माणूस केलंत तुम्ही मला…

Image about Kavivarya Mangesh Padgaonkar

इतकं दिलंत, इतकं दिलंत तुम्ही
माणूस केलंत तुम्ही मला…

असं म्हणणारा एक आनंदयात्री जिप्सी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातल्या जगण्याच्या छटा कवितेतल्या नादमधुर शब्दांमधून आणि आशयपूर्ण भावार्थामधून बदलून गेला. त्यांच्याशी केलेला संवाद म्हणजे क्षणोक्षणीच्या आठवणींचा मोठा ठेवाच. त्यांच्याकडून मिळालेली अक्षरांची शिदोरी म्हणजे तुमच्या असण्यापर्यंतच्या प्रवासाला मिळालेली तारूण्याची पालवीच जणू. त्यांच्या काव्यमैफलीत उपस्थित राहून त्यांनीच वाचलेल्या त्यांच्या कवितेचं आपण केलेलं रसग्रहण म्हणजे, आपल्याच आयुष्यात त्या-त्या वेळच्या प्रसंगाला आठवून मारलेला फेरफटकाच असायचा. इतकं सोपं लिहून त्यांनी त्यांच्या कविता तुमच्या आमच्या केल्या. होय, हे सगळं मी सांगतोय महाराष्ट्रभूषण ज्येष्ठ कविवर्य मंगेश पाडगांवकर यांच्याबद्दल…

पाडगावकरांना जेव्हा भारत सरकारनं पद्मविभूषण सन्मान जाहीर केला त्यावेळी मी त्यांची मुलाखत घेण्याचं ठरवलं होतं. ते सायनला रहायचे. मुलाखत घेण्यापूर्वी त्यांची वेळ ठरवण्यासाठी मी त्यांना फोन केला. त्यावेळी ते म्हणाले, ‘‘अहो, मला संध्याकाळी फोन करता? आता माझ्याकडे काही लोक आले आहेत, त्यांच्याशी मला बोलायचंय…’’ समोरच्यांशी बोलताना तितकाच विनम्र आवाज आणि स्पष्टता ही त्यांच्याकडे होती. मी पुन्हा संध्याकाळी त्यांना फोन केला आणि विचारलं, ‘‘सर, मी राजेंद्र हुंजे बोलतोय, पद्मविभूषण मिळाला त्याबद्दल तुमचं अभिनंदन! यानिमित्तानं मला तुमची मुलाखत घ्यायची आहे. कधी रेकॉर्डिंग करूयात?’’ त्यावर पाडगावकरांनी सांगितलं की, ‘‘येत्या गुरूवारी दुपारी 4.30 वाजता या माझ्या घरी इथंच करूयात.’’  मी हो म्हणून फोन ठेवून दिला.

