‘चपराक’चा ज्ञानमयी गणेशोत्सव – घनश्याम पाटील

सस्नेह जय गणेश!
आळंदी-पंढरपूरची भक्तिमय वातावरणात अविरतपणे सुरु असलेली वारी, गणेशोत्सव आणि दिवाळी अंक या तीन परंपरा मराठी माणसाच्या अस्मितेच्या, गौरवाच्या आहेत. ‘चपराक’ मासिकाने वारीच्या निमित्ताने सातत्याने दर्जेदार साहित्य दिलेले आहेच. दिवाळी अंकाच्या परंपरेत तर ‘चपराक’चा अंक अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. यावर्षीपासून दरवर्षी आपल्या लाडक्या बाप्पांचा विशेषांक प्रकाशित करण्याचा संकल्प आम्ही केला आहे.
खरेतर गणपती म्हणजे विद्येची देवता! प्रत्येक कामाची मंगलमय सुरुवात म्हणजे श्रीगणेशा!! ‘त्याच्या’ कृपेने प्रत्येक कार्य तडीस जाते, अशी आपली दृढ श्रद्धा. अनेकांनी ती अनुभूती आपापल्या पातळीवर घेतलेली असते.
‘भारतीय असंतोषाचे जनक’ अशी ओळख असलेल्या लोकमान्य टिळकांनी हा उत्सव सार्वजनिक केला. ‘देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे’ या भूमिकेतून त्यांनी हे माध्यम वापरले. हे एक विचारपीठ झाले. गणेशोत्सव मंडळाची ही मंगलमय परंपरा निर्माण झाली. काळाच्या ओघात यात काही अपप्रवृत्ती घुसल्या. या उत्सवास गालबोटही लागले. काही मंडळांच्या उथळपणामुळे आणि अविवेकामुळे ‘नको तो गणेशोत्सव’ असे म्हणत ‘या कार्यकर्त्यांना बाप्पांनीच सद्बुद्धी द्यावी,’ असे म्हटले जाऊ लागले. हे सगळे जरी खरे असले तरी आजही अनेक ठिकाणी गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून अनेक विधायक, सकारात्मक उपक्रम राबवले जातात. वैचारिक कार्यक्रमांची, उपक्रमांची मेजवाणी असते. कृतिशीलतेतून कार्यकर्ते, नेते घडविणारे हे एक राजकीय विद्यापीठच ठरले.
काहींना गणपती हे एक मिथक वाटते, प्रतीक वाटते. आपल्या आई-वडिलांना प्रदक्षिणा घालून पृथ्वीप्रदक्षिणा घातल्याचा संदेश देणारी देवता ही प्रतीक असली तरी ती आपला आदर्श असण्यात कोणाची हरकत आहे? मराठी माणसाचा अभिमान म्हणून गणेशोत्सवाची आपली परंपरा आपणच जपली पाहिजे. यातील खटकणाऱ्या, समाजहितास बाधा आणणाऱ्या, उपद्रव ठरणाऱ्या प्रवृत्ती आपण सारे मिळून बाजूला सारू पण गणेशोत्सव हे मराठी माणसाच्या मनात चैतन्य फुलविणारे माध्यम आहे.
कोणताही विधायक उपक्रम तडीस न्यायचा तर त्यात सामान्य माणसाची भूमिका नेहमीच महत्त्वपूर्ण ठरते. ‘चपराक परिवारा’चा हा ‘विचारांचा गणपती’ आहे. या अंकाच्या निमित्ताने त्याची प्राणप्रतिष्ठापना आम्ही करत आहोत. हा अंक अधिकाधिक वाचनप्रेमीपर्यंत जावा, अशी आमची रास्त अपेक्षा आहे. ती आपल्या सकारात्मक प्रतिसादाने पूर्णत्वास जाण्यास मदत होणार आहे. या अंकाच्या शक्य तितक्या प्रती नक्की मागवा. आपल्या जवळच्या गणेश मंडळात आणि गणेशभक्तांत त्याचे वितरण करा. ‘चपराक’चा गणेशोत्सव विशेषांक म्हणजे दिवाळीपूर्व दिवाळी ठरावी आणि अनेकांच्या मनात ज्ञानाचे, विवेकाचे दिवे अखंडितपणे तेवत राहावेत एवढीच श्री बाप्पांच्या चरणी प्रार्थना करतो.

घनश्याम पाटील
7057292092

साहित्य चपराक सप्टेंबर २०२४ (गणेशोत्सव विशेषांक)

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा