ही नोकरी सोड

‘काय रे कुठं काम करतो? पगार किती आहे?’ हे बोलणं ऐकू आलं आणि माझ्या आठवणी जाग्या झाल्या. कारण मलाही असे प्रश्‍न विचारणारे भरपूर होते. तेव्हाची ही गोष्ट.

तेव्हा मी नुकताच कॉलेज संपवून नोकरीच्या शोधात होतो. एका ठिकाणी कामही मिळालं होतं; पण अचानक आई आजारी पडली म्हणून नोकरी सोडून घरी यावं लागलं.

एके दिवशी आईला घेऊन जवळच नवीन झालेल्या मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलला गेलो होतो. हॉस्पिटलमधील काम झाल्यानंतर मी सहज विचारावं म्हणून चौकशीच्या खिडकीत विचारलं, ‘‘इथं काही काम मिळेल का?’’ कारण तिथे नोकरीसाठी जागा आहेत असं मला कळलं होतं. तिथल्या मॅडमनी मला ‘काळे सर यांना भेटा’ म्हणून सांगितलं; मग मी काळे सरांना भेटायला गेलो. तिथल्या शिपायाला विचारलं, ‘‘सर आहेत का?’’

तो म्हणाला, ‘‘सर बाहेर गेले आहेत. थोडा वेळ वाट पहावी लागेल.‘‘
नंतर त्यानं विचारलं, ‘‘काय काम आहे?’’

मी नोकरीसाठी आल्याचं त्याला सांगितलं. त्यानं पाणी दिलं. मग मी वाट पाहत थांबलो. ‘‘सरांना यायला वेळ लागेल’’ असं म्हणत त्यानं चहाचा कप माझ्यापुढे ठेवला व निघून गेला. मला विचार पडला हा कप कोणासाठी ठेवला असेल? माझ्यासाठी तरी नसेल? पण असं वाटायचं, काम मागायला आलेल्यांना कोण चहा पाजतं का?

तेवढ्यात शिपाई आला व म्हणाला, ‘‘चहा प्या, गार होतोय.’’ मी लगेच कप उचलला व चहा संपवला. बराच वेळ झाला तरी सर काही आले नव्हते; पण मनात मी विचार पक्का केला होता की, काही झालं तरी चालेल पण सरांना भेटल्याशिवाय जायचं नाही. कारण कॉलेज सोडून बरेच दिवस झाले होते आणि ग्रॅज्युएशन झालेल्यांचे नोकरीसाठी कसे हाल होतात याच्या अनेक कहाण्या मी ऐकल्या होत्या. मी पहिली मिळालेली नोकरी सोडली होती. त्यामुळं मला लवकरात लवकर दुसरी नोकरी शोधणं भाग होतं.

तेवढ्यात शिपायाने बोलावलं. मी आत गेलो.

काळे सरांनी विचारलं, ‘‘काय काम आहे?’’

मी सांगायला लागलो, ‘‘सर माझं ग्रॅज्युएशन झालं आहे. मला आपल्या इथे काम मिळेलं का?’’
सर म्हणाले, ‘‘आमच्याकडे टेक्निशियनची जागा भरायची आहे. तुम्ही काम करणार का?’’

मी लगेच ‘होय’ म्हणून सांगितलं. वास्तविक मला टेक्निशियन म्हणजे काय हेही माहीत नव्हतं. लगेच त्यांनी एक अर्ज मला दिला व भरायला सांगितला. मी तो अर्ज घेऊन बाहेर आलो व शेजारीच असलेल्या स्टेशनरीत बसून भरायला लागलो. सुरूवातीला मला टेक्निशियन हा शब्दच लिहिता येत नव्हता. मी ऑपरेटरला विचारलं की, ‘‘बाबा ‘टेक्निशियन’ कसं लिहायचं?’’

त्यानं सांगितलं; पण मनात काय विचार करत होता काय माहीत? सगळ्यात शेवटी एक प्रश्‍न होता, ‘पगारची अपेक्षा’. मी विचार करत होतो किती लिहायचा. वास्तविक टेक्निशियनला किती पगार असतो कोणाला माहीत? पण उगाच भीती वाटायची कमी सांगितलं तर आपलं नुकसान व्हायला नको. जास्ती सांगावं तर…? तरीपण दहा हजार लिहिलं.