पाडगांवकरांना बोलतं करण्यासाठी अधिक जाणून घेण्यासाठी मी त्या कार्यक्रमात माझे दोन मित्र निवेदक मिलिंद कुलकर्णी आणि कवी-गीतकार वैभव जोशी यांना घेतलं होतं. मिलिंदने पाडगांवकरांसोबत त्यावर्षात त्यांच्या कवितांविषयीचे तब्बल 50 कार्यक्रम केले होते विविध शहरात… आणि वैभव जोशीने त्यांच्या कवितेतल्या शब्दांचे आशीर्वाद घेऊन आपली कविता लिहायला घेतली होती. या दोघांना सोबत घेऊन पाडगांवकरांसोबत कार्यक्रम करायचा ठरला. आम्ही आमचे दोन कॅमेरे घेऊन ठरलेल्या दिवशी पाडगांवकरांच्या घरी सायनला गेलो. पाडगांवकरांच्या घराच्या अगदी हाकेच्या अंतरावर रेल्वेचे ट्रॅक होते आणि त्यांच्या हॉलच्या गॅलरीत मुलाखतीचं शूटिंग करायचं असं ठरलं; पण कॅमेरामन म्हणाले की, ‘‘रेल्वेच्या जाण्या-येण्याचा फारच आवाज येईल. त्यामुळं इथे शूटिंग करता येणार नाही.’’ त्यावेळी माझ्यापुढे मोठा प्रश्‍न होता की, आता पाडगांवकरांना कसं सांगायचं? त्यावर आमचा कॅमेरामन म्हणाला, ‘‘इथे यांच्या घराशेजारीच एक महापालिकेचे उद्यान आहे, शूटिंगसाठी लोकेशन चांगलं आहे. तुम्ही त्यांना तिकडे शूट करतोय, असं पटवा तोवर मी तिकडे जाऊन कॅमेरे लावून ठेवतो.’’ माझी मोठी पंचाईत झाली होती. हा सगळा बदल त्यांना कसा सांगायचा म्हणून; पण मनाने धाडस केलं आणि पाडगांवकरांना मी सांगितलं की, ‘‘इथे शूटिंग करता येणार नाही, रेल्वेचा फारच आवाज येतोय. आपण इथे बाजूलाच असलेल्या उद्यानात जाऊयात, तिकडे कॅमेरामन पोहोचले आहेत.’’ त्यावर ते काहीक्षण माझ्याकडे बघत राहिले. मी म्हटलं आता काय होणार… तेवढ्यात ते म्हणाले, ‘‘चला…’’ आमच्या सगळ्यांच्याच चेहर्‍यावर हस्याची लकेर फुलली… कारण मिलिंद आणि वैभव खास या कार्यक्रमासाठी पुण्याहून आले होते.
सायनला त्यांचं असलेलं तीन मजली घर. पाडगांवकर तिसर्‍या मजल्यावर रहायचे. लिफ्ट होती… पण ते म्हणाले, ‘‘जिन्याने उतरूयात…’’ त्यावेळी त्यांचं वय होतं 82 वर्षे… घरातून निघताना नेहमीच त्यांच्या हातात त्यांच्या कवितेची तीन-चार पुस्तके असायचीच. तशी यावेळीही त्यांनी ती सोबत ठेवली होती. मी म्हणालो, ‘‘आपण पुढे उतरा मी आहे मागे तुमच्या…’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘अहो, मी इतकाही म्हातारा झालो नाही की, मला जिना उतरता येणार नाही, घर माझंच आहे, पायर्‍याही माझ्याच आहेत, त्यामुळे त्या मला न पाडता अंदाजे बरोबर खाली उतरवतील… कदाचित त्या पायर्‍यांनाही आणि घराच्या भिंतींनाही माहिती असावं की आणखी शब्दांच्या संगतीनं आपल्याला जगायचं आहे.’’ पाडगांवकरांच्या उदाहरणावर मला त्याक्षणी त्यांची कविता आठवली –

    काळ्याकुट्ट काळोखात
    जेव्हा काही दिसत नसतं
    तुमच्यासाठी कोणीतरी
    दिवा घेऊन उभं असतं
    काळोखात कुढायचं की
    प्रकाशात उडायचं, तुम्हीच ठरवा…
    सांगा कसं जगायचं
    कण्हत कण्हत की,
    गाणं म्हणत….

त्या मुलाखतीच्या कार्यक्रमाआधी पाडगांवकरांच्या घरातून बाहेर पडताना त्यांचे हेच शब्द माझ्या मनाच्या गाभार्‍यातला काळोख दूर करण्यासाठी खूपच उपयोगी पडले आणि त्यांच्या त्या बोलण्यातल्या विश्‍वासानं मला प्रकाशात उडण्याचंही बळ दिलं.

