भूता परस्परे पडो मैत्र जिवांचे

Bhutdaya image

सुमारे एक लाख वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी शिकारीसाठी दगडाचा हत्यार म्हणून वापर केला. तिथपासून ते आज इंटरनेट क्रांतीपर्यंतचा हा प्रवास विलक्षण थक्क करणारा आहे. उत्क्रांतीच्या अनेक टप्प्यांचा हा प्रवास अजूनही चालूच आहे. आपले राष्ट्र आणि आपण सारेजण या प्रवासाचे एक भाग आहोत. आज भारताकडे उड्डाणवाहक, मिसाईल्स, विमाने आणि अतीउच्च तंत्रज्ञानाची सगळीच साधने उपलब्ध आहेत. एक सशक्त राष्ट्र म्हणून जगाच्या नकाशावर सन्मान मिळवत असतानाच एक सशक्त निरोगी समाजाची उभारणी करण्याचं आव्हान आजच्या युवा पिढीसमोर आहे. निव्वळ आपण स्वत: आणि स्वत:चं कुटुंब या संकुचित कोषामध्ये राहून जगत राहण्यापेक्षा चंगळवादाची जी झापडं आपण बुद्धीला बांधली आहेत. त्यातून बाहेर पडणं खूप गरजेचं आहे.

समाजात जात, धर्म, लिंगभेदाच्या भिंती अधिक ताठर होऊ पाहताहेत. आपल्या उज्ज्वल इतिहासाची आणि इतिहासपुरूषांची वाटणी जातवार होऊ लागली आहे.  इतिहासपुरूषांची जातवार वाटणी करण्याचा प्रकार थांबवण्याची गरज आहे. गोरगरीब, दीन दलीत, स्त्रियांवरील अत्याचारांच्या घटनेत वाढ होत आहे. जात्यांध संघटनेची मूळं महाराष्ट्राच्या पुरोगामी मातीत रूजू पाहत आहेत. नव्हे येणार्‍या भविष्यात ही विषवल्ली संपूर्ण समाजच गिळकृंत करेल. भय, भूक, चिंतेने समाज पोखरला आहे. रक्तपात, दुष्काळ, शेतकर्‍यांच्या आत्महत्या आणि प्रचंड प्रमाणात होणारे भ्रष्टाचार इत्यादी अशा कितीतरी संकटांचा विळखा समाजातील स्वास्थ्य बिघडवत आहे. तिकडे सीमेवर शहीद होणार्‍या जवानांचे मृत्यु आपल्याला भयग्रस्त करीत आहेत. अशा नकारात्मक परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांनी फक्त स्वत:पुरतंच जगावं का? टीव्हीवरील जाहिराती, भंपक सिरीयल्स आणि संगीत-नृत्याच्या महागड्या स्पर्धा इत्यादीमध्येच रमून आयुष्याची इतिकर्तव्यता मानावी का? आपल्याला काय त्याच्याशी म्हणत निष्क्रिय व्हावं का? आपण या सगळ्यांचा विचारच करू नये का? स्वत:ला विचार करायला आपण प्रवृत्त केलंच पाहिजे. समोर असलेल्या संकटावर मात करण्यासाठी योग्य विचारांची कास धरून कृती करणारा खरा युवक. ‘सॉक्रेटिसचा मृत्यू’ या लेखात कुरूंदकर म्हणतात, ‘विचार करण्याचा हक्क प्रस्थापित करण्यासाठी मरण पत्करणारा सॉक्रेटिस मला विलोभनीय वाटतो. इतर कोणाबरोबर स्वर्गात राहण्यापेक्षा, सॉक्रेटिसबरोबर नरकात राहणे मी पसंत करीन.’ विचार करून सकारात्मक कृतीकडे वाटचाल करत राहणे आजमितीला खरोखर गरजेचे आहे.

प्रेमाच्या विचित्र कल्पना घेऊन चंगळवादाच्या मार्गावर भ्रमित झालेला आजचा युवावर्ग ही निकोप समाजव्यवस्थेला लागलेली वाळवी म्हणता येईल. स्त्री-पुरूष सहजीवनाचे आदर्श समोर नसणारी फक्त भोगवादी मानसिकता समाजात स्त्रियांवर होणार्‍या लैंगिक अत्याचारास कारणीभूत ठरत आहे. नाक्या-नाक्यावर बसून येणार्‍या-जाणार्‍या महिलांची छेड काढणे, टिंगलटवाळी करणे इत्यादी प्रकार थांबवणे गरजेचे आहे. युवावस्थेचा हा सुवर्णकाळ ईश्‍वरी आणि निसर्गदत्त देणगी आहे. त्या काळाचा उपयोग जितक्या सकारात्मक तर्‍हेने केला जाईल तितकाच तो व्यक्ती, कुटूंब, राष्ट्र आणि जगाच्या सकारात्मक उभारणीस निश्‍चितच उपयोगी सिद्ध होईल.
पाब्लो नेरूदा त्यांच्या एका कवितेत म्हणतात,

‘ऍन्ड यू वील आस्क : व्हाय डझन्ट हीज पोएट्री
स्पीक ऑफ ड्रीम्स ऍन्ड लीव्ज ऍन्ड द ग्रेट वाल्कन्स ऑफ हीज नेटीव्ह लॅन्ड?
कम ऍन्ड सी द ब्लड इन द स्ट्रीटस्
कम ऍन्ड सी द ब्लड इन द स्ट्रीटस्’

खरोखरच केवळ स्वप्नांच्या विश्‍वात न रमता स्वत:ची स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी मेहनत घेणे गरजेचे आहे. स्वत:च्या ध्येयवाटेवरून चालताना समाजात घडणार्‍या घटनांकडे पाहून आपआपला खारीचा वाटाही उचलायला हवाच.

सगळ्या भेदांच्या पलीकडे नेणारी समाज व्यवस्था निर्माण करणं, समाजात शांतता-सलोखा, सुव्यवस्था टिकावी यासाठी प्रयत्न करणं, प्रत्येक पोटाला भाकर आणि प्रत्येक डोक्याला सकारात्मक ग्रंथ मिळावा यासाठी सजग राहणं, स्वत: सोबतच समाजाचा विकास व्हावा यासाठी कार्यरत राहणं, पर्यावरण पुरक जगण्याची शैली स्वीकारताना जुन्यांचा आदर आणि नव्यांचे स्वागत करत राहणं ही विचारसुत्री युवावर्गाने कायमच स्वत:समोर ठेवावी.

‘भूता परस्परे पडो मैत्र जिवांचे’ असे पसायदान मागणार्‍या ज्ञानेशांच्या पावन भूमीत जन्मास आलेल्या प्रत्येक युवा मनाने समाजकल्याणाचे, पर्यावरण रक्षणाचे आणि रंजल्या-गांजल्या हातांना आधार देण्याचे ध्येय स्वत:समोर ठेवले तर जगाच्या नकाशावर केवळ आकारानेच नव्हे तर सकारात्मक कार्याने आपला देश खरोखरच महान ठरेल, यात शंका नाही.

ज्योती कदम, नांदेड
9604466696

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

हे ही अवश्य वाचा