्या संशोधनकार्यात इतके बुडून जावे की, सामान्य माणसाला समजेल अशा सोप्या शब्दांत इतिहास मांडणे हे इतिहासाचे अभ्यासक बर्याचदा टाळतात. हा प्रकार जगातील सर्व देशांमध्ये व सर्व भाषांमध्ये सातत्याने होत राहिला आहे. मराठीही त्याला अपवाद नाही.
शिवचरित्रावर व छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्रावर अशा पद्धतीने कथाकार व कादंबरीकार यांनी अनेक काल्पनिक गोष्टी लिहिल्या आहेत. बर्याचदा चरित्रनायकांवर अन्याय झाले आहेत. चरित्रनायकांवर कथा व कादंबरीकारांनी अन्याय केला, असे एका बाजूला सतत म्हणत राहावयाचे व दुसर्या बाजूला इतिहासाची मांडणी न करता अगर चरित्रनायकांना सामान्य लोकांपर्यंत सोप्या शब्दांत न आणता केवळ टीका करावयाची, असा प्रकारही इतिहासाच्या अनेक अभ्यासकांनी केला आहे. आनंदाची गोष्ट अशी आहे की, श्री. रमेश शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा सोप्या पद्धतीने नवीन पिढीसमोर सादर केला आहे.
शिवाजीराजांच्या जीवनात घडलेल्या महत्त्वाच्या घटना हा आमच्या सर्वांच्या आवडीचा विषय आहे. शिवाजीराजांची व अफजलखानाची भेट व त्यानंतरचे मराठ्यांचे विजापूरकरांविरुद्धचे आक्रमण हा मराठ्यांच्या इतिहासातील अत्यंत मौल्यवान ठेवा आहे. प्रतापगडाच्या लढाईने छत्रपती शिवाजी महाराजांना सतराव्या शतकातील राजकारणात भारताच्या राजकीय रंगमंचावर स्वतःची ओळख मिळवून दिली. छत्रपती शिवाजीराजांनी शाहिस्तेखानावर केलेली शस्त्रक्रिया (सर्जीकल स्ट्राईक) व स्वतःच्याच लाल महालावर मारलेला छापा हा देखील असाच एक अद्भुत प्रसंग आहे. छत्रपती शिवाजीराजांची आग्रा भेट व तिथून सुटका याचेही आकर्षण आजही बिलकुल कमी झालेले नाही. याशिवाय शिवाजीराजांनी दोनदा केलेली सुरतेची लूट, पन्हाळ्यावरून छत्रपती शिवाजीराजांची सुटका इत्यादी प्रसंग छत्रपती शिवाजीराजांच्या कर्तृत्वाची ओळख करून देतात. या सर्व प्रसंगामुळे छत्रपती शिवाजीराजे व त्यांचा इतिहास हा अधिक रंजक होतो. या रंजकतेच्या पलीकडे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वेगळे व्यक्तिमत्त्व आहे, ते प्रशासक म्हणून आहेत, ते न्यायाधीश म्हणून आहेत, ते अभ्यासक म्हणून आहेत, ते चतुरस्त्र राजकारणी म्हणून आहेत, ते भविष्याचा वेध घेणारे राजकारणधुरंधर म्हणून आहेत, याचे विस्मरण बर्याचदा इतिहासाच्या अभ्यासकांना होते.
छत्रपती शिवाजीराजांच्या इतिहासाचा मागोवा घेत असताना ऐतिहासिक घटना व प्रसंग यात लेखक गुंतून गेला की त्याला त्या पलीकडचे छत्रपती शिवाजी महाराज दिसत नाहीत. किंबहुना त्या पलीकडच्या शिवरायांकडे त्याचे दुर्लक्ष होते. शिवाजीराजांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केलेल्या अनेक गोष्टी शिवचरित्राचे महत्त्व व वेगळेपण विशद करतात. छत्रपती शिवाजीराजांचे आरमार हे जगाच्या इतिहासातील अव्वल दर्जाचे आरमार होते. भारताच्या इतिहासात स्वतःचे आरमार उभे करणारे राज्यकर्ते ही शिवाजीराजांची ओळख आहे. शिवाजीराजांचे आरमार पाहिल्यानंतर जेम्स डग्लस प्रभावित झाला व ‘शिवाजीराजा हा एका किल्ल्यावर जन्माला आला व किल्ल्यावर मरण पावला ही ब्रिटिशांसाठी खूप चांगली गोष्ट झाली,’ असे म्हणून त्याने पुढे सांगितले की, ‘शिवाजीराजा हा समुद्रावर जन्माला आला असता तर ब्रिटिशांना भारतात येण्याऐवजी शिवाजीराजा लंडनला येऊन पोहोचला असता.’ शिवाजीराजांच्या आरमाराबद्दलची ही खूप मोठी पावती एका ब्रिटिश अभ्यासकाने दिली आहे.
छत्रपती शिवाजीराजांनी रांझे गावच्या बाबाजी गुजर या पाटलाला स्त्रीवरील व्यभिचारासाठी दिलेली शिक्षा व जलद गतीने चालवलेला खटला ही गोष्ट देखील तितकीच महत्त्वाची आहे. शिवचरित्राचा मागोवा घेत असताना या सर्व गोष्टींना स्पर्श करण्याचा प्रामाणिक प्रयत्न रमेश शिंदे यांनी केला आहे व ते त्यांचे खूप मोठे यश आहे.
शिवाजीराजे हे सतराव्या शतकात मध्ययुगात कल्याणकारी राज्याच्या निर्मितीसाठी अविरत प्रयत्न करीत होते. एका बाजूला मुघल, आदिलशहा व कुतुबशहा यांच्याशी लढत असताना परकीय सत्ताधीशांशीही शिवाजीराजांना लढावे लागत होते. ब्रिटिश, पोर्तुगीज, डच, फ्रेंच, सिद्दी या सर्वांशी शिवाजीराजांचा संबंध आला व सर्वांशी शिवाजीराजांनी संघर्षही केला. परकीय व्यापाऱ्यांना या देशात राज्यकारभार करावयाचा आहे, हे शिवाजीराजांनी अचूक ओळखले होते. ब्रिटिशांची वागणूक व चालरीत याबद्दल शिवाजीराजांना खात्री झाली होती व वरवर व्यापारी म्हणून आलेली ही जात राज्यकारभार करण्यासाठी उत्सुक असल्याने त्यांना ‘बंदरालगतची जागा व्यापारासाठी देऊ नये’, असे शिवाजीराजांनी स्पष्ट संकेत त्यांच्या अधिकाऱ्यांना दिलेले होते. या सर्व गोष्टींमुळे छत्रपती शिवाजीराजांचे व्यक्तिमत्त्व समजावून घेणे व ते शब्दबद्ध करणे हे फार मोठे आव्हान आहे.
शिवाजीराजांचे सहकारी व या सहकाऱ्यांनी हिंदवी स्वराज्य उभे करण्यासाठी केलेले बलिदान हाही शिवचरित्राच्या मांडणीतील महत्त्वाचा टप्पा आहे. तानाजी मालुसरे यांनी सिंहगड जिंकल्याची व सिंहगड जिंकताना केलेल्या बलिदानाची गाथा ही आजही अभिमानाने सांगितली जाते. बाजीप्रभू व मुरारबाजी यांचे बलिदान इतिहासात नोंदवले आहे. बाजीप्रभू व फुलाजी प्रभू यांच्याबरोबर असलेल्या बांदलांच्या तीनशे मावळ्यांना विसरता येत नाही. शिवा काशिद यांच्या अपूर्व अशा बलिदानाने हिंदवी स्वराज्य उभे राहिले आहे. जेव्हा जेव्हा स्वराज्यावर परचक्र आले, जेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजीराजांच्या आयुष्यावर संकट आले त्यावेळी हे संकट आपल्या छातीवर झेलण्यासाठी उभे असणारे असंख्य सैनिक व सरदार शिवाजीराजांनी उभे केले. जगाच्या इतिहासातील ही अद्भुत घटना आहे. बलिदानाची एवढी मोठी मालिका जगाच्या इतिहासात कोणत्याही राजासाठी झालेली नव्हती व नाही.