शेजारच्या बागेत मुलाखत सुरू करण्यापूर्वी काहीजण संध्याकाळची वेळ असल्याने फिरायला आले होते. तेवढ्यात आपल्या आईसोबत बागेत फेरफटका मारायला आलेली एक तरूणी माझ्याकडे आली आणि म्हणाली, ‘‘सर मी पाडगांवकरांना भेटू शकते?’’ मी म्हणालो, ‘‘हो, लवकर आम्ही आता आमचं शूटिंग सुरू करतोय.’’ ती तरूणी लगेच तिच्या आईकडे गेली आणि आईच्या पर्समध्ये शोधून सापडलेला एक कागदाचा तुकडा घेऊन आली आणि पाडगांवकरांना तिने त्यावर स्वाक्षरी देण्याची विनंती केली. पाडगांवकरांनी नेहमीप्रमाणे त्यांच्या नावाची ती आकर्षक अशी सही केली. त्यावर ती तरूण इतकी बेहद खूश होऊन गेली की बस्स! मी शब्दात वर्णन करू शकत नाही; पण तेवढ्यात पाडगांवकरांनी मला सांगितलं, ‘‘अहो, जरा त्या मुलीला परत बोलावता का?’’ मी मनात म्हटलं ‘आता काय झालं…’ मी त्या तरूणीला हाक मारली. ती पाडगांवकरांजवळ आली, त्यांनी तिला तो स्वाक्षरी दिलेला कागद मागितला… अन् त्या तरूणीच्या चेहर्‍यावर एक चिंतेचं काहूर माजलं. पण, पाडगांवकरांनी तिला दिलेल्या सहीच्यावर आशीर्वाद हा शब्द लिहिला आणि तिला तो स्वाक्षरीचा कागद परत केला. याप्रसंगाने ती आधीपेक्षा अधिकच खूश झाली. तिच्या आनंदी चेहर्‍याकडे पाहत पाडगांवकर मिश्किलीने तिला म्हणाले, ‘‘यावर मी आशीर्वाद असं जरी लिहिलं असलं, तरी वयाच्या 82 व्या वर्षी मी म्हातारा झालो असा त्याचा अर्थ होत नाही…’’ पाडगांवकरांच्या या मिश्किल टिप्पणीने ती तरूणी इतकी लाजली आणि बावरली… हसतच ती आईकडे पळत गेली आणि आम्ही आमची मुलाखत सुरू केली. संध्याकाळ होत आली होती; पण झालेला प्रसंग पाहता, मी माझ्या मुलाखतीची सुरूवात पाडगांवकरांच्या तू असतीस तर… या कवितेने केली –

    तू असतीस तर झाले असते
    सखे उन्हाचे गोड चांदणे
    मोहरले असते मौनातून
    एक दिवाने नवथर गाणे   
    बकुळीच्या फुलापरी नाजूक
    फुलले असते गंधाने क्षण
    आणि रंगानी केले असते
    क्षितिजावर खिन्न रितेपण…

यानंतर आमची मुलाखत जी काही खुलली की बस्स… सूर्यास्त कधी झाला याचं भान ना मला राहिलं… ना आमच्या कॅमेरामनला…
पाडगांवकर म्हणजे एक जिंदादिली, तारूण्याचा सळसळता उत्साह! समोरच्याचे शब्द कोंडीत पकडून त्याला विनोदाच्या चौकटीत बसवून आनंद लुटण्याची त्यांची हातोटी होती. पाडगांवकरांसोबत गप्पा मारताना नेहमीच आपण अधिक तरूण होतोय, तारूण्याची पालवी हिरव्यागार निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी खुणावतेय असा भास व्हायचा. मुंबईच्या बेस्ट बसमधून जात असताना बाहेर जमलेल्या ढगांच्या गर्दीतून जेव्हा पावसाचे थेंब कोसळले, त्यावेळी त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडले होते, ‘श्रावणात घननिळा बरसला…’ त्यानंतर त्याचं पुढे गीत झालं आणि संगीतकार श्रीनिवास खळे यांनी त्याला सुंदर चाल लावली… आजही ते गीत ऐकलं की, पावसाळा आल्याची चाहूल करून देतं.

प्रेमात पडलेल्या प्रत्येकांविषयी पाडगांवकरांनी आपल्या कवितेतून त्यांचं प्रेम अधिक घट्ट होण्याचे शब्द त्यांना दिलेत. प्रेमाविषयी बोलताना पाडगांवकर म्हणतात – प्रेम म्हणजे प्रेम असतं आणि तुमचं आमचं सेम असतं. त्याहूनही पुढे जाऊन जे नुकतंच प्रेमात पडलेत त्यांच्याविषयी पाडगांवकरांनी एक फार सुंदर कविता लिहिली आहे. त्याचं शीर्षकही तितकंच समर्पक आहे. ते असं – प्रत्येकाने आपापला चंद्र निवडलेला असतो. त्यात ते म्हणतात –

    नक्षत्राच्या गर्दीत प्रत्येकाने
    आप-आपला चंद्र निवडलेला असतो
    कारण, प्रत्येकजण कधी ना कधी
    एकदा तरी प्रेमात पडलेला असतो…
    तिच्या चेहर्‍याला चंद्र म्हणण्याची
    त्याची सवय काही मोडलेली नसते
    तिने कितीही डोळा चुकविला तरीही
    त्याने जिद्द सोडलेली नसते
    तिच्या सौंदर्याचे गुणगाण करण्याचा
    छंदच जणू त्याला जडलेला असतो
    कारण, प्रत्येकजण कधी ना कधी
    एकदा तरी प्रेमात पडलेला असतो.

