प्रकाशन विश्वाला नवी दिशा देणारे “चपराक”

प्रकाशन विश्वाला नवी दिशा देणारे "चपराक"

सुप्रसिद्ध साहित्यिक आणि संशोधक संजय सोनवणी यांचा विशेष लेख

मराठी प्रकाशन क्षेत्राला अत्यंत वाईट दिवस आले आहेत, पुस्तके खपत नाहीत, लेखक चांगले विषय उत्तमरित्या हाताळत नाहीत वगैरे तक्रारी आपण मराठी प्रकाशन क्षेत्रातुन उमटताना पाहत असतो. बरे, ही गोष्ट आजची नाही. ‘श्रीविद्या’च्या मधुकाकाने तर ‘आता प्रकाशकांनी हजाराची आवृत्ती न काढता पाचशेचीच काढावी’ असेही आवाहन 15-20 वर्षांपूर्वी केल्याचे स्मरते. साहित्य संमेलनात तर ‘मराठीचे भविष्य’ हा विषय सीमाप्रश्‍नाएवढाच अपरिहार्य झाला आहे. अर्थात खरी स्थिती काय आहे? जर पुस्तके खपत नसतील तर का खपत नाहीत? यावर मात्र चिंतन व प्रत्यक्ष उपक्रम करायला कोणी तयार होत नाही. या वरकरणी कालांधारयुक्त वाटणार्‍या परिस्थितीत घनश्याम पाटील यांच्यासारखे तरुण उत्साहाने पुढे येतात, आपल्या ’चपराक प्रकाशन’तर्फे नवनवीन प्रतिभा हेरत तेवढीच दर्जेदार पुस्तके प्रकाशित करतात, त्यांच्या पुन्हा-पुन्हा आवृत्त्याही काढण्यात यश मिळवतात. त्यावरुन तरी समस्या असली तर प्रकाशकांत आहे, प्रकाशन व्यवसायात नाही हे सिद्ध होते.
आता तर एकाच वेळेस तब्बल डझनभर पुस्तके एकाच वेळीस प्रकाशित करण्याचा घाट त्यांनी घातला आहे. ही बारा पुस्तकेही एका छापाची, एकाच साहित्य प्रकारातील नाहीत. मुख्य म्हणजे लेखकात तरुण प्रतिभेला अधिक वाव आहे. घनश्याम पाटील यांचा ‘झुळूक आणि झळा’ हा ‘चपराक’ साप्ताहिकातील धडाकेबाज अग्रलेखांचा संग्रह, सागर सुरवसे या तरुण पत्रकाराने लिहिलेले एकनाथजी रानडे यांचे जीवनचरित्र, हणमंत कुराडे यांची दगडखाणीतील उद्ध्वस्त जीवनाचे प्रत्ययकारी चित्रण करणारी कादंबरी, संदिपान पवारांच्या बालकविता तर विनोद पंचभाईंच्या बालकथा, चंद्रलेखा बेलसरेंचा कथासंग्रह, माधव गिर यांचा आशादायी व आश्वासक ‘नवं तांबडं फुटेल’ हा कवितासंग्रह  तर सदानंद भणगेंसारख्या ज्येष्ठ साहित्यिकाचा ललित/वैचारिक संग्रह. यावरुन प्रकाशित होणार्‍या पुस्तकांचे विषय-वैविध्य लक्षात यावे.
वाचकांना काय हवे असते हा महत्त्वाचा प्रश्‍न आहे. वाचकांना नवे, ताजे, जीवन समृद्ध करु शकणारे, वैचारिकतेत भर घालणारे किंवा अत्यंत नवीन अनुभवविश्व उलगडणारे साहित्य हवे असते. एकाच लेखकाच्या प्रेमात पडून त्याचेच सर्व साहित्य वाचणार्‍या वाचकांचा काळ कधीच मागे पडलाय. त्यामुळे ’लोकप्रिय’ व ’समीक्षकप्रिय’ लेखकांची पुस्तके प्रकाशित करण्याचा सपाटा लावलेले प्रकाशक या वाचकांच्या बदलत्या अभिरुचीपासून दूरच राहणार हे उघड आहे. बरे, प्रस्थापित लेखकांना बदलत्या काळाचे भान कितपत असते हा तर संशोधनाचा विषय आहे. वर्तमानात न रमता गतकाळातील आपल्या तोकड्या अनुभवांना नवनवी लेबले चिकटवत वारंवार वाचकांच्या माथी मारण्यापेक्षा तरुणाईचेच सकस लेखन निवडत प्रकाशित करणे हेच हिताचे असा कालसुसंगत विचार घनश्याम पाटील यांनी केला आहे आणि त्यांच्या प्रकाशन संस्थेचे यश त्यातच अंतर्भूत आहे असे म्हणायला हरकत नाही.
घनश्याम पाटील हे अत्यंत हलाखीच्या स्थितीतून कोवळ्या वयात अत्यंत कष्ट उपसत आज तरुण वयातच पुण्यात पत्रकारिता आणि प्रकाशन या बलदंडांचीच मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात ठाम पाय रोवून उभे असलेले, पण सतत हसतमुख राहत कार्यमग्न असलेले व्यक्तिमत्त्व. ‘चपराक’ हे नाव त्यांच्या प्रकाशनाला त्यांनी निवडले. नाव सणसणीत ’चपराक’ असले तरी तो अत्यंत उत्तम विचारांचे संक्षिप्त प्रतिनिधित्व करतो. चतुरस्र, परखड, रास्त आणि कर्तव्यदक्ष या ध्येयवादी संकल्पनांची आद्याक्षरे एकत्र करत ’चपराक’ हे नाव साधलेले आहे.
या बाराही पुस्तकांचा प्रकाशनसमारंभ 11 फेब्रुवारी 2015 रोजी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या अध्यक्षतेखाली साने गुरुजी स्मारक सभागृह, सिंहगड रस्ता, पुणे येथे संपन्न झाला आहे. सुप्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते ही पुस्तके प्रकाशित झाली. यावेळी उमेश सणस या प्रसिद्ध कादंबरीकारांच्या आणि ज्येष्ठ पत्रकार विनायक लिमये यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
प्रकाशनविश्वाला नवी दिशा दाखवणार्‍या पाटील यांची यशोगाथा अभिनंदनीय आहे. ‘चपराक प्रकाशन’च्या यशाची कमान अशीच उंचावत राहो, अशा पाटील यांनाही यानिमित्ताने शुभेच्छा!

(पूर्व प्रसिद्धी : दैनिक संचार, सोलापूर​

​​

​​

​​

​​

​​

​)

घनश्याम पाटील

गेली 15 वर्षे पूर्णवेळ पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. साप्ताहिक ‘चपराक’ आणि मासिक ‘साहित्य चपराक’चे मालक, मुद्रक, प्रकाशक आणि संपादक. ‘चपराक प्रकाशन’ या प्रकाशन संस्थेचे प्रकाशक, संचालक. महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाचा स्वतंत्र संपादक.

हे ही अवश्य वाचा