शिक्षण म्हणजे नेमके काय, असा प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो. काहीजण आपापल्या परीने त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतात. या प्रयत्नात कुणाला खऱ्या शिक्षणाची वाट गवसते, तर कुणाला नेहमीच्या वाटेवरून प्रवास करणे सोपे वाटते. मात्र, या पलीकडे जाऊन नवीन वाटा शोधत विद्यार्थ्यांचे जीवन फुलवण्याचा प्रयत्न काही शिक्षक करत असतात. खरे तर विद्यार्थ्यांच्या आत जे दडलेले आहे, ते बाहेर काढणे हेच खरे शिक्षण असते. पण आजकाल बाहेरून डोक्यात काहीतरी कोंबणे म्हणजेच शिक्षण, असा विचार पुढे येत आहे. पारंपरिक विचारांना छेद देत जीवन शिक्षणाची वाट धरल्यास शिक्षणातील अनेक समस्या दूर होऊ शकतात आणि मुले खऱ्या अर्थाने फुलू शकतात, असा विश्वास देण्याचा प्रयत्न एखादे पुस्तक करते. शिक्षणाची प्रक्रिया केवळ गुणांवर आधारित न राहता ती जीवनाभिमुख असावी, यावर यापूर्वी अनेकांनी सातत्याने जोर दिला आहे. तरीही दुर्दैवाने आज शिक्षणाचा मूळ अर्थ हरवत चालला आहे. अशा परिस्थितीत, एका शिक्षकाने शिक्षणातील जीवन आणि जीवनातील शिक्षण यासंबंधीचा दृष्टिकोन समजून घेत नवीन पायवाटा चोखाळण्याचा प्रयत्न केल्यास मुले कशी विकसित होतात, या अनुभवांची मांडणी करणारे ‘लाडोबा प्रकाशन’ने प्रकाशित केलेले ‘फुलताना’ हे भरत पाटील यांचे पुस्तक शिक्षणाचा खरा अर्थ उलगडण्याचा प्रयत्न करते.
शिक्षकाने वर्गात केलेले विविध प्रयोग आणि घडलेल्या वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये शिक्षणविषयक दृष्टिकोन ठेवल्यास शिकणे अधिक प्रभावी होते, याची जाणीव हे पुस्तक वाचताना सतत होते. मुळात, शिक्षण म्हणजे केवळ अभ्यासक्रमाचे स्पष्टीकरण करून पुढे जाणे नव्हे, तर ती एक व्यापक स्तरावर समजून घेण्याची बाब आहे. जर शिक्षकाने ही गोष्ट समजून घेऊन पुढे नेण्याचा प्रयत्न केला, तर निश्चितपणे विद्यार्थ्यांच्या सुप्त क्षमतांच्या विकासाचा मार्ग सापडतो. शिक्षण केवळ वर्गातच होते असे नाही, तर वर्गाबाहेरही शिक्षणाची प्रक्रिया सुरू असते. वर्गाबाहेर घडणाऱ्या शिक्षण प्रक्रियेत वर्गातील शिक्षणाचा विचारही प्रतिबिंबित होतो, हे पुस्तक वाचताना वारंवार जाणवते. भरत पाटील यांनी मूलभूत शिक्षणविषयक दृष्टिकोनाची विविध अनुभवांच्या रूपात केलेली मांडणी शिक्षण क्षेत्रातील अनेक गोष्टी स्पष्ट करून जाते. शिक्षण हे कृतीवर आधारित शिक्षण प्रक्रियेचा भाग आहे. शिक्षणाची कृती आणि मातीशी असलेली नाळ त्याला अधिक प्रभावी आणि परिणामकारक बनवते. त्यामुळे शिक्षणाच्या विचारांना गती देण्याची गरज आहे. शिक्षणविषयक विविध उपक्रम आणि त्यातील शिक्षण दृष्टिकोन, त्याचे परिणाम याबद्दल बरेच काही या पुस्तकात वाचायला मिळते. सरकारी शाळांमध्ये खूप काही चांगले घडत आहे आणि ते गेल्या काही वर्षांपासून सतत समोर येत आहे.