पहिल्यांदाच प्रेमात पडलेल्यांची अशी व्याख्या करताना, पाडगांवकर त्यांच्याविषयी पुढे फारच सुंदर लिहितात –
बरं याला प्रेम म्हणावं, तर

लोक निर्मळ प्रेमाची भाषा करतात
    आणि नुकतंच प्रेमात पडलेल्या त्या दोघांकडून
    अगदी शुद्ध प्रेमाची
    अपेक्षा करतात…

समाजातल्या वास्तवावर अगदी मोजक्या आणि नेमक्या शब्दात भाष्य करणारे पाडगांवकर अजूनही आपल्या तरुणाईला फारसे कळले नाहीत, याची मला खंत वाटते. कदाचित यातली काही प्रमाणातली तरूणाई त्याला अपवाद असेल देखील.

आईच्या प्रेमात वाढलेली मुले जेव्हा पुढे शाळेत जायला लागतात तेव्हा पहिलाच महिना पावसाचा असतो. अशावेळी पाऊस पडताना शाळेत जायलाच नको, अशी त्या मुलांची इच्छा असते, त्यांच्यासाठीही आपल्या लोकप्रिय बालगीतातून पाडगांवकर लिहितात –

    सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय
    शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय…

म्हणजे पाडगांवकरांच्या शब्दांची आणि तुमची घट्ट मैत्री जमली की, बालवयात रमलेले पाडगांवकर कळतात. अशाच वेळी रूसलेल्या मुलीला हसवण्यासाठी अगदी केविलवाण्या स्वरात तिला साद घालताना म्हणतात –

 चिऊताई, चिऊताई दार उघड
    दार उघड चिऊताई…
    दार असं लावून,
    जगावरती कावून,
    किती वेळ डोळे मिटून आत बसशील
    आपलं मन आपणच खात बसशील
    वारा आत यायलाच हवा
    मोकळा श्‍वास घ्यायलाच हवा
    दार उघड चिऊताई, चिऊताई दार उघड….
    फुलं जशी असतात,
    तसे काटेही असतात,
    सरळ मार्ग असतो,
    तसे फाटेही असतात
    तरीसुद्धा या जगात वावरावंच लागतं
    आपलं मन आपल्यालाच सावरावं लागतं…
    दार उघड चिऊताई, चिऊताई दार उघड…

पाडगांवकरांच्या या आर्त विनवणीत दोन जीवांची झालेली घालमेल स्पष्ट कळते. म्हणूनच मी म्हणतो पाडगांवकर आपल्याला जगायला शिकवतात. समाजातल्या अधिष्ठानाची बैठक घालून देतात. इतकंच नाही, तर ज्या समाजात आपण वावरतो, तिथंही राहून काही पदरात पडत नसेल, तर त्याच समाजातल्या वाईट गोष्टींना ‘सलाम’ करायलाही शिकवतात.

पद्मविभूषण मिळाल्यानंतर केलेल्या मुलाखती आधीची एक आठवण आहे. पाडगांवकरांनीच लिहिलेल्या ‘शुक्रतारा मंदवारा’ या गाण्याला 47 वर्षे पूर्ण झाली होती. त्यावेळी ज्येष्ठ गायक अरूण दाते आणि पाडगांवकर यांची एकत्र मुलाखत करायचं ठरलं. दोघेही आमच्या आयबीएन लोकमतच्या ऑफिसात आले. पाडगांवकर नेहमी त्यांच्या कवितेची पुस्तकं त्यांच्या छातीजवळ धरून बसायचे. स्टुडिओत जाण्यापूर्वी मला ते अधिकच व्याकूळ दिसले. हातातल्या पुस्तकांनी ते छातीला दाबत होते. मी त्यांना विचारलं की, ‘‘काही त्रास होतोय का…’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘हो…’’ मी म्हटलं, ‘‘काय झालं…’’ पाडगांवकर म्हणाले, ‘‘अहो, नागीण झालीय नागीण… फार त्रास देतेय हो…’’ मी थोडा घाबरलो… पण त्यावर पाडगांवकरांनी मला केलेल्या प्रश्‍नामुळे वातावरण ढवळूनच गेलं… ते म्हणाले, ‘‘अहो हुंजे, ही नागीण आहे फारच त्रास देतेय कधीही, कुठेही, केव्हाही… तिची बिचारीची काय चूक… तुम्हाला जर कुठे एखादा नागोबा मिळाला तर घेऊन याल का… तिची आणि त्याची एकदाची गाठ घालून देतो म्हणजे दोघेही सुखाने संसार करतील आणि मला सुखात ठेवतील…’’ त्यावर ऑफिसात एकदमच हशा पिकला. विनोदाच्या टाईमिंगबाबत त्यांचा कुणी हातच धरू शकत नाही.