अर्ज भरून झाल्यावर सरांच्या केबिनला गेलो. सरांनी लगेच फोन लावला. ते फोनवर म्हणत होते, ‘‘एक अर्ज आहे. आपल्या बजेटमध्ये आहे.’’ असं म्हणून फोन ठेवला. लगेच दुसरा फोन लावला व त्यांचं बोलणं झाल्यावर त्यांनी मला फोन दिला. समोरून कोण आहे हे माहीत नव्हतं.
तिकडून प्रश्‍न आला, ‘‘नाव काय?’’

लगेच मी माझा बायोडाटा सांगितला.

तिकडून पुन्हा प्रश्‍न आला, ‘‘जीमेल अकाउंट आहे का?’’

खरं तर हा काय प्रकार आहे हे काय माहीत नव्हतं. कारण आम्ही गावाकडची ग्रॅज्युएशन झालेली अडाणी लोकं. संगणकाबद्दल काहीच माहिती नाही. तरीही मी ‘होय’ म्हणून सांगितलं कारण मला काही करून ही संधी सोडायची नव्हती. फोनवरून इंटरव्ह्यू हा मला प्रकार नवीनच होता.
त्यांनी मला सांगितलं, ‘‘जीमेल अकाउंट आणि कॉम्प्युटरची माहिती असेल तर जॉब मिळेल.’’

मी सगळं माहिती असल्याचं सांगितलं. खरं तर हे दोन्ही काय आहे हे मला माहीत नव्हतं; पण बोललो तर होतो. सगळं झाल्यावर मला दोन दिवसांनी यायला सांगितलं. मी नोकरी मिळणार या आनंदात घरी आलो; पण एक प्रॉब्लेम तर होताच की हे जीमेल अकाउंट काय भानगड आहे? त्याचं करायचं काय? मी इंजिनियरिंगला असलेल्या मावस भावाला विचारलं. त्यानं सांगितलं, ‘‘त्यासाठी कॉम्प्युटर पाहिजे.’’ आता आली का पंचायत! कॉम्प्युटर कुठून आणायचा? बरं विट्याला (जवळच्या शहरात) जाऊन नेटकॅफेत बसून शिकणंही शक्य नव्हतं. गावात कोणाकडे कॉम्प्युटर नव्हता; पण तेवढ्यात आठवलं, ग्रामपंचायतीत आहे. तिथला ऑपरेटर हा आपला मित्रच आहे. मी लगेच त्याला फोन लावला. फोनमध्ये बॅलन्स नव्हता तर बॅलन्स लोन घेतलं आणि फोन लावला. त्याला लगेच पंचायतीत यायला सांगितलं. मग त्यानं मला जीमेल अकाउंटविषयी माहिती सांगितली आणि अकाउंट सुरु करून दिलं. मग मी त्याच्याकडूनच कॉम्प्युटरची पण माहिती करून घेतली. त्याने मला टायपिंग व कीबोर्डचे शॉर्टकट सांगितले.

एवढ्या माहितीवर मी जॉबवर जायला निघालो होतो. बाकी सगळं व्यवस्थित चाललं होतं. मला जॉब पण मिळाला. दुसर्‍या दिवसापासून मी कामावर जायला लागलो; पण पगाराचा विषय तर राहिलाच होता. मला सांगण्यात आले, ‘‘संस्थापक आले की तुला पगार किती ते सांगतो.’’ माझी अपेक्षा होती, निदान सहा हजार तरी मिळावा. कारण मागच्या नोकरीत मला तेवढाच पगार होता; पण मला जेव्हा माझा पगार सांगितला तेव्हा मला आश्‍चर्याचा धक्काच बसला. मला आठ हजार पगार ठरला होता. ही रक्कम माझ्यासाठी भरपूर मोठी होती. माझा आनंद गगनात मावत नव्हता.