लेखकाने रस्त्यावर सापडलेल्या पैशाच्या प्रसंगातून रुजविलेला प्रामाणिकपणाचा विचार अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रामाणिकपणाचे संस्कार केवळ सांगून होत नाहीत, त्यासाठी नेमके कोणते प्रयत्न करायला हवेत आणि पुरस्काराचा (प्रबलनाचा) उपयोग केल्यास विद्यार्थी सहजपणे चांगल्या सवयी आत्मसात करू शकतात, हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर, एकमेकांबद्दलचा विश्वास आणि आदर वाढण्यास मदत होते. प्रामाणिकपणा हा आत्मसमाधानासाठी आणि समाज व राष्ट्राच्या दृष्टीने किती महत्त्वाचा विचार आहे, हे प्रभावीपणे मांडले आहे. दप्तरमुक्त शनिवारच्या विचारात शनिवारी शॉर्ट फिल्म दाखवून त्यातून संस्कारांच्या विचारांची पेरणी महत्त्वाची ठरते. ‘बालगणेश’, ‘पऱ्या’, ‘पिस्तुल्या’ यांसारख्या भेटींनंतर होणारी चर्चा आणि नाट्यकरणाच्या दिशेने वाटचाल या सर्व प्रक्रियेत विद्यार्थ्यांची बोलीभाषा नाकारायची नाही, हा विचार महत्त्वाचा ठरतो. यातून मुलांमध्ये जे काही रुजवायचे आहे, त्याचे प्रतिबिंब त्यांच्या रोजच्या वर्तनात दिसते. असे काही केल्याने मुलांमध्ये होणारे सकारात्मक बदल शिक्षकांना आनंद देतात आणि त्याचे दर्शन पुस्तकात वारंवार घडते. माणसाच्या मेंदूला ताजेतवाने ठेवण्यासाठी वाचन हे सर्वात महत्त्वाचे खाद्य आहे. वाचनाने पुस्तकाशी निर्माण होणारे नाते जीवनप्रवास अधिक सुखकर बनवते. या वाचनाच्या प्रवासात औपचारिक शिक्षणातील प्रकट वाचन आणि मौन वाचनाच्या वाटा चोखाळल्या जातात. या उपक्रमातून ‘पुस्तकांचे झाड’ आणि ‘फिरते वाचनालया’सारख्या नवीन कल्पना शोधण्यासाठी विद्यार्थी कशी मदत करतात, याचा अनुभव वारंवार मिळतो. अशा अनेक कल्पनांचा उदय उपक्रमांच्या प्रवासात दडलेला आहे, असे पुस्तक वाचताना जाणवते. ‘मातीचे शिक्षण’ या लेखातून मातीच्या विविध वस्तू तयार करणे, त्यातून मातीला समजून घेणे, मातीचे उपयोग, मातीचे प्रकार आणि मातीच्या संदर्भातील शब्द डोंगर, वाक्ये, कविता, गोष्टी यांचा तोंडी प्रवास विद्यार्थ्यांसाठी आनंददायी आहे. यातून शालेय अभ्यासक्रमाचे घटक आणि विषयांचा समन्वय साधणे सहज शक्य होते. यातून मुलांच्या सामाजिकीकरणाचे उद्दिष्टही आपोआप साध्य होते. शाळेतील शिक्षण आणि जीवन शिक्षण यांचा समन्वय साधल्यास शिक्षणाचे अंतिम ध्येय सहजपणे प्राप्त होते, याचा अनुभव सतत जाणवतो. वास्तव जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकसित होणे आणि स्वयंस्फूर्तीने आत्मविश्वासाची दारे उघडणे ही अत्यंत कठीण वाटचाल सहज कशी करता येते, याचा अनुभव वाचनीय झाला आहे. जीवनासाठीच्या शिक्षणाचे लेखकाचे विचार वारंवार वाचायला मिळतात. शिक्षणातून जीवनाकडे आणि जीवनाकडून शिक्षणाकडे असा दुहेरी मार्ग अवलंबल्यास, मूल्यशिक्षणाचा मार्ग आपोआप स्वीकारला जातो. ही मांडणी शिक्षणविषयक नवीन वाटांच्या संदर्भात आत्मविश्वास निर्माण करणारी आहे. मोबाईल स्क्रीन वेळेसंदर्भात विद्यार्थ्यांनी केलेला प्रयोगही अनुकरणीय आहे. मुलांवर विश्वास ठेवल्यास ते स्वतःचे निर्णय अत्यंत जबाबदारीने घेतात, असा विश्वास निर्माण होतो. विद्यार्थ्यांनी स्क्रीन वेळेचे केलेले व्यवस्थापन खरोखरच उल्लेखनीय आहे.