तिथून पुढे आम्ही स्टुडिओत मुलाखतीसाठी गेलो… रेकॉर्डिंग सुरु झालं. मंगेश पाडगांवकर आणि अरुण दाते दोघेही माझ्यासमोर स्टुडिओत बसले होते. शुक्रतारा गाण्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला जात होता. शिवाय त्यासोबत पाडगावकरांनी लिहिलेल्या आणि दाते यांनी गायलेल्या इतर गाण्यांच्याही आठवणी निघाल्या. मध्येच अरूण दाते अचानक थांबले… गाणं म्हणत होते ते एकदमच शांत झाले… पाडगांवकर त्यांच्या चष्म्यातून मला डोळ्यांनीच खुणावत होते… काय झालं… रेकॉर्डिंग चालू होतं… तेवढ्यात मध्येच पाडगांवकर म्हणाले, ‘‘अहो, अरूण मध्ये-मध्ये विसरतो… पुन्हा विचारा त्याला… विसरायला होतं त्याला वयाप्रमाणे…’’ त्यांचं हे वाक्य पूर्ण होत नाही तोवर अरूण दाते पुन्हा गायला लागले. पाडगांवकर एकदम विस्मयचकित होऊन माझ्याकडे बघू लागले. त्यानंतर पुढे ह्या गप्पा सुरू असताना मी पाडगांवकरांना दोन-तीन प्रश्‍न विचारले. त्यावर ते अरूण दातेंकडे पाहत बसले. दातेंनाही कळेना हे असं का करताहेत. प्रश्‍न त्यांना विचारलाय आणि पाडगांवकर दातेंकडे पाहताहेत. या प्रसंगात दाते मला हळूच म्हणाले, ‘‘अहो, जरा जोरात विचारा त्यांना ऐकायला कमी येतं.’’ हे ऐकल्याबरोबर पाडगांवकर म्हणाले, ‘‘अहो, मला ऐकायला येतं व्यवस्थित. तू काय सांगतोयस ऐकायला येत नाही म्हणून. मी ऐकलंय त्यांनी काय प्रश्‍न विचारलाय ते… तू काय बोलतोस ते पाहण्यासाठी मी गप्प बसलो होतो’’, असं पाडगांवकरांनी दातेंना म्हटलं. मला काही केल्या हसू आवरलं नाही… उल्हासानं भरलेलं मन मलाच क्षणभर म्हणायला लागलं, बघ कसं जगायचं असतं… कोणत्याही वयात तारूण्याची झलक आणि जिंदादिली सोडायची नसते. म्हणूनच मला पाडगांवकरांच्या या आठवणी जागवताना म्हणायचंय…

 तुम्ही मला भिजवलंत,
    हिरवंगार रूजवलंत
    इतकं दिलंत… तुम्ही मला…
    तुमचं प्रेम स्मरून इथून जाताना
    तुमच्या मायेत
    चिंब भिजून न्हाताना,
    तुमच्या समोर
    उभं राहून गाताना,
    मन असं भरून येतं!
    डोळ्यातून झरून येतं

    डोळ्यात जेव्हा आसवं असतात
    तेव्हाच माणसं माणसं असतात!
    इतकं दिलंत,
    इतकं दिलंत तुम्ही मला!
    खरं सांगतो,
    पाडगांवकर, माणूस केलंत तुम्ही मला !

राजेंद्र हुंजे (09930461337)

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

हे ही अवश्य वाचा