जर मला कोणी विचारलं की, ‘‘कुठं जातो कामाला?’’ तर मी अभिमानानं सांगायचो, ‘‘मेडिकल कॉलेजवर टेक्निशियन आहे.’’

पुढला माणूस हमखास विचारायचा, ‘‘टेक्निशियन म्हणजे काय?’’ किंवा ‘‘त्याचं काय काम असतं?’’

मला पण माहीत नव्हतं. मी असंच काहीतरी सांगायचो. कदाचित पुढच्यालाही काही कळायचं नाही; मात्र मला ‘पगार किती’ विचारल्यावर ‘आठ हजार’ सांगताना जरा दबकायचो! कारण मला वाटत होतं आपण जास्ती सांगतोय. माझी कमतरता झाकण्यासाठी मी अगदी मन लावून काम करत होतो. काही दिवसांपूर्वी कॉम्प्युटरबद्दल अडाणी असणारा मी; पण आज कुणाला काही अडचण आली तर मला विचारलं जातं.

आता कामावर स्थिर झालो होतो. असेच बरेच दिवस गेले. दोन महिने झाले तरी मला माझा पगार काय मिळाला नव्हता. कामावर जॉईन होताना त्यांचं आदरातिथ्य पाहून मन भारावून गेलं होतं. नंतर मला कामावरचे एकेक रंग दिसायला लागले. माझा पहिला पगार मी चार महिन्याने घेतला होता.

तिथं मला चांगले सहकारी भेटले. त्यांच्याशी चांगली मैत्री झाली. आमचा चार-पाच जणांचा एक ग्रुप झाला होता. आम्ही सगळी कामं एकत्र करायचो. एकमेकांच्या अडीअडचणी सोडवायचा प्रयत्न करायचो. यातूनच मला बर्‍याच जणांच्या बर्‍याच गोष्टी कळत गेल्या. या संस्थेचं भवितव्य चांगलं नाही हे मला सुरूवातीलाच कळलं होतं; पण घरी असं काही सांगितलं तर वादच व्हायचा. ‘‘घरी राहून, जवळचं चांगलं काम तुला करवत नाही का? मालकानं काय संस्था बंद करायला एवढा पैसा घातलाय का?’’ असं म्हणून मला गप्प केलं जायचं.

माझी तर खूप वाईट परिस्थिती झाली होती. गाडीत पेट्रोल भरण्यासाठी रोज घरून पैसे घेऊन जावं लागायचं. मिळकतचा दुसरा कुठलाच पर्याय नसल्यानं रोजचा गाडा ओढणं भाग होतं. चांगल्या पगाराची नोकरी असूनसुद्धा बेकारापेक्षा माझी वाईट अवस्था झाली होती.

अशीच दोन वर्षे गेली. चार महिन्याच्या अंतराने होणारा पगार आता सहा-आठ महिने झाले तरी होत नव्हता. कामगारांमध्ये बराच असंतोष वाढत होता. त्यातच व्यवस्थापकांच्या जाचक अटींनी जास्तीच हाल व्हायचे. याची तक्रार करायला संस्थापक साहेबांजवळ गेलो; तर आम्हाला सरळ सांगण्यात आले की, ‘‘तुम्हाला आम्ही आमच्याचकडचा चहा पाजून कामावर घेतलं आहे. त्यामुळे आम्ही सांगेल तेच होणार.’’ मला आता त्या चहाचा अर्थ कळत होता. असं वाटत होतं, त्यावेळेस चहा पिलो नसतो तर आज गप्प बसावं लागलं नसतं. आता तर आमचं ऐकणारं पण कोणी नव्हतं. पगार मिळायचा पूर्ण बंद झाला होता. कामगारांमध्ये तणावाचं वातावरण होतं.

संस्था बंद पडण्याच्या मार्गावर होती. बरेच लोक सोडूनही गेले होते. ‘आपण सोडून गेलो आणि संस्था सुरळीत चालू झाली तर आपलं नुकसान होईल’, ‘आपला सगळा पगार मिळाला की आपण सोडू’ असा विचार करून बरेच लोक टिकले होते. काही हुशार लोक तर फक्त लग्न होण्यासाठी कामावर येत होते. कारण गावाकडे नोकरीच्या जास्त संधी नाहीत. नोकरीवाल्या स्थळाला लोक पसंती देतात म्हणून नावाला काम करणारे भरपूर होते. ‘‘एकदा लग्न झालं की, आपला धंदा करायचा. इथं कोण मरणार हाय बिना पगार पाण्याचं?’’ असं त्यांचं मत होतं.