सैन्य पोटावर चालते, असे नेपोलियन म्हणत असे; मात्र सैन्य हिंदवी स्वराज्यासाठी चालवणे व सैनिकांना एक ध्येय देऊन त्यांच्याकडून असामान्य पराक्रम करवून घेणे हा प्रकार छत्रपती शिवाजीराजांनी केला आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता शिवचरित्र हे अद्भुत घटनांनी, प्रसंगांनी व व्यक्तिमत्त्वांनी भरलेले आहे हे दिसून येते. ग्रँड डफने म्हटल्याप्रमाणे ‘मराठा साम्राज्याची निर्मिती व उदय हा सह्याद्रीच्या डोंगरात लागलेला वणवा नव्हता; तर महाराष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक वारशातून हिंदवी स्वराज्य निर्माण झाले होते.’ शहाजीराजे व जिजाऊ यांचे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न, त्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, छत्रपती शिवाजीराजांसारखे अद्वितीय व्यक्तिमत्त्व व त्यांचे कर्तृत्व यामुळे महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्य निर्माण झाले, हे आता सर्वमान्य झाले आहे.
श्री. रमेश शिंदे यांनी यापैकी अनेक विषयांना स्पर्श केला आहे. शिवचरित्राची मांडणी करत असताना अनेक छोट्या गोष्टी व विषयांना त्यांनी हात घातला आहे. सोप्या भाषेत शिवचरित्र सांगता येते, वस्तुनिष्ठ पद्धतीने ते मांडता येते व रंजक पद्धतीने ते सादर करता येते याचा वस्तुपाठ रमेश शिंदे यांनी या निमित्ताने घालून दिलेला आहे.
सन-सनावळ्या, घटना व प्रसंग यांच्या जंजाळात वाचकांना अडकवून न ठेवता नेमका इतिहास सुलभ पद्धतीने सांगण्याचे शिवधनुष्य रमेश शिंदे यांनी चांगल्या पद्धतीने पेलले आहे, त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. छत्रपती शिवाजीराजांचा इतिहास सांगणारे असे चरित्रग्रंथ सातत्याने प्रसिद्ध होणे आवश्यक आहे. ज्या व्यक्तिमत्त्वाचे आकर्षण व भुरळ आजही संपलेली नाही, असे व्यक्तिमत्त्व म्हणून शिवरायांकडे पाहिले जाते. नवनव्या संशोधनातून, परकीयांच्या कागदपत्रांतून मराठ्यांच्या इतिहासावर नवा प्रकाश गेल्या काही वर्षांत सातत्याने पडतो आहे. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचा गौरवशाली इतिहास हा नव्याने लोकांसमोर येतो आहे. या इतिहासाचे स्मरण करणे व छत्रपती शिवरायांच्या पदचिन्हांचा मागोवा घेत त्या वाटेवरून मार्गक्रमण करण्यासारखी आनंददायी गोष्ट नाही. ‘चपराक प्रकाशन’ यांनी एक वेगळा चरित्रग्रंथ प्रकाशित केल्याबद्दल ‘चपराक प्रकाशन’चे सर्वेसर्वा घनश्याम पाटील व त्यांच्या टीमचेही मनःपूर्वक अभिनंदन!
-उमेश सणस, वाई
शिवचरित्राचे व्यासंगी अभ्यासक
प्रस्तावना कशी असावी ह्याचा उत्तम आदर्श!
श्री उमेश सणस हे शिवचरित्राचे गाढे अभ्यासक आहेत. त्यामुळे ही प्रस्तावना छत्रपतींच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू समोर आणते.
लेखक श्री रमेश शिंदे, प्रकाशक श्री घनश्यामजी पाटील यांचे मनःपूर्वक अभिनंदन! हे चरित्र वाचकांच्या प्रतिसादाने नवा इतिहास निर्माण करेल. शुभेच्छा!