काजलने केलेल्या कविता आणि तिने स्वतःच्या कवितांचे केलेले वाचन, त्यातून शेतकऱ्यांच्या जगण्याचे होणारे दर्शन म्हणजे ‘मुलांना काही कळत नाही’ असे मोठ्यांना जे वाटते, त्या समजुतीला धक्का देणारे आहे. यातून मुलांच्या पाठीवर कौतुकाचा हात ठेवत प्रवास सुरू ठेवल्यास विद्यार्थ्यांच्या मनात प्रेरणा निर्माण होते. कवितांचे विषय मुलांच्या जीवनातील अनुभवांवर आधारित असतात. झाड, फुलपाखरू, पाऊस, ऊस, आनंद, दुष्काळ, माय, शेत, होळी, शेतकरी, प्रिय पोपट यांसारख्या विद्यार्थ्यांच्या भावविश्वातील कवितांचा प्रवासही उल्लेखनीय आहे. या प्रवासाची एकत्रित बांधणी करत ई-साहित्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून ‘कविता रानफुलांचा’ हा बालकविता संग्रह प्रकाशित झाला. ही गोष्ट निश्चितच बालकांना आणि शिक्षकांना आनंद देणारी आहे. मुळात, मुलांना कविता करण्याची इच्छा होणे, त्यातून त्यांनी लिहिते होणे, त्यासाठी वाचते होणे आणि स्वतःला व्यक्त करणे, अशा अनेक गोष्टी बालकांच्या आयुष्याला दिशा देणाऱ्या आहेत. आपण शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या संवादाकडे लक्ष दिल्यास मुले काय आणि कसा विचार करतात, हे सहजपणे लक्षात येते. शाळेतील आणि घरातील शिक्षणामुळे विद्यार्थी विचार करायला शिकतात आणि यातून विचार करताना ते अधिक चांगल्या प्रकारे विचार करायला शिकतात, हे महत्त्वाचे आहे. समाजात नेमके काय घडते आहे आणि नवीन पिढी काय विचार करते आहे, हे संवादातून जाणून घेतल्यास शिक्षकाला खूप काही शिकायला मिळते. विद्यार्थ्यांच्या निरीक्षण शक्तीच्या विकासासाठी आकाशात लपलेले विविध प्राणी, पक्षी जे काही दिसतील ते लिहून काढायला सांगणे, तसेच आजूबाजूलाही बरेच काही शिकण्यासारखे असते. विद्यार्थ्यांना या निमित्ताने जे काही गवसते, ते आश्चर्यचकित करणारे असते. मुलांना या निमित्ताने जे दिसते आणि ते संवाद साधतात, त्यातून त्यांच्या विकासाच्या वाटा तयार होतात. खरं तर या सगळ्या प्रवासात मुलांना स्वातंत्र्य आणि शिकण्यासाठीची संधी देणे आवश्यक आहे. स्वतःचे जग अनुभवण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळायला हवी. हे सगळे प्रयोग आणि उपक्रम दिसायला जरी साधे असले, तरी शिक्षकांनी त्याकडे ज्या दृष्टिकोनातून आणि ध्येयांमधून पाहिले आहे, ते शिक्षणाच्या मूळ उद्देशांना पुढे नेणारे आहे. शैक्षणिक दृष्टिकोन असल्यास शिक्षण सहज आणि सोपे करता येते, हे पुन्हा पुन्हा स्पष्ट होते.
पुस्तकातील सर्व लेखांची मांडणी अत्यंत सहज, साधी आणि सोपी आहे. शिक्षकाने बोलीभाषेतील संवादाचे जसेच्या तसे प्रतिबिंब उमटवण्याचा प्रयत्न केल्यामुळे पुस्तक वाचकांच्या मनावर सहज राज्य करते. बोली भाषेमुळे पुस्तक वाचताना कोणताही अडथळा येत नाही, उलट त्याची वाचनीयता वाढते. बोलीभाषा शिक्षणाचे माध्यम झाल्यास शिक्षण अधिक परिणामकारक होऊ शकते, हा दृष्टिकोन यामुळे अधिक दृढ होतो. पुस्तकात कुठेही कृत्रिमता किंवा अलंकारिक भाषेचा वापर दिसत नाही. शिक्षक म्हणून असलेली निर्मळता वाचकांना पुस्तक वाचताना सतत जाणवते. पुस्तकात एकूण ४२ लेखांचा समावेश आहे. लेखांची शीर्षके पुस्तकातील विषयांची मांडणी स्पष्टपणे दर्शवतात. लेखांवर नजर टाकल्यास हे सहज लक्षात येते. जसे – ‘आभासी जगाची सफर’, ‘आम्ही शिक्षक’, ‘उमेदीचे शिक्षण’, ‘आमची शिक्षण देणारी शेती’, ‘विषय पेणारा पालक’, ‘जीवन शिक्षण’, ‘योग अभ्यास, प्राणायाम, मानसिक शांतीचा मंत्र’, ‘स्क्रीन टाईम’, ‘शेंगा’, ‘गणेश आहे’, ‘कृतीतलं’, ‘निसर्ग शिक्षण’, ‘फुलपाखरू बेकार’, ‘अभ्यास करना ना, सर म्हनं आज’, ‘बोलणं आत्मविश्वासाचं नाव’, ‘कोरोनातील आमचं शिक्षण’, ‘मातीचे शिक्षण’ अशा विविध विषयांची मांडणी या पुस्तकात आहे. हे पुस्तक ‘लाडोबा प्रकाशना’ने नेहमीप्रमाणे अत्यंत सुबक, सुंदर मांडणी आणि दर्जेदार निर्मितीसह प्रकाशित केले आहे. महाराष्ट्रातील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व माजी शिक्षण संचालक वसंत काळपांडे यांची अत्यंत अर्थपूर्ण प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे.
पुस्तकाचे नाव: फुलताना
लेखक: भरत पाटील
प्रकाशक: लाडोबा प्रकाशन, पुणे, पाने १४४
किंमत: २५० रुपये
आस्वाद: संदीप वाकचौरे
प्रसिद्धी :दै. नायक , १३ मे २०२५