आपला पगार कसा मिळायचा हाच प्रश्‍न सर्वांना सतावत होता. संस्थेमध्ये शोककळा पसरली होती. एखाद्या शेतकर्‍याने आपला टॉमेटॉचा प्लॉट सोडून द्यावा, तसं संस्थेनं आम्हाला सोडलं होतं. संस्थाही व्हेंटिलेटरवर होती. कुणाचा कुणाला मेळ लागत नव्हता.

मला तर संस्था म्हणजे सुतकातलं घर वाटायला लागली. कामावर आलं की घरी जाईपर्यंत सारखा पगाराचाच विषय असायचा. एक डिपार्टमेंट सोडून दुसरीकडं गेलं की तिथंही तोच विषय. आणखी एखाद्या ठिकाणी गेलं की तिथंही तेच. एवढंच काय मुतारीमध्ये गेलं तरी एखादा येऊन तोच विषय काढणार! प्रत्येकजण एकमेकाचं सांत्वन करत बसायचा. जसं एखादा व्यक्ती मरण पावल्यानंतर त्याच्या आठवणींना उजाळा देतात तसं! जाईल तेथे तोच विषय.

त्यात पण काही महाभाग होते. ‘माझा पगार मिळाला नाही तर मी केस करणार’, ‘माझा पगार नाही मिळाला तर मी डिपार्टमेंटचा कॉम्प्युटर उचलून नेणार’, ‘संस्था काय करतेय बघू’ असं काहीतरी बोलायचे. बोलताना असं काही बोलायचे की हे विचार सांगतायत की संस्थेला हिंट देतायत हेच कळायचं नाही. म्हणजे पगार नाही मिळाला तर कामगार काय काय करू शकतात, हे ऐकूनच संस्थेत रोज नवीन नियम लागू व्हायचे.

संस्थेचं नाव पंचक्रोशीतसुद्धा भरपूर खराब झालं होतं. पगार होत नाहीत हे सगळ्या गावाला माहीत होतं. मी नेहमी पेट्रोल भरायला जायचो. तिथला कर्मचारीसुद्धा नेहमी विचारायचा, ‘‘काय शेठ, झाला का पगार?’’ तो चांगलाच ओळखीचा झाला होता. त्यांनाही आमची परिस्थिती माहीत झाली होती. एकदा तिथंच पेट्रोल भरायला गेलो. त्याला सांगितलं, ‘‘पाचशेचं पेट्रोल टाका.’’

त्यानं माझ्याकडे आश्‍चर्यानं पाहिलं व विचारलं, ‘‘आपल्या गाडीत पाचशेचं तेल? आपण कधी एवढं टाकत नाही. पगार झाला की काय?’’
त्याला सांगितलं, ‘‘गाडी माझी नाही, दुसर्‍याची आहे. त्यानं टाकायला सांगितलंय.’’ त्यावेळी तो सहानुभूती दाखवतोय की अब्रू काढतोय हेच कळत नव्हतं.

संस्थेत रोज काहीतरी नवीन घडत होतं. रोज नवीन अफवा यायच्या. संस्थेपेक्षा संस्थेच्या बाहेर जास्त अफवा पसरत होत्या. मला रोज कोणीतरी भेटायचं आणि विचारायचं, ‘‘अरे तुमची संस्था विकली ना? झाला का व्यवहार?’’ काही तर असं म्हणायचे की, स्वतः संस्थापकांनी त्यांना सांगितलंय. मला हे कळत नव्हतं की, कर्मचारी सोडून संस्थापक बाकी सगळ्यांना भेटत होते, त्यांना सगळं सांगत फिरत होते आणि आम्हालाच काही माहिती व्हायचं नाही. हे कसं काय?

बरं काही लोक असेही भेटायचे, जे म्हणायचे, ‘‘तिथं कामाला आहेस तर सोडू नको. तुमचं भलं होईल. आज ना उद्या संस्था सुरळीत चालू होईल.’’ हे काय कमी की काय म्हणून संस्थेविषयी अभ्यास करून निष्कर्ष काढल्यासारखं विचार मांडणारे पण भेटायचे. ‘‘संस्थापकांनी असं करायला पाहिजे होतं. तसं करायला पाहिजे होतं.’’ याने आजपर्यंत संस्थेत पायदेखील ठेवलेला नसतो; पण बोलणं उगाच मोठं! मला असं वाटायचं मालकानं यांनाच का कामावर ठेवलं नाही. खरं तर बांडगूळच झाडाला खायला लागलं होतं. संस्थेच्या अधोगतीची मुळं संस्थेतच होती. हे कुणाला कळत नव्हतं की कळून घेत नव्हते, काय माहीत?

मला तर आता कामाला कुठं जातो हे सांगायला पण लाज वाटायची. आधी अगदी अभिमानानं सांगायचो; पण आता परिस्थिती बदलली होती. एकेकाळी आठ हजार पगार जास्ती वाटायचा, आता दहा हजार पण शरमेनं सांगावं लागायचं. आता जरी कोणाला सांगितलं की, ‘मी या संस्थेत कामाला आहे’ तर तिरसट नजरेनं बघतात. काहीतरी विचारतात, ‘‘संस्था बंद आहे ना?’’ मला तर वाटत होतं काहीतरी गुन्हा करून तुरुंगात जावं पण या संस्थेत नको.

पण तरी एवढं असूनदेखील काम कुणी सोडून जात नव्हतं. संस्थेकडं एक आकर्षित करायची ताकद होती की काय कोणास ठाऊक?  कामगार सगळे रोज वेळेवर कामावर येत होते. कामावर येऊन संस्थेला कोसत बसतील; पण संस्था सोडून काय बाहेर जात नव्हते. आधी लग्नासाठी चांगली स्थळ यायची अन् आता आलेली परत जातायत. आधी अभिमान होता, आता लाचारी आहे. खरं तर प्रत्येकाला आपल्या पगाराची काळजी होती. कोणालाही संस्थेविषयी सहानुभूती नव्हती. मालकाने कामगारांमध्ये फूट पाडली होती. म्हणजे कधी पैसे मिळायचा विषय झालाच तर दुसर्‍याला कळू न देता स्वत:ला पहिले कसे मिळतील हे पाहत होते. प्रत्येकजण स्वतःचा विचार करत होता. पैशासाठी सगळे आसुसलेले होते. त्यामुळे मालक सांगेल ते काम करत होते. सगळे लोक सुचेल त्या मार्गाने पगार मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. याच काळात मला माणसांची भरपूर रूपे दिसली. पैशासाठी लाचार कामगार, शिरजोरी करणारे व्यवस्थापक आणि निष्ठूर मालक.

त्यातही जो व्यवस्थापकांच्या मर्जीप्रमाणे वागेल त्यालाच पगार मिळत असे. त्यामुळे काही लोक निवांत होते; पण प्रामाणिक काम करणार्‍यांचे हाल होत होते. काही लोकांनी तर आपल्या पगारावर पाणी सोडले होते. ते हे काम सोडून नवीन ठिकाणी काम करत होते. सुरूवातीला नोकरी सोडायला विरोध करणारे घरचेसुद्धा आता ‘ही नोकरी सोड’ म्हणून मागे लागले होते. या सगळ्या दिव्यातून जाऊन मीपण शेवटी निर्णय घेतला आणि वेळेवरच संस्थेला रामराम ठोकला.

पण अजून कुणी विचारलं, ‘‘काय करतो? कुठं कामाला आहे?’’ की माझ्या जुन्या आठवणी जाग्या होतात हे मात्र खरं!

प्रशांत सुतार

मु. कान्हरवाडी, पो. येतगाव, ता. कडेगाव, जि. सांगली, 415311, संपर्क - 8007841501

हे ही अवश्य वाचा